Fatty Liver Symptoms: लिव्हर हा मानवी शरीरातील दुसरा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अवयव आहे. तो अन्न पचनापासून ते विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यापर्यंत ५००हून अधिक कार्ये करतो. तसंच आजच्या खालावलेल्या जीवनशैलीमुळे जंक फूड, अति मद्यपान आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे लिव्हरशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. लिव्हरची सर्वात महत्त्वाची आणि गभीर बाब हीच आहे की, सुरूवातीच्या टप्प्यात काही समस्या उद्भवल्यास शरीर लगेच कोणतीही लक्षणे दाखवत नाही.
आरोग्य तज्ज्ञ आणि लिव्हर तज्ज्ञांच्या मते, जेव्हा लिव्हरची कोणतीही समस्या सुरू होते, तेव्हा शरीर त्वचा, पचनक्रिया आणि ऊर्जेच्या पातळीद्वारे काही सुरूवातीचे संकेत देऊ लागते. जर ही लक्षणे लवकरात लवकर ओळखली गेली तर लिव्हरला गंभीर नुकसान होण्यापूर्वी किंवा लिव्हर सिरोसिससारखी जीवघेणी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी ते पूर्णपणे बरे केले जाऊ शकते. जनरल फिजिशियन, कन्सल्टंट फिजिशियन आणि इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. शालिनी सिंग साळुंके सांगतात की, लिव्हरचे नुकसान होत असल्याची लक्षणे लवकर ओळखल्यास या समस्या वेळेत सुधारता येतात. तर तज्ज्ञांकडून लक्षणांबाबत अधिक माहिती जाणून घेऊया…
जेवणानंतर पोट फुगणे
तज्ज्ञ सांगतात की, जेवणानंतर पोट फुगणे हे फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते. तसंच पोट फुगण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे केवळ या लक्षणाच्या आधारावर फॅटी लिव्हरचे निदान करता येत नाही. लिव्हरचे मुख्य कार्य पचनासाठी पित्त तयार करणे हे आहे. जेव्हा लिव्हरच्या पेशींमध्ये अतिरिक्त चरबी जमा होते, तेव्हा त्याचा परिणाम पाचक एन्झाइम्स आणि पित्ताच्या स्त्रावावर होऊ शकतो. यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही, परिणामी गॅस आणि पोट फुगते.
पोटाच्या उजव्या वरच्या भागात जडपणा
लिव्हर शरीराच्या वरच्या उजव्या भागात, बरगड्यांच्या अगदी खाली स्थित असते. लिव्हरच्या काही समस्यांमुळे या भागात वेदना, दाब, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. तसंच या प्रकारची वेदना नेहमीच लिव्हरच्या आजाराचे लक्षण नसते. सतत किंवा वारंवार होणाऱ्या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
खूप थकवा आणि अशक्तपणा
लिव्हरच्या काही आजारांमुळे सतत थकवा, अशक्तपणा आणि ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. पुरेशी झोप घेऊनही सुस्ती जाणवत असेल आणि दैनंदिन कामं करताना त्रास होत असेल तर याची अनेक कारणं असू शकतात. केवळ थकव्याच्या आधारावर लिव्हरच्या आजाराचे निदान करता येत नाही, त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
त्वचा आणि डोळे पिवळे
कावीळ हे लिव्हरच्या समस्येचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. डोळ्यांचा पांढरा भाग आणि त्वचा पिवळी दिसते. शरीरातील बिलीरूबिनची पातळी वाढल्यामुळे अशे होऊ शकते. इतर अनेक कारणांमुळे कावीळ होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला त्वचा किंवा डोळे पिवळे झालेले दिसले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
भूक न लागणे, वजन कमी होणे
लिव्हरच्या काही आजारांमुळे भूक मंदावते किंवा अन्नाबद्दलची आवड कमी होते. दीर्घकाळ भूक न लागल्यामुळे वजनही कमी होऊ शकते.. जर कोणत्याही विशेष प्रयत्नांशिवाय वजन कमी होत राहिले आणि त्यासोबत इतर लक्षणेही दिसत असतील, तर त्याकडे केवळ साधा अशक्तपणा म्हणून दुर्लक्ष करू नये.
मळमळ किंवा उलट्या
लिव्हरच्या काही समस्यांमुळे मळमळ, उलट्या किंवा पोटात अस्वस्थता यासारखी लक्षणे दिसू शकतात. काही लोकांना जेवणानंतर जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. तसंच मळमळ आणि उलट्या अपचन, संसर्ग किंवा पोटाच्या समस्या यासारख्या इतर अनेक कारणांमुळे देखील होऊ शकतात. त्यामुळे केवळ या लक्षणाच्या आधारावर लिव्हरचा आजार आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.
लघवी आणि शौचाचा रंग गडद होणे
लघवी आणि शौच नेहमीपेक्षा जास्त गडद, म्हणजेच पिवळे किंवा तपकिरी रंगाचे असणे हे काहीवेळा लिव्हर किंवा पित्तमार्गाच्या समस्येशी संबंधित असू शकते. डिहायड्रेशनमुळे देखील लघवी गडद दिसू शकते. जर हा बदल कायम राहिला किंवा त्यासोबत इतर लक्षणे दिसली तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात आणि जीवनशैलीत हे बदल करा
- लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी केवळ शरीराला हायड्रेटेड ठेवत नाही, तर लिव्हरचे कार्य सरळीत चालण्यास मदत करते.
- तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी अनहेल्दी आणि ट्रान्स फॅट्सऐवजी आरोग्यदायी फॅट्सचे सेवन करा. आहारात अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑईल, सुकामेवा आणि फॅटी फिशचा समावेश करा.
- आहारात सुकामेवा आणि बियांचा समावेश करा. हेल्दी फॅट, फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आहारात बदाम, अक्रोड, चिया सीड्स, जवस आणि भोपळ्याच्या बियांचा समावेश करा.
- आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. फायबरयुक्त पदार्थ निरोगी पचनसंस्था आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
- लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
- वजन नियंत्रणात ठेवा आणि शरीर सक्रीय ठेवा. दररोज चाला आणि व्यायाम करा.
- मद्यपानामुळे लिव्हरचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे ते टाळा.
- कोल्ड्रिंक्स, गोड पॅकेज्ड ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स आणि जास्त साखर असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित करा.
- रक्तातील साखर, ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉलमधील असंतुलनाचा संबंध फॅटी लिव्हरशी असू शकतो. नियमित तपासणी आणि तज्ज्ञांनी दिलेल्या उपचारांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे.
