Heart Healthy Natural Ingredient: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, ताणतणाव व व्यायामाचा अभाव यांमुळे अनेक गंभीर आजार लहान वयातच डोकं वर काढताना दिसत आहेत. हृदयविकार, मधुमेह, यकृताचे विकार आणि मूत्रपिंडांच्या समस्या आता केवळ वृद्धांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, असा प्रश्न अनेकांना पडतो.

तज्ज्ञांच्या मते, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला एक साधा पदार्थ शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. नियमित आणि योग्य पद्धतीनं त्याचा आहारात समावेश केल्यास हृदयाचं आरोग्य सुधारणे, यकृताचं कार्य सुरळीत ठेवणे आणि मूत्रपिंडांचे आरोग्य जपणे यांसाठी मदत होऊ शकते. इतकंच नाही, तर पचनक्रियाही सुधारण्यास त्याचा फायदा होतो.

आजकाल बाहेरचं तेलकट, तळलेलं आणि प्रक्रिया केलेलं अन्न खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर रक्तदाब, लठ्ठपणा आणि इतर अनेक आजारांची शक्यताही वाढते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतील असा संतुलित आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे.

माजी एम्स सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ. बिमल झांझेर यांच्या मते, नैसर्गिक अन्नपदार्थांसह योग्य आहार आणि नियमित हालचाल यांचा अवलंब केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करता येतो. मात्र, कोणताही एक पदार्थ हा सर्व आजारांवरचा चमत्कारिक उपाय नसतो. तो आरोग्यदायी जीवनशैलीचा एक भाग म्हणूनच उपयोगी ठरतो.

हृदयासाठी कसा होतो फायदा?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या पदार्थात असे नैसर्गिक घटक असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांचं आरोग्य जपण्यास मदत होते. काही संशोधनांमध्ये त्याचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही हातभार लागू शकतो, असं आढळलं आहे. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी संतुलित आहारासोबत या पदार्थाचाही मर्यादित प्रमाणात उपयोग होऊ शकतो.

‘हा’ पदार्थ यकृतासाठी का महत्त्वाचा?

यकृत हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं काम करतं. तज्ज्ञांच्या मते, या पदार्थातील काही नैसर्गिक घटक यकृतातील एंझाइम्स सक्रिय ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरातील अपायकारक द्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला हातभार लागू शकतो. तसेच यकृताच्या पेशींना होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळण्यासही मदत होऊ शकते.

मूत्रपिंडांसाठीही फायदेशीर

मूत्रपिंड शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं महत्त्वाचं काम करतात. तज्ज्ञांच्या मते, ‘या’ पदार्थामध्ये आढळणारे काही नैसर्गिक घटक मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र, मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांनी कोणताही घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

पचनक्रिया सुधारण्यास मदत

अनेकांना अपचन, गॅस, पोट फुगणं किंवा अन्न नीट न पचण्याचा त्रास होत असतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या पदार्थाचा नियमित आणि मर्यादित प्रमाणात वापर केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच आतड्यांमधील सूज कमी होण्यास आणि पोट हलकं राहण्यासही फायदा होऊ शकतो.

जाणून घ्या, तो पदार्थ कोणता?

इतका वेळ ज्याबद्दल चर्चा झाली, तो दुसरा-तिसरा कोणताही महागडा पदार्थ नाही. तो म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहजपणे आढळणारा लसूण.

तज्ज्ञांच्या मते, लसणामध्ये अ‍ॅलिसिन (Allicin), सल्फरयुक्त संयुगे आणि इतर अनेक नैसर्गिक घटक असतात. हे घटक हृदयाचं आरोग्य जपण्यास, यकृत आणि मूत्रपिंडांच्या कार्याला आधार देण्यास, तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. काही लोक सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खातात; मात्र, सर्वांसाठी ते योग्य असेल, असं नाही. विशेषतः रक्त पातळ करणारी औषधं घेणारे, पोटाचे विकार असलेले किंवा इतर आरोग्य समस्या असलेल्यांनी असा सल्ला पाळण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्वास्थ्य चागले राहण्यासाठी केवळ एका पदार्थावर अवलंबून न राहता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावावर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.