Dark Neck Causes: मानेचा काळेपणा हा केवळ साचलेल्या घाणीमुळे नसून, त्यामागे एखादी आरोग्यविषयक समस्या असू शकते. त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. उर्मिला निचल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर या स्थितीबाबत माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्या नमूद करतात की, अनेकदा लोकांना असे वाटते की घाण साचल्यामुळे किंवा योग्य स्वच्छता न केल्यामुळे मान काळी पडते, परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. वास्तविक पाहता मानेचा हा काळेपणा ‘अकॅन्थोसिस निग्रिकन्स’ या नावाने ओळखला जातो. चला तर मग यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात..
मान काळी पडण्याची कारणे
मान काळी पडण्याची अनेक कारणे असू शकतात; जसे की इन्सुलिन रेझिस्टन्स, पीसीओएस (PCOS), हार्मोनल असंतुलन, लठ्ठपणा किंवा कधीकधी अनुवांशिकता.
या समस्येवर उपचार कसे करावे
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, क्रीम लावल्याने ही समस्या सुटणार नाही. वजन नियंत्रण, इन्सुलिन रेझिस्टन्सवर उपाय करणे आणि पीसीओएस (PCOS) किंवा पीएमओएस (PMOS) सारख्या स्थितींचे व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरेल.
यावर काही उपचार उपलब्ध आहेत का?
मानेवरील काळपटपणापासून लवकर सुटका मिळवण्यासाठी तुम्ही त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता. त्वचारोग तज्ज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात आणि केमिकल पील्स किंवा लेझर ट्रीटमेंट्ससारख्या प्रक्रियेने ही समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतात.
कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत?
जर मानेवरील काळपटपणा बराच काळ टिकून राहिला असेल आणि स्वच्छ केल्यानंतरही जात नसेल, तर त्याचे मूळ कारण शोधण्यासाठी काही चाचण्या केल्या जाऊ शकतात. तुम्ही उपाशीपोटी रक्तातील साखर (फास्टिंग ब्लड शुगर) आणि उपाशीपोटी इन्सुलिन (फास्टिंग इन्सुलिन) चाचण्या करून घेऊ शकता.
कोणत्या प्रकारची क्रीम्स उपयुक्त ठरू शकतात?
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, क्रीम्समुळे ही समस्या पूर्णपणे बरी होणार नाही, परंतु काळेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. यासाठी रेटिनॉइड्स, युरिया किंवा लॅक्टिक ॲसिड असलेली क्रीम्स वापरली जाऊ शकतात.
दैनंदिन काळजी घेण्याची पद्धत
जर तुम्हाला मानेवरील काळ्या त्वचेचा त्रास होत असेल, तर जोरात घासणे किंवा ब्लीच वापरणे टाळा. त्वचा हळुवारपणे स्वच्छ करा. मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा आणि त्वचेला त्रासदायक कपडे घालणे टाळा.
