एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातील पहिल्या वर्षांची आज सांगता होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात करोनाच्या भयावह काळातून गेलेल्या या वर्षांच्या उत्तरार्धात जग सुरळीत होत आहे, अशी आशा वाटू लागली असतानाच ओमायक्रॉनच्या रूपात करोनाने पुन्हा आपली पकड घट्ट केली आहे. हा धोका उराशी बाळगूनच आपण नवीन वर्षांत प्रवेश करत आहोत. पण हा एकच धोका नव्या वर्षांत आपली वाट पाहतोय, असे नाही. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे दररोज ‘अपग्रेड’ होत असलेल्या काळात तंत्रज्ञानाशी संबंधित धोकेही आपली वाट पाहत आहेत. करोना महासाथीमुळे गेली दोन वर्षे अनेक व्यवहारांसाठी, संवादासाठी, शिक्षणासाठी ऑनलाइन तसेच डिजिटल माध्यमांचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवीन वर्षांत या क्षेत्रात नवे धोके दिसू लागले आहेत. ‘नॉर्टन लॅब्ज’ या कंपनीने केलेल्या पाहणीत काही अंदाज वर्तवण्यात आले असून वापरकत्र्यांनी याबाबत विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

तुमच्या पैशांवर डल्ला

मोठी संकटे ही घोटाळेबाजांसाठी पर्वणी असते. सायबर भामटेही त्याला अपवाद नाहीत. २०२२मध्ये अशाच प्रकारे येणाऱ्या विविध संकटांत सायबर गुन्हेगार नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे प्रयत्न वाढवतील, अशी शक्यता आहे. साधेच उदाहरण द्यायचे झाले तर विमा कंपन्या किंवा सरकारकडून नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळणारी मदत लाटण्यासाठी लाभार्थीची ऑनलाइन ओळख चोरता येईल.  

डिजिटल पाळत वाढणार

सायबर गुन्हेगारांचा प्राथमिक उद्देश असतो पैसे कमावणे. तुमचे लॉगइन क्रेडेंशिअल मिळवण्यासाठी ते फििशग मोहिमा चालवतील किंवा लोकांकडून त्यांचे पेसे काढून घेण्यासाठी तांत्रिक पद्धतीचे घोटाळे करतील. मात्र, ऑनलाइनच्या वाढत्या वापराचा फायदा राजकीय हेतूने घेण्याचे प्रमाणही वाढणार आहे.  ‘हॅक्टिव्हिझम’ आणि सायबर दहशतवाद आधीपासूनच होते आणि २०२१ मध्ये त्यांनी अशी माहिती समोर आणली जी सरकारला गोपनीय ठेवायची होती. या हल्ल्यांची पोहोच आणि त्यांच्यामुळे घडणारा संभाव्य परिणाम पाहता हे हल्ले वाढले नाही तरी कायम राहतील.

कूटचलनात गुंतवणूक करणारे लक्ष्य

गेल्या वर्षभरात क्रिप्टोकरन्सी अर्थात कूटचलनातील गुंतवणुकीकडे ओढा वाढू लागला आहे. सुरक्षितता आणि कायदेशीर संरक्षण याबाबत पुरेशी स्पष्टता नसतानाही भरमसाट परतावा मिळवण्याच्या लालसेने अनेक जण या गुंतवणुकीकडे वळत आहेत. भारतात केंद्र सरकार कूटचलनावर निर्बंध आणण्याच्या तयारीत असले तरी या गुंतवणुकीकडे आकर्षित करणाऱ्या कंपन्या आणि अ‍ॅप यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भारतीयदेखील यात अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत. मात्र, यापैकी अनेकांना या व्यवहारांतील बारकावे कळत नाहीत. अशा उथळ गुंतवणूकदारांमध्ये असलेल्या गैरसमजांचा सायबर गुन्हेगार आपल्या आर्थिक फायद्यासाठी करू शकतात. गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या गुंतवणुकीवर डल्ला मारण्याचे प्रकार नवीन वर्षांत वाढतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल ओळख पक्की होणार

घरून काम करताय? झूमवरून तुमच्या डॉक्टारांशी बोलताय? वाणसामानाची ऑर्डर देताय आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवरून ऑर्डर्स घेताय? असे तुम्ही एकटेच नाही. कोविड १९ च्या जागतिक महासंकटाने संपूर्ण पृथ्वीला काम करणे, संवाद साधणे, तब्येतीची काळजी घेणे आणि अनेक व्यवहार करणे यासाठी दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतींचा अवलंब करण्यास भाग पाडले. तुम्ही कदाचित याआधीच तुमच्या मोबाइलवरून तुमच्या चालक परवान्याचे छायाचित्र काढून ती इमेज तुमची ओळख पटवण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी किंवा नोकरीसाठी अर्ज करताना ईमेल केली असेल किंवा मेसेज केला असेल. मात्र, त्यांचा वेगळय़ा कारणांसाठी गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आता अधिक सुरक्षित, बनावट तयार करता येणार नाहीत अशा, खासगीपणा जपणाऱ्या क्रेडेंशिअल्सची अत्यंत गरज आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान, आधुनिक क्रिप्टोग्राफी यासारख्या कम्प्युटिंगमधील नव्या संकल्पना आणि सुरक्षित हार्डवेअरमधील आधुनिकतेमुळे आयडेंटिटी स्टँडर्डसमधील पुढील पिढी घडवण्याचा भक्कम पाया मिळाला आहे.  त्याच वेळी जगभरातील सरकारे इलेक्ट्रॉनिक्स आयडेंटिफिकेशन (ईआयडी) च्या निर्मितीला वेग देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिकांना आपली ओळख पटवण्यासाठी चटकन आणि सहज ईआयडीचा वापर करता येईल. २०२२ आणि त्यानंतर डिजिटल आयडेंटिटीच्या जगतात वेगाने प्रगती होईल, असे सांगण्यात येत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि अ‍ॅडव्हान्स मशिन लर्निग आता अधिकाधिक लोकांना उपलब्ध होत आहे. वापरण्यास सोपे टूल्स उपलब्ध झाल्याने अनेक गोष्टी करणे सोपे होते. २०१८मध्ये बराक ओबामा यांच्या भाषणाची एक चित्रफीत वादग्रस्त ठरली होती. पण तपासाअंती ती ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेली खोटी चित्रफीत असल्याचे उघड झाले. असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. या किंवा आर्टिफिशियल तंत्रज्ञानातील अन्य खुबींचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढतील, असा अंदाज आहे.