curry leaves nutritional benefits: भारतीय खाद्यसंस्कृतीत, डाळ, पोहे किंवा इतर दक्षिण भारतीय पदार्थांना समृद्ध सुगंध आणि चव देण्यासाठी कढीपत्त्याचा वापर सामान्यतः मसाला म्हणून केला जातो. परंतु, आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र या दोन्हींनुसार, कढीपत्ता ही केवळ चव आणणारी वनस्पती नसून, तो औषधी गुणधर्मांचा एक नैसर्गिक खजिना आहे. बहुतेक लोक जेवताना कढीपत्ता फेकून देतात; परंतु त्याचे औषधी फायदे मिळवण्यासाठी तो व्यवस्थित चावून खावा किंवा त्याचा अर्क सेवन करावा. आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांच्या मते, कढीपत्त्यामध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी, बी२, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, फॉलिक ॲसिड आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या पोषक घटकांचा शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांवर थेट परिणाम होतो.

भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधिका व टीव्ही व्यक्तिमत्व डॉ. हंसा योगेंद्र सांगतात की , कढीपत्त्यामध्ये (ज्याला स्वीट नीम, असेही म्हणतात) अशी पोषक तत्त्वे असतात, जी पचनक्रिया सुधारतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवतात. कढीपत्त्यातील पाचक एंझाइम्स पोटातील गॅस, पोट फुगणे आणि अपचन कमी करतात, तसेच आतड्यांच्या आरोग्यास मदत करतात. ही छोटी पाने यकृताचे आरोग्य सुधारतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही पाने एक रामबाण उपाय आहेत. चला, एका तज्ज्ञाकडून जाणून घेऊया की, ही पाने शरीरासाठी इतकी फायदेशीर का आहेत ते…

कढीपत्त्यातील पोषक तत्त्वे

  • तंतुमयता
  • कॅल्शियम
  • लोह
  • क जीवनसत्त्व
  • अ जीवनसत्त्वाचे पूर्वरूप (कॅरोटीनॉइड्स)
  • फोलेट
  • मॅग्नेशियम
  • फॉस्फरस
  • पोटॅशियम
  • व्हिटॅमिन बी गटातील पोषक तत्त्वे अल्प प्रमाणात
  • अँटिऑक्सिडंट आणि इतर वनस्पती संयुगे उपस्थित आहेत.

कढीपत्त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो?

रक्तशर्करा नियंत्रणास उपयुक्त

कढीपत्त्यामध्ये तंतुमय हा घटक आणि काही वनस्पतीजन्य संयुगे असतात, ज्यांच्या रक्तातील साखरेवरील संभाव्य परिणामांचा अभ्यास केला गेला आहे. तंतुमयता असलेल्या घटकामुळे आहारातील कर्बोदकांचे पचन आणि ग्लुकोजचे शोषण मंदावण्यास मदत होते, असे मानले जाते. मधुमेही त्यांच्या आहारात या पानांपैकी ८-१० पानांचा समावेश करू शकतात.

‘ही’ पाने केसांसाठीही प्रभावी

केस आणि टाळूच्या काळजीसाठी पारंपरिक घरगुती उपायांमध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. त्यामध्ये असलेले वनस्पतीजन्य घटक आणि अँटीऑक्सिडंट्स केस व त्वचेच्या काळजीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नारळाच्या तेलात शिजवलेले कढीपत्त्याचे तेल केसांना लावण्याचीही एक परंपरा आहे. तथापि, कढीपत्त्याचे तेल केस गळणे, कोंडा किंवा अकाली केस पांढरे होणे थांबवू शकते, याचा कोणताही वैद्यकीय पुरावा उपलब्ध नाही.

वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याचाही वापर केला जातो. त्यात तंतू आणि विविध वनस्पतीजन्य घटक असतात. संतुलित आहार, पुरेशी शारीरिक हालचाल, झोप आणि आरोग्यदायी उष्मांकयुक्त आहारासोबत कढीपत्त्याचे सेवन केल्यास तुम्हाला तुमचे वजन सहजपणे नियंत्रित करण्यास मदत मिळू शकते.

सकाळच्या मळमळीसाठी कढीपत्ता

पारंपारिकपणे मळमळ आणि पचनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. गरोदरपणात सकाळच्या मळमळीपासून आराम मिळविण्यासाठी कढीपत्त्याचे सेवन प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

पचनासाठी उपयुक्त ठरू शकते

कढीपत्त्यामध्ये तंतू हा घटक असतो, जो सामान्य पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जेवणात त्याचा समावेश केल्याने तुमच्या आहारातील तंतूंचे प्रमाण वाढू शकते. मुखशुद्धीसाठी किंवा बडीशेपसोबत कढीपत्ता खाण्याचीही एक पारंपरिक पद्धत आहे. ज्या लोकांना सतत बद्धकोष्ठता, अतिसार, पोटदुखी किंवा भूक न लागण्याचा त्रास होतो, त्यांनी दररोज कढीपत्त्याचे सेवन करावे.

आपल्या आहारात कढीपत्त्याचा समावेश कसा करावा?

कढीपत्ता औषध म्हणून वेगळा घेण्याऐवजी त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे सोपे आहे. तो पोहे, उपमा, डाळ, भाजी, चटणी, सांबार आणि पुलावमध्ये वापरता येतो. कढीपत्ता वाळवून, त्याची पूडही करता येते. अशा प्रकारे त्याचा उपयोग केवळ मसाला म्हणून न करता, विविध पदार्थांमध्ये करता येतो.