World health day 2026: मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यावर नियंत्रण ठेवता येते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवल्यास शरीराला आजारांपासून वाचवता येते. रक्तातील साखर सामान्य ठेवण्यासाठी शरीर सक्रिय ठेवणे, औषधे घेणे, चालणे व व्यायाम करणे, ताणतणाव नियंत्रित करणे आणि अन्नामध्ये कर्बोदकांचे सेवन नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरते. विरघळणारे फायबर आणि अघुलनशील फायबरचे सेवन रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.
डायबेटोलॉजिस्ट डॉ. पराग जिंदाल यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर सांगितले की, एक चमचा सायलियम हस्क म्हणजेच इसबगोल खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो. डॉक्टर जिंदाल यांनी सांगितले की, एका ग्लास पाण्यात एक चमचा इसबगोल घ्या आणि जेवणाच्या १० मिनिटे आधी ते प्या. हे नैसर्गिक फायबरसारखे कार्य करते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध करते.
इसबगोलच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कसे नियंत्रित होते?
KIMS हॉस्पिटल, ठाणे येथील डायबेटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विजय नेगलूर म्हणाले की, इसबगोल जेवणानंतर रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. हे एक प्रकारचा विद्रव्य फायबर आहे, जे पाणी शोषून घेते आणि आतड्यात जेलसारखा पदार्थ तयार करते. त्यामुळे कार्बोहायड्रेट्सचे पचन आणि शोषण मंदावते. परिणामी रक्तातील साखर अचानक न वाढता, हळूहळू वाढते. तज्ज्ञांनी सांगितले की, हा औषधे किंवा संतुलित आहाराचा पर्याय नसला तरी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.
जेवण करण्यापूर्वी इसबगोल घेणे का महत्त्वाचे?
डॉ नेगलूर यांच्या मते खाण्यामध्ये वेळेला विशेष महत्त्व आहे. जेवणाच्या १०-१५ मिनिटे आधी इसबगोल घेतल्यास, ते पाचनमार्गावर अस्तर तयार करून, कर्बोदकांमधे हळूहळू प्रक्रिया करण्यास मदत करते. इसबगोल जेवणानंतर रक्तातील साखरेची तीव्र वाढ कमी करते, विशेषतः उच्च-कार्बयुक्त पदार्थांनंतर. रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते. जेवणापूर्वी इसबगोलचे सेवन केल्याने साखर वाढण्याचा धोका टळतो.
कोणत्या लोकांना सर्वांत जास्त फायदा होतो?
डॉ. नेगलूर यांच्या मते, टाईप २ मधुमेह आणि प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना इसबगोलचे सेवन केल्याने सर्वाधिक फायदा होतो. टाईप-२ मधुमेह आणि प्री-डायबिटीजच्या रुग्णांमध्ये खाल्ल्यानंतर साखर झपाट्याने वाढते. त्याशिवाय वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठीही इसबगोलचे सेवन प्रभावी ठरते. कारण- फायबरमुळे पोट भरलेले वाटते आणि जास्त खाणे कमी होते. तथापि, त्याचा प्रभाव वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभावी असल्याचे सिद्ध होते.
इसबगोलचे सेवन सुरक्षित कसे?
१-२ चमचे इसबगोल एका ग्लास पाण्यात मिसळून लगेच प्या आणि त्यानंतर दुसरा ग्लास पाणी पिण्याचे लक्षात ठेवा. त्यामुळे फायदा होईल. तज्ज्ञांनी सांगितले की, याचे कमी प्रमाणात सेवन सुरू करा आणि हळूहळू वाढवा, म्हणजे पोट फुगण्याच्या समस्येचा त्रास होणार नाही.
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
जर तुम्ही इसबगोलचे सेवन करीत असाल, तर पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, असे तज्ज्ञांनी सांगितले. अतिसेवनानं पोटात सूज येते, त्यामुळे जास्त पाणी पिणे आवश्यक आहे; अन्यथा बद्धकोष्ठता होऊ शकते.
जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील किंवा अनेक औषधे घेत असाल,, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
आम्ही तुम्हाला सांगतो की, इसबगोल हा एक स्वस्त आणि सोपा उपाय मानला जाऊ शकतो, जो संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि औषधांसोबत रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. छोट्या सवयी दीर्घकाळात मोठा फरक करू शकतात.
