Deepika Padukone’s Second Pregnancy : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या घरी पुन्हा एकदा लहान बाळाचं आगमन होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चिमुकल्या दुआने प्रेगन्न्सी पॉझिटिव्ह किट हातात धरलेला एक अत्यंत गोंडस फोटो या जोडप्याने शेअर केला आहे. त्यातून त्यांनी आपल्या दुसऱ्या बाळाची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.
दीपिका आणि रणवीरने ८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांची पहिली मुलगी दुआ हिचे स्वागत केले, जी आता एक वर्ष आणि सात महिन्यांची आहे. दुआच्या जन्मानंतर दीपिकाच्या दुसऱ्या गर्भधारणेच्या बातमीने पुन्हा एकदा एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आणला आहे आणि तो म्हणजे दोन मुलांमध्ये वयाचे योग्य अंतर किती असावे?
हा प्रश्न केवळ सेलिब्रिटींपुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक पालकासाठी महत्त्वाचा आहे. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी योग्य वेळी दुसऱ्या बाळाचे नियोजन करणे आवश्यक मानले जाते. डॉक्टरांच्या मते, मुलांमध्ये खूप कमी किंवा खूप जास्त अंतर ठेवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दोन मुलांमधील वयाचे अंतर किती असावे ते समजून घेऊ..
दोन मुलांमध्ये वयाचे किती अंतर असावे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ञांनुसार, दोन गर्भधारणांमधील आदर्श अंतर साधारणपणे १८ ते २४ महिन्यांचे असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, याचा अर्थ असा की, मागील प्रसूतीनंतर पुन्हा गर्भधारणा करण्यापूर्वी किमान दीड वर्ष थांबावे.
आरोग्य तज्ज्ञांनी नमूद केले की, या अंतरामुळे आईच्या शरीराला शारीरिकदृष्ट्या सावरण्यासाठी आणि लोह व कॅल्शियमसारख्या आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे अकाली जन्म, बाळाचे कमी वजन आणि आईच्या आरोग्याच्या समस्या यांसारख्या गुंतागुंतीचा धोकाही कमी होतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दोन मुलांमध्ये किमान दोन ते तीन वर्षांचे अंतर असणे उत्तम असते. या वेळेच्या अंतरामुळे आईच्या शरीराला पूर्णपणे बरे होण्यास आणि पुढच्या मुलासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत होते.
कमी कालावधी (१२ महिन्यांपेक्षा कमी) असणे आई आणि बाळ या दोघांसाठीही जास्त जोखमीचे असते. तसेच खूप जास्त कालावधी (पा वर्षांपेक्षा जास्त) असण्यामुळेही काही विशिष्ट धोके निर्माण होऊ शकतात.
आईच्या आरोग्यासाठी हे अंतर का महत्त्वाचे?
गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर शरीराला पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो. खूप लवकर पुन्हा गरोदर राहिल्याने ॲनिमिया, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
पहिल्या मुलाच्या विकासावर होणारा परिणाम
जर मुलांमध्ये वयाचे अंतर खूप कमी असेल, तर पहिल्या मुलासाठी पुरेसा वेळ आणि त्याच्याकडे लक्ष देणे मिळत नाही. मुलाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी दोन-तीन वर्षांचे वयाचे अंतर आदर्श मानले जाते. दोन मुलांमधील वयाचे जास्त अंतर ठेवणेदेखील आदर्श नसते. पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या अंतरामुळे दोन्ही मुलांमध्ये सलोखा टिकवून ठेवणे कठीण जाऊ शकते. दोघांचे वय आणि आवडीनिवडी यांमध्ये लक्षणीय फरक पडतो, ज्यामुळे त्यांच्यातील नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो.
मुलांमध्ये वयाचे योग्य अंतर ठेवल्याने पालकांना दोन्ही मुलांकडे अधिक वेळ आणि लक्ष देता येते, ज्यामुळे त्यांच्या संतुलित विकासाला चालना मिळते आणि त्यांचे नातेसंबंध अधिक दृढ होतात. डॉक्टरांच्या मते, दुसऱ्या मुलाचे नियोजन करण्यापूर्वी स्त्रीचे आरोग्य आणि जीवनशैली विचारात घेणे महत्त्वाचे आहे. हे अंतर कुटुंबाच्या शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलनासाठीदेखील महत्त्वाचे असते.
