Summer Tips For Managing Diabetes : उन्हाचा कडाका वेगाने वाढतोय. अचानक होणाऱ्या तापमानवाढीबरोबर शरीरालाही याच्याशी जुळवून घ्यावे लागतेय. त्याचा थेट परिणाम शरीरावर होत असल्याने अनेक आरोग्य समस्याही निर्माण होत आहेत. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, तसेच उष्णता वेगाने वाढते अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांना प्रचंड त्रास होतो. पण, तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून मधुमेहापासून आराम मिळवू शकता.
उन्हातून घरी आल्यानंतर किंवा ऑफिसला पोहोचल्यानंतर थोडा वेळ शांत बसा. त्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा. त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही शांत करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तणाव कमी होतो. थोडा वेळ चालल्यानेही शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
ज्या लोकांची साखरेची पातळी मर्यादेपलीकडे जात आहे किंवा ज्यांना अजूनही वाटते की, त्यांना कोणतीही समस्या जाणवत नाही, त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. बहुतेक लोकांना प्री-डायबिटीजची लक्षणे समजत नाहीत. पण, चाचणीनंतर जेव्हा त्याचे निदान होते, तोपर्यंत शरीर मधुमेहाच्या दिशेने वाटचाल करत असते. त्यामुळे देशात सुमारे ११ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि सुमारे १४ कोटी लोक प्री-डायबिटीजच्या विळख्यात आहेत. याचा अर्थ असा की, मधुमेह अजून पूर्णपणे विकसित झालेला नाही; परंतु धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे?
कमी पाणी पिणे, जास्त गोड पदार्थ व थंड पेये घेणे, सुस्तपणा, हालचाल न करणे आणि पोटावरील चरबी वाढणे या सर्व गोष्टींमुळे मधुमेह वाढू शकतो. त्यामुळे वेळेवर नियंत्रण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज थोडे चाला, तणाव कमी करा, वजन नियंत्रणात ठेवा, पुरेशी झोप घ्या आणि रक्तातील साखरेची तपासणी करण्यास टाळाटाळ करू नका. कारण- योग्य वेळी उचललेली छोटी पावलेदेखील मधुमेह आणि त्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात.
मधुमेहाची लक्षणे आणि उपाय
जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, जास्त भूक लागणे, वजन कमी होणे, चिडचिड, थकवा, अशक्तपणा व अंधुक दिसणे हे मधुमेहाचे संकेत असू शकतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे हे मेंदू, डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंडे आणि सांध्यांसाठी हानिकारक ठरू शकते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी-कारले-टोमॅटोचा रस घ्या, गुळवेलीचा काढा प्या, १५ मिनिटे मंडुकासन-योगमुद्रासन व कपालभाती करा. रोज एक चमचा मेथीची पूड खा, सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या खा, कोबी-कारले-भोपळा खा आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा.
