दहीहंडी हा मराठी माणसासाठी एक खास उत्सव. कृष्णाच्या लीलांपैकी एक असणाऱ्या लीलेचे मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण झाले आणि आता तर त्याला व्यावसायिक रुपही प्राप्त झाले आहे. एकाहून एक थर लावत दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांची संख्या वाढली आणि त्यामुळे त्यातील स्पर्धाही. ठाणे हे दहीहंडीला प्रोत्साहन देणारे शहर म्हणून ओळखले जाते. याचठिकाणी एका मंडळाच्या दहीहंडीला १० थरांसाठी २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या मंडळाचे नाव स्वामी प्रतिष्ठान असून पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहेत. याबरोबरच भाजपाचे अनेक वरिष्ठ नेत्यांचीही यावेळी उपस्थिती असेल.

भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाचे अध्यक्ष व स्वामी प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील यांनी ही रक्कम जाहीर केली आहे. ही हंडी सामाजिक समरसतेप्रमाणे भारतरत्न दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणारी असेल. याचवेळी केरळमधील पुरग्रस्तांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लाखो रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

ही हंडी फोडण्यासाठी मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. दहा थर लावणाऱ्या गोविदा पथकाला २५ लाख तर ९ थर लावल्यास ११ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. महिलांसाठी आणि ठाणेकर गोविंदा पथकासाठी स्वतंत्र बक्षीसे असल्याचेही मंडळाकडून सांगण्यात आले. विविध थाराना मिळून एकूण ५० लाख रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात करण्यात येणार आहे.

यावेळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ठाणेकरांच्या मनोरंजनासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रुपाली भोसले, मिरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रिती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजीत कोसंबी आणि इतर चार गायक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. जोडीला जव्हार येथील आदिवासीचे तारपा नृत्य हे आणखीन एक आकर्षण ठरणार आहे. दहीहंडीच्या आदल्या दिवशी म्हणजे २ सष्टेंबरला सेलिब्रेटींची दहीहंडीही होणार आहे.