डॉ. वैशाली जोशी

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील अहवालानुसार रक्तक्षय (अ‍ॅनेमिया) किंवा पंडुरोगाचे प्रमाण स्त्रिया आणि बालके यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. रक्तक्षय म्हणजे नेमके काय आणि का होतो आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आहारामध्ये काय बदल करणे गरजेचे आहे हे समजून घेऊ या..

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
ILO report
विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण

समतोल आहार हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. सर्वच अन्नघटक शरीरासाठी उपयुक्त असतात. त्यातील विविध जीवनसत्त्वे व खनिजांचे प्रमुख कार्य म्हणजे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, जंतूशी सामना करणे, विविध प्रकारच्या संसर्गापासून रक्षण करणे आणि शरीर तंदुरुस्त राहील याची काळजी घेणे. त्यापैकी लोह, जीवनसत्त्व ब ६, ब ९(फॉलिक अ‍ॅसिड) आणि ब १२ यांचा अभाव हा पंडुरोगास कारणीभूत ठरतो.

पंडुरोग म्हणजे काय?

रक्तातील लाल पेशींची संख्या कमी होणे किंवा लाल पेशींमधील हेमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे याला पंडुरोग असे म्हणतात. पुरुषांमध्ये १३.५ ते १७.५ ग्रॅम (प्रत्येक डेसिलिटरमागे) तर स्त्रियांमध्ये १२ ते १५.५ ग्रॅम हिमोग्लोबिनचे प्रमाण असणे आवश्यक असते. लाल पेशींमध्ये असणारे ‘हेमोग्लोबिन’ हे घटक एका प्रकारचे प्रथिन व लोह यांपासून बनलेले असते. शरीरात सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम ते करते. अजून एका प्रकारचे प्रथिन आणि लोह हे एकत्र आले की ‘मायोग्लोबिन’ तयार होते जे स्नायूंना ऑक्सिजनपुरवठा करण्याचे काम करत असते.

लक्षणे

लोह या खानिजाच्या अभावामुळे अथवा योग्य संख्येत व निरोगी अशा लाल पेशींच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या जीवनसत्त्व ब १२ व फॉलिक अ‍ॅसिड (ब ९) व ब ६ याच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनपुरवठय़ाच्या कामात विघ्न येते. परिणाम म्हणजे शारीरिक थकवा ज्यामुळे अशक्त वाटणे, दम लागणे, चक्कर येणे, चेहरा फिकट दिसणे, डोकेदुखी, अंगावर सूज येणे अशी काही लक्षणे दिसतात तर मानसिक थकव्याचा परिणाम थेट आपल्या स्वभावावर होतो. चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे, उत्साह कमी होणे अशी काही लक्षणे दिसू लागतात. गर्भवती स्त्रियांमध्ये बाळाची वाढ पूर्ण न होणे, नवजात बाळाचे वजन कमी असणे किंवा गरोदरपणात गुंतागुंत होणे असे काही गंभीर परिणाम होऊ शकतात.

आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष, खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागील प्रमुख कारणे असावीत. वेळेचा अभाव, पदार्थाची सहज उपलब्धता आणि विकत घेण्याची क्षमता यांमुळे फास्ट फूड अथवा जंक फूड सतत खाल्ले जाते. पोषक आहार घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते. भूक लागली असताना चटकन काही तरी पोटात ढकलू, असे म्हणत अनेकदा फक्त जिभेलाच चटक मटक लागणारे चरबीयुक्त पदार्थ पोटात ढकलत असतात. सततच्या चुकीच्या आहाराच्या सेवनामुळे शरीराला पोषकतत्त्वे कमी प्रमाणात मिळतात आणि परिणामी पंडुरोग व स्थूलता या दोन्ही आजारांना तोंड द्यावे लागते.

आहारातील बदल..

१ कबरेदके, प्रथिने, चरबी, सर्व जीवनसत्त्वे व खनिजांचे योग्य प्रमाण असेलला समतोल आहार घ्यावा.

२ मटण, चिकन, अंडय़ाचे बलक यांमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते आणि शरीरात खूप सहजरीत्या शोषून घेतले जाते. हे लोह वनस्पतीजन्य स्रोतातील लोह शोषून घेण्यासही मदत करते. योग्य प्रमाणात याचा आहारात जरूर समावेश करावा. इतर मांसाहारी पदार्थापेक्षा माशांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असते.

३ लोहाचे प्रमाण जास्त असलेले वनस्पतीजन्य स्रोत म्हणजे पालक माठ, पुदिना, कडुलिंब आणि इतर पालेभाज्या. भाताचा कोंडा, पोहे, बाजरी, नाचणी, राजगिरा ही धान्ये तसेच मटकी, सोयाबीन यांसारखी कडधान्ये यात लोहाचे प्रमाण अधिक असते. सुकामेवा, तीळ, अळीव, सूर्यफूल व करडईच्या तेलबिया हेही लोहयुक्त स्रोत आहेत. विडय़ाच्या पानामध्येही लोह जास्त प्रमणात आढळते.

४ साखरेऐवजी लोहयुक्त गुळाचा वापर करावा.

५ जीवनसत्त्व ‘क’ हे लोह शोषून घेण्यास मदत करते. जीवनसत्त्व क असलेली संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, पेरू, स्ट्रॉबेरी, अननस, द्राक्षे ही फळे, पालेभाज्या, पालक, ब्रोकोली, फ्लावर, सर्व रंगाच्या भोपळी मिरच्या, रताळी, मोड आलेले कडधान्य यांचा आहारात समावेश करावा.

६ अति प्रमाणात चहा व कॉफी घेतल्याने त्यातील असलेल्या टॅनिन आणि ऑक्सालेटमुळेही लोह शोषून घेण्याचे प्रमाण कमी होते.

७ सॉफ्ट ड्रिंक्स, बीयर, आइस्क्रीमही हे पूर्णत: टाळलेले बरे. त्यातील फॉस्फेट लोह शोषून घेण्याच्या कामात अडथळा निर्माण करतात.

८ लोहाच्या भांडय़ात बनवलेला स्वयंपाक लोहाचे अन्नातील प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने फायदेशीरच ठरतो.