Brushing Mistakes: दात स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण रोज ब्रश करतो, तोंड ताजेतवाने राहावे म्हणून माउथवॉशचाही वापर करतो. तरीही काही दिवसांनी थंड किंवा गरम काहीही खाल्ले की दात कळायला लागतात. कधी हिरड्यांतून रक्त येते, तर कधी दाढ दुखू लागते. तोंडाची स्वच्छता ठेवूनही ओरल हेल्थ चांगली राहत नाही. यामागचे एक मोठे कारण म्हणजे दात स्वच्छ करण्याची चुकीची पद्धत. अनेकदा नकळत केलेल्या काही छोट्या चुका दात आणि हिरड्यांना मोठे नुकसान पोहोचवू शकतात. दंततज्ज्ञांच्या मते, ब्रश करताना होणाऱ्या काही चुका दातांवरील संरक्षणात्मक थर म्हणजेच एनॅमल (Enamel) झिजवतात आणि हिरड्यांत सूज किंवा रक्त येण्याची समस्या निर्माण करू शकतात.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील दंततज्ज्ञ आणि ओरल हेल्थ तज्ज्ञ मार्क बर्हेने (Mark Burhenne) यांच्या मते, लोक ब्रश करताना अशा काही चुका करतात ज्यामुळे हळूहळू दातांचा वरचा थर (एनॅमल), हिरड्या आणि संपूर्ण तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो. मार्क बर्हेने यांच्या या मताबाबत आम्ही Krown Hub Dental Clinic येथील प्रोस्थोडॉन्टिस्ट डॉ. नियाती अरोरा यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही याला दुजोरा देत सांगितले की, योग्य पद्धतीने ब्रश करण्याबरोबरच फ्लॉसिंग आणि नियमित दंत तपासणीही ओरल हेल्थसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे ही चांगली सवय आहे. मात्र, ब्रश करण्याची पद्धत चुकीची असेल तर याच सवयीमुळे दात आणि हिरड्यांचे नुकसान होऊ शकते. चला, तज्ज्ञांकडून जाणून घेऊया दात घासताना आपण कोणत्या चुका करतो आणि त्या कशा सुधारायच्या.

दात जोरात पुढे-मागे घासणे

अनेकजण दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश जोरात पुढे-मागे घासतात. तज्ज्ञांच्या मते, यामुळे दातांवरील एनॅमल झिजू शकतो आणि हिरड्यांनाही इजा होऊ शकते. त्याऐवजी ब्रश हलक्या हाताने गोलाकार (Circular Motion) फिरवणे अधिक योग्य मानले जाते. जर तुम्ही इलेक्ट्रिक टूथब्रश वापरत असाल, तर तो फक्त दातांवर हलक्या हाताने ठेवा आणि मशीनला त्याचे काम करू द्या.

ब्रश केल्यानंतर लगेच तोंड धुणे

ब्रश केल्यानंतर लगेच पाण्याने तोंड धुण्याची सवयही योग्य नाही. असे केल्याने टूथपेस्टमधील फ्लोराइड आणि इतर उपयुक्त घटक दातांवर पुरेसा वेळ टिकत नाहीत. त्यामुळे ब्रश केल्यानंतर अतिरिक्त टूथपेस्ट थुंकून टाका, पण लगेच पाण्याने चूळ भरू नका, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

कडक ब्रिसल्सचा टूथब्रश वापरणे

अनेकजण दात अधिक स्वच्छ होतील या समजुतीने हार्ड ब्रश वापरतात. मात्र, Medium किंवा Hard ब्रिसल्स असलेला ब्रश सतत वापरल्यास हिरड्या मागे सरकू शकतात (Gum Recession) आणि दातांची संवेदनशीलता (Sensitivity) वाढू शकते. त्यामुळे नेहमी Soft किंवा Ultra-Soft ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरणे योग्य ठरते.

एकाच टूथब्रशचा खूप दिवस वापर करणे

काही लोक महिनोनमहिने एकच टूथब्रश वापरत राहतात. त्यामुळे ब्रशचे केस झिजतात आणि दात नीट स्वच्छ होत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, दर तीन महिन्यांनी किंवा ब्रशचे ब्रिसल्स खराब झाल्यावर नवीन टूथब्रश वापरावा.

फक्त ब्रश करणे पुरेसे नाही

डॉ. नियाती अरोरा यांच्या मते, फक्त ब्रश केल्याने दातांच्या सर्व भागांची नीट स्वच्छता होत नाही. दातांच्या मधोमध अडकलेले अन्नकण आणि बॅक्टेरिया काढण्यासाठी फ्लॉसिंग, इंटरडेंटल ब्रशचा वापर आणि वेळोवेळी डेंटल स्केलिंग करणेही आवश्यक आहे. त्यामुळे कॅव्हिटी आणि हिरड्यांच्या आजारांचा धोका कमी होतो.

तोंडाचे आरोग्य संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी कसे जोडलेले आहे?

तज्ज्ञांच्या मते, खराब ओरल हेल्थचा परिणाम फक्त दातांपुरता मर्यादित राहत नाही. हिरड्यांचे आजार दीर्घकाळ राहिल्यास त्यातील बॅक्टेरिया रक्तप्रवाहात जाऊ शकतात. त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. अनेक संशोधनांमध्ये खराब ओरल हेल्थ आणि अल्झायमरसारख्या मेंदूशी संबंधित आजारांमध्येही संबंध आढळला आहे. त्यामुळे दात आणि हिरड्यांची नियमित काळजी घेणे हे केवळ तोंडाच्या नव्हे, तर संपूर्ण शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठीही आवश्यक मानले जाते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)