Dengue Fever Effects On Brain Low Platelet : डेंग्यूमध्ये सामान्यतः तीव्र ताप, शरीरात वेदना आणि प्लेटलेट्स कमी होणं, अशक्तपणा ही लक्षणं जाणवतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, गंभीर परिस्थितीमध्ये डेंग्यूचा प्रभाव मेंदू आणि मज्जासंस्थेवर देखील होऊ शकतो, काही रुग्णांमध्ये गोंधळ उडणे, चक्कर येणे, झटके येणे आणि मानसिक स्थितीमध्ये बदल होणे यांसारखी लक्षणे दिसून येऊ शकतात. डेंगू नेमका मेंदूवर कसा प्रभाव पाडतो आणि ही लक्षणे कशी ओळखायची? याविषयी पीएसआरआई हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार, पल्मोनोलॉजी, क्रिटिकल केयर अँड स्लीप मेडिसिन तज्ज्ञ डॉ. नीतू जैन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. डेंग्यूचा मेंदूवर काय परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये जाणून घेऊ…

डेंग्यू झाल्यावर दिसतात ‘ही’ लक्षणे

डेंग्यू झाल्यावर काही रुग्णांच्या मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. रुग्णाला संभ्रम होणे, सतत झोप अनावर होणे, अस्वस्थता वाटणे, अज्ञानात जाणे किंवा झटके येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. मात्र, प्रत्येक डेंग्यूच्या रुग्णात असे घडेलच असे नाही. हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की, डेंग्यूमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होणे हाच केवळ आजार गंभीर असण्याचा एकमेव पुरावा नाही. जर रुग्णाला तीव्र डोकेदुखीसह गोंधळ उडणे, असामान्य वर्तन करणे, वारंवार उलट्या होणे, झटके येणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे जाणवली, तर त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले पाहिजे. या लक्षणांना साधा ताप किंवा अशक्तपणा समजून दुर्लक्षित करू नका.

‘या’ कारणांमुळे होऊ शकतो मेंदूवर परिणाम

डेंग्यूच्या काळात मेंदूवर परिणाम होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. काही परिस्थितीमध्ये हा विषाणू थेट मेंदूला प्रभावित करू शकतो, तर काही गंभीर संसर्गामुळे शरीरात होणारे बदल, यकृताची (liver) अकार्यक्षमता, रक्तातील साखरेचे प्रमाण (blood sugar) कमी होणे किंवा शरीरातील सोडियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल बिघडणे हे देखील यामागचे कारण असू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये मेंदूला रक्ताचा योग्य पुरवठा न होणे हेसुद्धा एक मुख्य कारण ठरू शकते.

डॉक्टर काय म्हणतात?

डेंग्यूच्या रुग्णांवर नियमित लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. डॉक्टर रुग्णाची चेतना पातळी, रक्तदाब, रक्तातील साखर, प्लेटलेट्स आणि इतर आवश्यक तपासण्यांच्या आधारे उपचारांची दिशा ठरवतात. योग्य वेळी आजार ओळखल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास गंभीर गुंतागुंतीचा धोका टळू शकतो.