How much hair fall per day is normal? कंगवा करताना, केस धुतल्यानंतर किंवा उशीवर केस दिसले की अनेकांना चिंता वाटू लागते. ऋतू बदलताना केसगळती वाढल्याचं जाणवतं. मात्र, प्रत्येक वेळी केस गळण्यामागे हवामानच कारणीभूत असतं असं नाही. काही वेळा केस गळणं ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असते, तर काही लक्षणं केसांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्यांचा इशारा देऊ शकतात. मग रोज किती केस गळणं सामान्य आहे?

केसगळती कधी चिंतेचा विषय ठरते?

रोज ५० ते १०० केस गळणं सामान्य; पण त्यापेक्षा जास्त असल्यास सावध व्हा. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या (American Academy of Dermatology) माहितीनुसार, दिवसाला साधारण ५० ते १०० केस गळणं ही सामान्य बाब आहे. कारण केसांची वाढ एका ठराविक चक्रानुसार होत असते. जुन्या केसांच्या जागी नवीन केस येत असतात. त्यामुळे कंगवा करताना किंवा केस धुताना काही केस हातात येणं साहजिक आहे. मात्र, केस गळण्याचं प्रमाण सातत्याने वाढत असेल, केसांची घनता कमी होत असेल किंवा टाळूची त्वचा अधिक दिसू लागली असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

ऋतुमानानुसार केस गळणं की सामान्य हेअर फॉल?

काही लोकांना ऋतू बदलताना केसगळती जास्त जाणवते. काही काळानंतर ही समस्या कमी होऊ शकते. मात्र, प्रत्येक वेळी ऋतुमानातील बदल हेच केसगळतीचं कारण असतं असं नाही. सामान्य केसगळतीमध्ये जुने केस गळतात आणि त्यांच्या जागी नवीन केस येतात. केसांची एकूण घनता कायम राहत असेल, तर सहसा काळजी करण्याचं कारण नसतं. पण केस सतत गळत असतील आणि त्यांची जाडी कमी होत असेल, तर त्यामागील कारण शोधणं गरजेचं आहे.

केसगळतीची ‘ही’ ५ लक्षणं दिसत असतील तर सावध व्हा!

१. टाळूवर अचानक रिकामे पॅच दिसणे

डोक्यावरील एखाद्या ठिकाणचे केस अचानक गळून तिथे गोलाकार किंवा ठळक रिकामी जागा दिसू लागली, तर हे सामान्य केसगळतीचं लक्षण नाही. अशा वेळी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

२. केसांची भांग रुंद होऊ लागणे

पूर्वीच्या तुलनेत केसांची भांग अधिक रुंद दिसत असेल किंवा भांगेच्या ठिकाणी टाळूची त्वचा जास्त दिसू लागली असेल, तर केसांची घनता कमी होत असल्याचा हा संकेत असू शकतो.

३. काही महिन्यांत केसांची घनता कमी होणे

काही दिवसांत किंवा महिन्यांत केस पूर्वीपेक्षा विरळ दिसू लागले, पोनीटेलची जाडी कमी झाली किंवा केसांचा व्हॉल्यूम कमी झाल्याचं जाणवलं, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

४. टाळूला खाज, लालसरपणा किंवा पापुद्रे येणे

केसगळतीसोबत टाळूला सतत खाज येत असेल, लालसरपणा जाणवत असेल किंवा त्वचेवर पापुद्रे तयार होत असतील, तर टाळूशी संबंधित समस्या असू शकते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

५. अनेक महिने सतत केस गळत राहणे

काही दिवस केस जास्त गळणं आणि त्यानंतर ही समस्या कमी होणं वेगळं; पण अनेक महिने केसगळती सुरूच असेल, तर त्यामागे पोषणतत्त्वांची कमतरता, हार्मोन्समधील बदल किंवा इतर आरोग्यविषयक कारणं असू शकतात.

ताणतणाव, आजारपणानंतरही वाढू शकते केसगळती!

केस गळण्यामागे केवळ ऋतुमानातील बदल कारणीभूत नसतात. तीव्र ताप, गंभीर आजार, शस्त्रक्रिया, मानसिक ताणतणाव, अचानक वजन कमी होणं किंवा प्रसूतीनंतर होणारे हार्मोनल बदल यांचाही केसांच्या वाढीच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘टेलोजन एफ्लुव्हियम’ (Telogen Effluvium) म्हणतात. यामध्ये केसांच्या वाढीच्या चक्रावर परिणाम होऊन नेहमीपेक्षा जास्त केस गळू लागतात. विशेष म्हणजे, याचा परिणाम अनेकदा आजारपण किंवा तणावपूर्ण घटनेनंतर दोन ते चार महिन्यांनी दिसून येतो. अनेक प्रकरणांमध्ये मूळ कारण दूर झाल्यानंतर हळूहळू केसगळती कमी होऊ शकते.

केसगळतीकडे दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

केस सतत गळत असतील, टाळूवर रिकामे पॅच दिसत असतील किंवा केसांची घनता झपाट्याने कमी होत असेल, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टर आवश्यकतेनुसार थायरॉईड, आयर्नची कमतरता किंवा इतर संभाव्य कारणांसाठी रक्ततपासण्या सुचवू शकतात. स्वतःच्या मनाने हेअर ग्रोथ सप्लिमेंट्स किंवा औषधं घेणं टाळा. कारण केसगळतीचं नेमकं कारण समजून घेऊनच योग्य उपचार करणं महत्त्वाचं आहे.

केसगळती कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • आहारात प्रथिने, आयर्न आणि इतर आवश्यक पोषक घटकांचा समावेश करा.
  • केस खूप घट्ट बांधणं टाळा.
  • वारंवार हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि इतर हीट स्टायलिंग उपकरणांचा वापर करू नका.
  • ओल्या केसांना जोरात घासू नका किंवा ओढून कंगवा करू नका.
  • पुरेशी झोप घ्या आणि तणाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • केसगळती दीर्घकाळ सुरू असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

रोज काही केस गळणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, केसांची घनता कमी होणं, टाळूवर रिकामे पॅच दिसणं किंवा अनेक महिने केसगळती सुरू राहणं ही लक्षणं दुर्लक्षित करू नका. वेळेत कारण समजल्यास योग्य उपचार करणं सोपं होऊ शकतं.