Juice For Diabetes: मधुमेह हा रक्तातील साखर अत्याधिक प्रमाणात वाढल्यामुळे होणारा आजार आहे. मधुमेहावर कोणताही ज्ञात इलाज नाही; जीवनशैली आणि आहारात बदल करूनच, त्यावर नियंत्रण मिळवता येते. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहारात विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास त्यांना साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. या संदर्भात आम्ही तुम्हाला एका ज्यूसविषयीची माहिती देणार आहोत, जो केवळ तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करणार नाही, तर तुमची रोगप्रतिकार शक्तीदेखील खूप मजबूत करेल.
हा खास रस खूप फायदेशीर
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दुधी भोपळा आणि टोमॅटोच्या रसाचं सेवन केल्यानं मधुमेहावर लक्षणीयरीत्या नियंत्रण मिळवता येते. टोमॅटोमध्ये नारिंगेनिन नावाचा फ्लेवोनॉइड असते, जे मधुमेहविरोधी म्हणून काम करू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. त्याशिवाय टोमॅटोचा जीआय निर्देशांक (GI index) कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो. याउलट, दुधी भोपळ्यामध्ये ९२ टक्के पाणी असते आणि त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. दुधी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे. कारण- त्यात ग्लुकोजचे प्रमाण नगण्य असते.
टोमॅटोमध्ये लायकोपीन, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, फ्लेवोनॉइड्स, पोटॅशियम व व्हिटॅमिन ई यांसारखी इतर अनेक महत्त्वाची पोषक तत्त्वे शदेखील असतात. त्याचप्रमाणे दुधी भोपळ्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, नियासिन व व्हिटॅमिन सी हे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे टोमॅटो आणि दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने मधुमेहात सुधारणा होऊ शकते.
टोमॅटो आणि दुधी भोपळ्याच्या रसाचे फायदे
मधुमेहाव्यतिरिक्त टोमॅटो आणि दुधी भोपळ्याच्या रसाच्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे. त्यापैकी काही आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :
टोमॅटो आणि दुधी भोपळ्याचा रस वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो.
टोमॅटो आणि दुधी भोपळ्याच्या रसातील फायबरमुळे पचनसंस्था मजबूत होते. त्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि आम्लपित्तासारख्या समस्यांपासून आराम मिळण्यासही मदत मिळू शकते.
दिवसाची सुरुवात या रसाने केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या मजबूत होऊ शकते. दुधी भोपळा आणि टोमॅटोचा रस जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतो, जे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
हा विशेष रस अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात.
याव्यतिरिक्त, हा रस तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो. टोमॅटो आणि दुधी भोपळ्याच्या रसात कॅलरीज कमी असतात, तसेच त्यातील लायकोपीन नावाचे अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून, वजन नियंत्रित ठेवण्यास साह्य करते.
