Diabetes care tips for parents: आजच्या काळात जीवनशैलीशी संबंधित सर्वांत सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक म्हणजे मधुमेह. भारतासारख्या देशांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. अनेकदा कुटुंबातील एखाद्या सदस्याला मधुमेह झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या जीवनशैलीवर होतो. औषधोपचार हे मधुमेह व्यवस्थापनाचे महत्त्वाचे अंग असले तरी काही लहान-मोठे दैनंदिन बदलदेखील रक्तातील साखरेवर सकारात्मक परिणाम करू शकतात. मधुमेह असलेल्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी कुटुंबाने मोठे किंवा कठीण बदल करण्याची गरज नसते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप व तणाव नियंत्रण या साध्या सवयीही मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या संदर्भात टेक्निकल डायरेक्टर, BDR Pharmaceutical डॉ. अरविंद बडिगर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
नियमित शारीरिक हालचालींना प्रोत्साहन द्या
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल अत्यंत महत्त्वाची असते. व्यायाम करताना शरीरातील स्नायूंना ऊर्जेसाठी ग्लुकोजची गरज असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराची इन्सुलिनबद्दलची संवेदनशीलता वाढते. आई-वडिलांना दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग, योगा किंवा पोहणे यांसारख्या हलक्या-फुलक्या शारीरिक क्रिया करण्यास प्रोत्साहित करावे. बागकाम, घरकाम किंवा जेवणानंतर थोडे चालणे यांसारख्या साध्या हालचालीदेखील रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
संतुलित आणि जाणीवपूर्वक आहार घ्या
मधुमेह व्यवस्थापनात आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या आहारावर कठोर निर्बंध घालण्यापेक्षा त्यांना संतुलित आहार घेण्यास प्रोत्साहन देणे अधिक उपयुक्त ठरते. संतुलित आहारामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. फायबरमुळे ग्लुकोज रक्तात हळूहळू शोषले जाते आणि त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. तसेच रिफाईंड साखरेचे सेवन कमी करणे आणि नियमित वेळेवर जेवण घेणे महत्त्वाचे असते, ज्यामुळे शरीराची इन्सुलिन प्रतिक्रिया व्यवस्थित राहते.
चांगल्या झोपेला प्राधान्य द्या
मधुमेह नियंत्रणात ठेवताना पुरेशी व नियमित झोप हा अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा, पण अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अपुऱ्या किंवा अनियमित झोपेमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अधिक कठीण होते. आई-वडिलांनी दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे, रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा स्क्रीन वापरणे टाळणे आणि नियमित झोपेची वेळ पाळणे हे सवयी अंगीकारल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
तणावाचे योग्य व्यवस्थापन करा
दीर्घकाळ तणाव असल्यास शरीरात कॉर्टिसोलसारखे तणावाचे हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि मग मधुमेह नियंत्रणात ठेवणे अधिक अवघड होते. ध्यान, प्राणायाम, योगा, आवडीचे छंद जोपासणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे यांमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. कुटुंबीयांचा भावनिक आधारदेखील मधुमेह असलेल्या व्यक्तीला आरोग्यदायी सवयी पाळण्यासाठी प्रेरणा देतो.
नियमित आरोग्य तपासणी करा
मधुमेह व्यवस्थापनासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यात रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल यांची तपासणी समाविष्ट असते. दर काही महिन्यांनी HbA1c चाचणी केल्यास रक्तातील दीर्घकालीन साखर नियंत्रण कसे आहे याची माहिती मिळते. या अहवालांच्या आधारे उपचार पद्धतीत आवश्यक ते बदल करता येतात. कुटुंबाचा सहभाग असल्यास ही प्रक्रिया अधिक सोपी आणि परिणामकारक ठरते.
छोट्या सवयींची मोठी ताकद
मधुमेहासोबत जगणे म्हणजे परिपूर्ण असणे नव्हे, तर सातत्य राखणे होय. जेवणानंतर थोडे चालणे, संतुलित आहार घेणे, नियमित झोप घेणे आणि तणाव कमी ठेवणे अशा साध्या सवयींमुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते. कुटुंबासाठी मधुमेह असलेल्या व्यक्तीला साथ देणे म्हणजे फक्त औषधोपचारात मदत करणे नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीची संस्कृती निर्माण करणे होय. कालांतराने या छोट्या सवयींमुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीचे आरोग्य सुधारू शकते आणि त्यांना अधिक सक्रिय व आरोग्यदायी जीवन जगता येते.
