Desk Job Health Risks: सध्याच्या काळात डेस्क जॉब, तासन्तास स्क्रीनसमोर बसून काम, लांबचा प्रवास आणि मोकळ्या वेळेत सोफ्यावर बसून राहण्याची सवय यामुळे आपल्या दैनंदिन हालचाली मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. जास्त वेळ बसण्याचा परिणाम केवळ पाठदुखी किंवा वजन वाढण्यापुरता मर्यादित आहे असं नाही. सतत निष्क्रिय राहण्याची जीवनशैली शरीराच्या मेटाबॉलिक आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते आणि त्याचा संबंध मेंदूच्या आरोग्याशीही असू शकतो.
न्यूरोलॉजिस्ट डॉ. कुणाल बहरानी यांच्या मते, दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्याने हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, लठ्ठपणा आणि रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या वाढू शकतात. हे घटक दीर्घकाळात मेंदूच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे ठरतात.
तासन्तास बसण्याचा मेंदूवर नेमका काय परिणाम होऊ शकतो?
काही संशोधनांमध्ये जास्त वेळ बसणे आणि खराब कॉग्निटिव्ह हेल्थ यांच्यात संबंध आढळला आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की जास्त वेळ बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्मरणशक्तीची समस्या किंवा डिमेंशिया होणारच. खरी चिंता आहे ती सतत निष्क्रिय राहण्याच्या जीवनशैलीची. दिवसभर शरीराची हालचाल कमी असणे, व्यायामाचा अभाव आणि दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणे यामुळे एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
संध्याकाळी ३०-४५ मिनिटांचा व्यायाम पुरेसा आहे का?
जिममध्ये ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करणे निश्चितच फायदेशीर आहे. मात्र, दिवसभर सलग बसून राहण्याची सवय केवळ संध्याकाळच्या वर्कआउटने पूर्णपणे भरून निघेलच असे नाही. त्यामुळे दिवसभरात छोटे-छोटे अॅक्टिव्हिटी ब्रेक घेणे अधिक चांगली सवय ठरू शकते.
- फोनवर बोलताना काही मिनिटे चालणे
- ऑनलाइन मीटिंगमध्ये शक्य असल्यास मध्ये उठून हालचाल करणे
- लिफ्टऐवजी काही वेळा पायऱ्यांचा वापर करणे
- जेवणानंतर काही मिनिटे चालणे
- कामाच्या दरम्यान उठून हलके स्ट्रेचिंग करणे
छोट्या हालचाली दिवसातील एकूण निष्क्रिय वेळ कमी करण्यास मदत करू शकतात.
सतत बसल्यामुळे ‘ब्रेन फॉग’ होतो का?
दीर्घकाळ डेस्कवर काम केल्यानंतर लक्ष केंद्रित करण्यात अडचण, मानसिक थकवा किंवा विचार करण्याची क्षमता कमी झाल्यासारखे वाटू शकते. यालाच अनेक जण ‘ब्रेन फॉग’ म्हणतात. मात्र, यासाठी फक्त जास्त वेळ बसणे हेच कारण असेल असे नाही. सतत स्क्रीन पाहणे, कमी पाणी पिणे, वेळेवर न खाणे, मानसिक ताण आणि अपुरी झोप यामुळेही एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
अशावेळी काही मिनिटांसाठी स्क्रीनपासून दूर जाणे, उठून चालणे, पाणी पिणे आणि थोडा ब्रेक घेणे उपयोगी ठरू शकते.
डॉक्टर काय सल्ला देतात?
आपण दिवसातून नेमके किती तास बसतो, याची गणना करण्यापेक्षा शेवटचा कधी खुर्चीतून उठलो होतो याकडे लक्ष देणे अधिक सोपे आहे. सलग अनेक तास बसून राहण्याऐवजी मध्येच उठून काही मिनिटे चालणे किंवा स्ट्रेचिंग करणे चांगली सवय ठरू शकते. मेंदूच्या आरोग्यासाठी नियमित शारीरिक हालचालींसोबत पुरेशी झोप, संतुलित आहार आणि ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणेही महत्त्वाचे आहे.
हे कायम लक्षात ठेवा…
बसणे हे वाईट नाही. मात्र, सलग अनेक तास कोणतीही हालचाल न करता बसणे आणि संपूर्ण दिवस अत्यंत कमी शारीरिक हालचाल करणे ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे मोठा बदल करण्याची वाट पाहण्यापेक्षा आजपासूनच छोट्या सवयी सुरू करा. कामाच्या मध्ये उठणे, काही मिनिटे चालणे, स्क्रीनपासून ब्रेक घेणे आणि दिवसभर शरीर सक्रिय ठेवणे हे छोटे बदल एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
