Salt Craving Causes: कधीतरी चिप्स, लोणचं किंवा खारट पदार्थ खाण्याची इच्छा होणं सामान्य आहे. मात्र, ही इच्छा वारंवार होत असेल आणि त्यासोबत अशक्तपणा, चक्कर येणे, वजन कमी होणे किंवा भूक मंदावणे अशा समस्या जाणवत असतील, तर त्यामागील कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.

NHS च्या माहितीनुसार, मीठ खाण्याची असामान्य इच्छा हे एडिसन रोगाचे संभाव्य लक्षण असू शकते. या आजारात अल्डोस्टेरॉन (Aldosterone) या हार्मोनची निर्मिती कमी होऊ शकते. हा हार्मोन किडनीला शरीरात सोडियम आणि पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतो. त्याचबरोबर अतिरिक्त पोटॅशियम लघवीवाटे बाहेर टाकण्याचे कामही करतो. अल्डोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास शरीरातून सोडियम जास्त प्रमाणात बाहेर पडू शकते. त्यामुळे काही व्यक्तींना वारंवार मीठ खाण्याची इच्छा होते. मात्र, केवळ मीठ खाण्याची इच्छा होते म्हणून एडिसन रोग झाला आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. यामागे इतरही कारणं असू शकतात.

एडिसन रोग म्हणजे नेमकं काय? शरीरात कोणते बदल होतात?

एडिसन रोगाला प्रायमरी अ‍ॅड्रिनल इनसफिशियन्सी (Primary Adrenal Insufficiency) असंही म्हणतात. आपल्या दोन्ही किडनीच्या वर अ‍ॅड्रिनल ग्रंथी असतात. या ग्रंथी शरीरासाठी आवश्यक असलेले कोर्टिसोल (Cortisol) आणि अल्डोस्टेरॉन यांसारखे हार्मोन्स तयार करतात.

  • कोर्टिसोल हार्मोन: शरीराला तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करण्यास मदत करतो. रक्तातील साखर, चयापचय क्रिया आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यावर त्याचा प्रभाव असतो.
  • अल्डोस्टेरॉन हार्मोन: शरीरातील सोडियम, पोटॅशियम आणि पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करतो. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते.

एंडोक्राइन सोसायटीच्या माहितीनुसार, एडिसन रोग होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे ऑटोइम्यून प्रतिक्रिया. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून अ‍ॅड्रिनल ग्रंथींवर हल्ला करते आणि त्यांना नुकसान पोहोचवते. काही संक्रमणं आणि इतर आजारांमुळेही या ग्रंथींचे कार्य प्रभावित होऊ शकते.

कोर्टिसोल कमी झाल्यास थकवा, अशक्तपणा आणि वजन कमी होण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. तर अल्डोस्टेरॉन कमी झाल्यास मीठ खाण्याची इच्छा, कमी रक्तदाब आणि शरीरातील क्षारांचे असंतुलन निर्माण होऊ शकते.

अल्डोस्टेरॉनची कमतरता झाल्यास रक्तदाबावर काय परिणाम होतो?

अल्डोस्टेरॉन हार्मोन शरीरातील सोडियम आणि पाण्याचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे असते. या हार्मोनची कमतरता झाल्यास किडनीमधून सोडियम जास्त प्रमाणात बाहेर पडू लागते. परिणामी शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि रक्ताचे एकूण प्रमाण कमी होऊ शकते. याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. काही व्यक्तींना रक्तदाब कमी होण्याची समस्या जाणवते. विशेषतः बसलेल्या किंवा झोपलेल्या अवस्थेतून अचानक उभे राहिल्यानंतर चक्कर येऊ शकते. काही वेळा अशक्तपणा, खूप तहान लागणे किंवा बेशुद्ध पडण्याची शक्यताही असते.

रक्ताच्या तपासणीत सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण वाढलेले आढळू शकते. मग अशा वेळी जास्त मीठ खावे का? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आहारात मिठाचे प्रमाण वाढवू नये. काही रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यानुसार सोडियमचे प्रमाण वाढवावे लागू शकते. मात्र, प्रत्येक रुग्णाची स्थिती, रक्तदाब आणि तपासणीचे अहवाल लक्षात घेऊनच आहार ठरवला जातो.

एडिसन रोगात सांधे आणि स्नायू का दुखतात?

