Deepika Kakkar Liver Cancer: टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर अलीकडेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये दिसली. तिथे ती आपल्या यकृत कर्करोगाच्या प्रवासाबद्दल उघडपणे बोलली. दीपिकानं सांगितलं, “माझ्या बाबतीत सर्वांत मोठं भाग्य म्हणजे माझा कर्करोग फक्त ट्यूमरच्या मर्यादेत होता. तो शरीराच्या इतर भागांपर्यंत पसरलेला नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी माझ्या यकृताचा जवळपास २२ टक्के म्हणजेच ११ सेंटीमीटरचा भाग कापून टाकला. त्याचबरोबर ट्यूमरही बाहेर काढला. सध्या मी केमोथेरपी घेत आहे; पण माझ्या सर्व तपासण्या चांगल्या येत आहेत.”

हे ऐकल्यावर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, एवढा मोठा भाग काढून टाकल्यानंतर शरीर कसं टिकून राहतं? एवढं करूनही माणूस कसा जगू शकतो? या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत रोचक आहेत.

यकृताचा किती भाग काढला किंवा दान केला जाऊ शकतो?

‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’च्या अहवालानुसार, यकृत हा शरीराच्या उजव्या बाजूस, बरगड्यांच्या खाली, पोट आणि डायफ्रामच्या मधोमध असतो. प्रौढ व्यक्तीचे निरोगी यकृत सुमारे १.२ ते १.८ किलो वजनाचे असते.

वैद्यकीय संशोधनानुसार, काही विशेष परिस्थितींमध्ये यकृताचा ५० ते ७० टक्के भाग काढला किंवा दान केला जाऊ शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे यकृत हा शरीरातील एकमेव असा अवयव आहे, जो स्वतःहून पुन्हा तयार होऊ शकतो.
म्हणजेच जर यकृताचा काही भाग दान केला किंवा शस्त्रक्रियेत काढला गेला तरी तो भाग पुन्हा वाढून आपल्या मूळ आकारात येतो.

यकृताला पुन्हा तयार होण्यासाठी किती वेळ लागतो?

वैद्यकीय अहवाल सांगतात की, यकृत आपला ५० ते ७० टक्के भाग केवळ ७ ते १० दिवसांत पुन्हा तयार करते.
सुमारे दीड ते दोन महिन्यांत त्याचा ९५ टक्के भाग पुन्हा वाढतो आणि सहा महिन्यांत यकृत पूर्ण कार्यक्षम अवस्थेत परत येते. म्हणूनच दीपिकाचं यकृतही आता हळूहळू आपल्या नैसर्गिक स्थितीत परत येत आहे.

यकृत एवढा महत्त्वाचं का?

यकृत हा आपल्या शरीरातील सर्वांत मोठा अंतर्गत अवयव आहे, जो तब्बल ५०० हून अधिक कार्यं पार पाडतो.
तो शरीरातील विषारी द्रव्यं काढून टाकतो, अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करतो, पचनक्रियेत मदत करतो, रक्ताचं शुद्धीकरण करतो आणि साठवतो, तसेच रक्त गोठण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी आवश्यक प्रथिनं तयार करतो.
म्हणूनच यकृताशिवाय शरीराचं कार्य पूर्णपणे थांबू शकतं.

यकृताचा काही भाग काढल्यास जीवनावर परिणाम होतो का?

तज्ज्ञ सांगतात नाही! यकृताचा काही भाग काढल्यानं जीवनावर फारसा परिणाम होत नाही. कारण- तो अवयव स्वतःला पुन्हा तयार करण्याची अदभुत क्षमता ठेवतो. ज्यांनी यकृताचा काही भाग दान केला तरी ते ६ ते १२ आठवड्यांत आपल्या सामान्य जीवनशैलीत परत येतात. तसेच, ज्याच्या शरीरात यकृताचा भाग प्रत्यारोपित करण्यात आलं, तेही त्याच कालावधीत कार्यक्षम होतात.

निरोगी यकृतासाठी काय काळजी घ्यावी?

  • मद्यपान आणि धूम्रपान टाळा
  • संतुलित आहार घ्या
  • शारीरिक हालचाल वाढवा
  • आणि नियमित आरोग्य तपासणी करा

या सवयी यकृताला दीर्घकाळ निरोगी ठेवतात आणि त्याला थेट नुकसानापासून वाचवतात.

दीपिका कक्करचं उदाहरण हे याचं उत्तम दर्शन घडवतं. अवयव काढल्यानंतरही शरीर कार्यरत राहू शकतं. कारण- निसर्गानं त्याला स्वतःला पुन्हा घडवण्याची विलक्षण शक्ती दिली आहे.