Rice Roti Or Dal Which is Healthier for Weight Loss : बहुतेक भारतीय घरांमध्ये भात, डाळ, भाजी, पोळी असे पोटभर खाल्ले जाणारे पदार्थ जेवणात बनवले जातात. पण, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी ही सोपी निवड अनेकदा गोंधळात टाकणारी ठरते. म्हणजे अनेक जण भाताने वजन वाढते म्हणून पोळीकडे वळतात. पण, तज्ज्ञांचे म्हणणे काहीतरी वेगळेच आहे. तुमच्या जेवणातला खरा हिरो तर डाळ असते.

दुपार असो किंवा रात्र; दोन्ही वेळेच्या जेवणांमध्ये डाळ सगळ्यात महत्त्वाची असते, असे आकाश हेल्थकेअरमधील वजन व्यवस्थापन आणि आहारतज्ज्ञ अनुजा गौर सांगतात. कारण डाळ प्रथिने, फायबर, आवश्यक पोषक तत्त्वांनी समृद्ध असते. डाळीमध्ये असणारे प्रथिने पचनक्रिया मंदावते, जास्त वेळ पोट भरलेले ठेवते आणि दिवसाच्या शेवटी अनावश्यक खाणे टाळण्यास मदत करते. वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून डाळ लोकांच्या कल्पनांपेक्षा खूप जास्त काम करत आहे.

तज्ज्ञांच्या मते समस्या अशी आहे की, डाळ बहुतेकदा जेवणाच्या मुख्य घटकाऐवजी साइड डिश म्हणून हाताळली जाते. भातामुळे वजन वाढतं असे अनेकदा म्हंटले जाते. पण, प्रत्यक्षात भात शरीरातील चरबी वाढवत नाही, कारण शिजवलेला तांदूळ जलद पचतो. पण, जास्त भात खाण्यानेदेखील रक्तातील साखर लवकर वाढू शकते हेही विसरून चालणार नाही बरं का”; असे क्लिनिकल डायटिशियन रिधिमा खामेसरा स्पष्ट करतात.

त्यामुळे डाळ-भात वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये नक्की बसू शकतो; जर तुमच्या जेवणाचे ताट योग्य प्रकारे वाढले असेल तर. म्हणजेच तुमच्या ताटात थोडा भात, भरपूर डाळ, भाज्या आणि कमी तेल असं अन्न असेल तर वजन कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. विशेषतः शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या, नियमितपणे चालणाऱ्या किंवा लवकर जेवण करणाऱ्या लोकांसाठी…

पोळी, विशेषतः जेव्हा संपूर्ण गहू किंवा बाजरीच्या डाळीपासून बनवली जाते, तेव्हा त्यात पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त फायबर असते. फायबर पचन मंदावते आणि बराच वेळ भूक लागत नाही, म्हणूनच डाळ आणि पोळी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसारख्या, बैठी जीवनशैली असलेल्या लोकांसाठी चांगली ठरू शकते. त्याचबरोबर जेवणाच्या दरम्यान भूक नियंत्रित करण्यास मदत करते.

पोळी वजन कमी करण्यासाठी हलकी किंवा डाएटसाठी चांगली असते असे नाही. जर आपण ४ ते ५ पोळ्या खाल्ल्या, पराठे खाल्ले किंवा त्यावर जास्त लोणी किंवा तूप लावले, तर वजन कमी होऊ शकत नाही; त्यामुळे पोळी हा पोटासाठी हलका पर्याय नाही तर फक्त हळू पचणारे अन्न आहे.

भात किंवा पोळी नाही; तुम्ही ते किती प्रमाणात खाता हे महत्त्वाचं…

दोन्ही तज्ज्ञ सहमत आहेत की, जर तुम्हाला भात आवडत असेल तर ते एका लहान वाटीपुरते मर्यादित ठेवा आणि डाळ, भाज्या खाण्याचे प्रमाण वाढवा. जर तुम्हाला पोळी खायला आवडत असेल, तर १ किंवा २ पोळ्यांपर्यंत मर्यादित ठेवा आणि पराठे खाणे टाळा. तुमच्या जेवणात सॅलेड किंवा हिरव्या भाज्या घाला, यामुळे पोट भरल्यासारखे वाटेल, पण जास्त कॅलरी शरीरात जाणार नाहीत. वजन कमी होणे हे तुम्ही किती खाता, तुम्हाला पुन्हा किती वेळा भूक लागते आणि तुम्ही किती सक्रिय आहात यावर अवलंबून असते.

मदत करू शकणारे छोटे बदल

पांढऱ्या तांदळाऐवजी तपकिरी तांदूळ, बाजरी किंवा हाताने कुटलेला तांदूळ निवडल्याने फायबरचे सेवन सुधारू शकते. त्याचप्रमाणे मल्टीग्रेन किंवा बाजरीच्या भाकऱ्या हे रिफाइंड मैद्यापेक्षा चांगले पर्याय आहेत. हे बदल पचन सुधारतात, पोट भरल्याची भावना देतात; ज्यामुळे तुमच्या खाण्याच्या पद्धतीशी सुसंगत राहणे सोपे जाते.

डाळ-भात किंवा डाळ-पोळी; दोन्हीही वाईट नाही…

वजन वाढणे किंवा कमी होणे हे फक्त एका पदार्थावर अवलंबून नसते. तुम्ही किती खातात (प्रमाण), कसे बनवले आहे (तेल, तूप इत्यादी), दिवसभर किती हालचाल करता यावर अवलंबून असते. बर्‍याच लोकांसाठी डाळ-पोळी नियंत्रित प्रमाणात खाल्ल्यास वजन कमी करण्यासाठी थोडी सोपी वाटू शकते. पण डाळ-भातही तितकाच हेल्दी असू शकतो, जर तो योग्य प्रमाणात आणि विचारपूर्वक (जास्त भात न घेता, डाळ आणि भाज्या जास्त घेऊन) खाल्ला तर. साधे अन्न खा, तुमच्या प्रमाणावर लक्ष ठेवा, सक्रिय रहा आणि सातत्य ठेवा. हेच खरोखर दीर्घकालीन वजन कमी करण्यास समर्थन देते.