सतत सांधेदुखी किंवा स्नायू दुखण्याचा त्रास होत असेल, तर अनेकजण याला वाढते वय, कामाचा ताण किंवा पोषणातील कमतरता समजतात. मात्र, काही प्रकरणांमध्ये यामागे एडिसन रोगही कारणीभूत असू शकतो.

Mayo Clinic च्या माहितीनुसार, एडिसन रोगामध्ये सांधेदुखी, स्नायू कमकुवत होणे आणि स्नायूंमध्ये पेटके येणे अशी लक्षणं दिसू शकतात. कोर्टिसोल हार्मोन शरीरातील चयापचय क्रिया आणि तणावाला दिली जाणारी प्रतिक्रिया नियंत्रित करतो. या हार्मोनची कमतरता झाल्यास सतत थकवा आणि स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवू शकतो. मात्र, प्रत्येक प्रकारची सांधेदुखी किंवा स्नायूंची वेदना एडिसन रोगामुळेच होते असं नाही. त्यामुळे वेदना दीर्घकाळ टिकत असल्यास त्यामागील नेमकं कारण शोधणं गरजेचं आहे.

मीठ खाण्याची इच्छा होण्यासोबत दिसतात ही ८ लक्षणं

Cleveland Clinic च्या माहितीनुसार, एडिसन रोगाची लक्षणं सुरुवातीला हळूहळू दिसू लागतात. त्यामुळे अनेकदा रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात.

या आजारामध्ये खालील लक्षणं दिसू शकतात.

  1. सतत थकवा: पुरेशी झोप घेऊनही दिवसभर थकल्यासारखं वाटणं.
  2. स्नायूंचा अशक्तपणा: थोडंसं काम केल्यानंतरही शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटणं.
  3. सांधेदुखी: सांधे आणि स्नायूंमध्ये वारंवार वेदना जाणवणं.
  4. वजन कमी होणं: कोणताही विशेष प्रयत्न न करता वजन घटणं.
  5. भूक मंदावणं: जेवणाची इच्छा कमी होणं किंवा अन्न खाल्ल्यानंतर मळमळणं.
  6. पोटाच्या समस्या: पोटदुखी, उलट्या किंवा जुलाब होणं.
  7. कमी रक्तदाब: उभं राहताना चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडल्यासारखं वाटणं.
  8. त्वचेचा रंग बदलणं: काही रुग्णांच्या त्वचेवर, विशेषतः त्वचेच्या घड्यांमध्ये किंवा हिरड्यांवर गडद रंग दिसू शकतो.
    काही रुग्णांमध्ये चिडचिड, उदासीनता आणि एकाग्रता कमी होण्यासारखे बदलही दिसू शकतात.

एडिसन रोगाचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

एडिसन रोगाची लक्षणं इतर अनेक आजारांशी मिळतीजुळती असल्यामुळे केवळ लक्षणांवरून निदान करता येत नाही. डॉक्टर रुग्णाची वैद्यकीय माहिती आणि शारीरिक तपासणी केल्यानंतर रक्तातील सोडियम, पोटॅशियम, कोर्टिसोल आणि ACTH या घटकांच्या तपासण्या सुचवू शकतात. गरजेनुसार ACTH स्टिम्युलेशन टेस्टसारख्या विशेष तपासण्याही केल्या जातात. या आजारावर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीद्वारे उपचार केले जातात. यामध्ये शरीरात कमी असलेल्या हार्मोन्सची औषधांच्या माध्यमातून भरपाई केली जाते. रुग्णाच्या स्थितीनुसार कोर्टिसोलची कमतरता भरून काढण्यासाठी औषधं आणि गरजेनुसार अल्डोस्टेरॉनची जागा घेणारी औषधं दिली जाऊ शकतात.

एडिसन रोग असलेल्या रुग्णांमध्ये गंभीर परिस्थितीत अ‍ॅड्रिनल क्रायसिस (Adrenal Crisis) होऊ शकतो. यामध्ये रक्तदाब अचानक खूप कमी होणे, तीव्र अशक्तपणा, उलट्या, पोटदुखी किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणं दिसू शकतात. ही वैद्यकीय आणीबाणी असून तातडीने रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वारंवार मीठ खाण्याची इच्छा होणे, सांधेदुखी, सततचा थकवा, वजन कमी होणे आणि चक्कर येणे अशी लक्षणं एकत्र दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. स्वतःहून मिठाचे प्रमाण वाढवणे किंवा हार्मोनची औषधं घेणे टाळा.