Diabetes-High BP Attack: भारतीय लोकांमध्ये दीर्घकालीन आजारांचा धोका सातत्याने वाढताना दिसत आहे. डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, लिव्हर-किडनीचे आजार आणि कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे केवळ वयस्कर लोकांनाच नाही तर आता लहान मुलेही या आजारांना बळी पडत आहेत. भारतीय मुलांमध्ये ‘फॅटी लिव्हर’ची समस्या झपाट्याने वाढतेय, ज्यावर ‘वर्ल्ड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी काँग्रेस-२०२६’ मधील तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एकाच रुग्णाला एकापेक्षा जास्त आजार होण्याचा धोका असतो. यामुळे शरीरातील गुंतागुंत आणखी वाढते. डायबिटीज असणाऱ्या रुग्णांमध्ये हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवणे हे याचेच एक उदाहरण आहे. जेव्हा हे दोन्ही आजार एकत्र होतात, तेव्हा हृदय, रक्तवाहिन्या आणि किडनी यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर प्रचंड ताण येतो.

डायबिटीजसह हाय ब्लड प्रेशर होणे किती धोकादायक ठरू शकते?

अलिकडील एका अभ्यासातून समोर आले आहे की, भारतातील सुमारे ५% वयस्कर नागरिक एकाच वेळी डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर (हायपरटेंशन) या दोन्ही समस्यांचा सामना करत आहेत. वयाच्या ४० वयानंतर हा धोका वेगाने वाढतो. दर २० पैकी १ वयस्क नागरिक या दोन्ही आजारांनी ग्रस्त आहे.

४० व्या वर्षाच्या आसपास दोन्ही आजार एकत्र होण्याचा धोका वेगाने वाढतो. वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत हा धोका वाढत राहतो आणि ७० व्या वर्षापर्यंत तो सुमारे १७ टक्क्यांवर स्थिरावतो.

डायबिटीज असणाऱ्या रुग्णांमध्ये हायपरटेंशन होण्याचा धोका जवळपास ४ पटीने जास्त असतो. तर हाय बीपी असणाऱ्या रुग्णांना डायबिटीज होण्याचा धोका सुमारे २.५ पटीने जास्त आढळला आहे.

हे दोन्ही आजार एकत्र झाल्यास शरीरावर अतिरिक्त ताण येतो. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि क्रॉनिक किडनी डिसीजचा धोका अनेक पटींनी वाढतो.

काय आहेत याचे धोके?

डायबिटीजमुळे रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ वाढलेली राहते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. दुसरीकडे, हाय बीपीमुळे रक्तवाहिन्यांवर आणि हृदयावर सतत दबाव राहतो.

जेव्हा हे दोन्ही आजार एकत्र येतात, तेव्हा रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्याचा धोका दुप्पट होतो. परिणामी हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी विकारांचा त्रास वाढू शकतो. अभ्यासानुसार, दोन्ही आजार एकत्र असण्याचे संयुक्त प्रमाण ४६.१३ टक्के नोंदवले गेले आहे.

दोन्ही आजार एकत्र का होतात?

एकाच व्यक्तीमध्ये डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर एकत्र येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वाढलेले वजन, शारीरिक हालचालींचा अभाव (व्यायाम न करणे) आणि अनियंत्रित आहार ही दोन्ही आजारांचे मुख्य कारण ठरतात.

म्हणूनच, जर तुम्हाला डायबिटीज असेल तर फक्त शुगर तपासणे पुरेसे नाही; नियमित बीपी (रक्तदाब) देखील तपासला पाहिजे. तसेच हाय बीपीच्या रुग्णांनी वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करणे गरजेचे आहे.

आरोग्य तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

आरोग्य तज्ज्ञांनुसार, डायबिटीज असो वा हाय बीपी, हे दोन्ही आजार प्रामुख्याने चुकीच्या जीवनशैलीमुळे (लाइफस्टाइल) होतात. म्हणूनच आहार आणि दैनंदिन रुटीनमध्ये सकारात्मक बदल करून तुम्ही हा धोका कमी करू शकता.

जर तुमची डायबिटीज किंवा बीपीची औषधे आधीपासून सुरू असतील, तर ती स्वतःच्या मर्जीने बंद करू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासण्या करा.

आहारात मीठ आणि जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी करा.

रोज नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शुगर आणि बीपी दोन्ही नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. यामुळे भविष्यात हृदय आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल.