Dharmendra Fitness: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र ३१ ऑक्टोबरपासून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, मंगळवारी अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. यादरम्यान धर्मेंद्र यांच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे.

या सगळ्या दरम्यान सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचे जुने व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. यामध्ये ते त्यांच्या फिटनेस रूटीनबाबत सांगताना दिसत आहेत. एकेकाळी बॉलिवूडचा ही-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचे ८८व्या वर्षीचे व्यायाम लाखोंना प्रेरणा देत आहेत. या व्हिडीओजमध्ये ते वेट ट्रेनिंग आणि स्विमिंग पूलमध्ये व्यायाम करताना दिसले होते.

धर्मेंद्र अनेकदा त्यांच्या इंस्टाग्रामवर व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर करतात. जिम आणि स्विमिंग पूल फिटनेस क्लासेसमध्ये सहभागी होतात. एका व्हिडीओमध्ये ते हसत म्हणत आहेत की, मित्रांनो, मी व्यायाम आणि फिजिओथेरपी सुरू केली आहे. मला वाटतं मला पाहून तुम्हाला आनंद होईल. माझे मसल्स पहा.” या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र अत्यंत उत्साही दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत वेट ट्रेनिंग आणि पोहणे या दोन गोष्टी समाविष्ट केल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचे शरीर सक्रिय आणि मजबूत राहिले.

धर्मेंद्र यांना वेट ट्रेनिंग खूपच फायदेशीर वाटते. त्यामागची कारणं जाणून घ्या…

स्नायूंची मजबूती- वेट ट्रेनिंग स्नायूंना बळकटी देते आणि त्यांचा आकार वाढवते.

चयापचयात वाढ- नियमित व्यायामामुळे चयापचय वाढतो, त्यामुळे शरीराला कॅलरीज लवकर बर्न करण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहते.

हाडांची ताकद- वजन उचलल्याने हाडांची मजबूती वाढते. वय वाढत असतानाही शरीर मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे, जणेकरून तुम्ही सक्रीय राहू शकाल असं मत धर्मेंद्र यांनी व्यक्त केलं होतं.

दुखापतीपासून बचाव- वेट ट्रेनिंगमुळे केवळ स्नायूच नव्हे तर सांधे आणि हाडेदेखील मजबूत होतात, त्यामुळे दुखापत झाल्यास त्रास कमी होतो.

झोप सुधारते- व्यायाम केल्यानंतर शरीर आराम करते. त्यामुळे चांगली झोप येते आणि ताण कमी होतो.

धर्मेंद्र यांचा फिटनेस मंत्र

धर्मेंद्र यांनी त्यांच्या व्हिडीओजमधून वेळोवेळी सांगितले आहे की, तंदुरूस्त राहणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराला व्यायामाची सवय लावली नाही तर ते हळूहळू काम करणे थांबते. मी दररोज व्यायाम करतो. मग ते वजन उचलणे असो किंवा स्विमिंग पूलमध्ये काही व्यायाम करणे असो.”

धर्मेंद्र यांच्या उत्साह आणि जिद्दीने दाखवून दिले की फिटनेस करण्यासाठी वय महत्त्वाचे नसते. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती आणि नियमितता गरजेची आहे. धर्मेंद्र यांचा हा फिटनसे मंत्र केवळ त्यांचे चाहतेच फॉलो करत नाहीत, तर त्यांची मुलंदेखील करतात. त्याबाबत ते सोशल मीडियावर पोस्टही करत असतात. या वयात धर्मेंद्र हे तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.