Diabetes Symptoms : मधुमेहाची लक्षणे शरीराच्या विविध भागांवर दिसून येतात. या आजारामुळे शरीरात आणि शरीराबाहेरही अशी काही लक्षणे दिसतात, ज्यांकडे दुर्लक्ष केल्यास स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे त्वचेवर कशा प्रकारे दिसतात, हे जाणून घेऊयात. डॉक्टरांच्या मते, मधुमेहामुळे त्वचेवर दिसणाऱ्या लक्षणांकडे लोक अनेकदा सामान्य त्वचेच्या समस्या समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजार बळावतो, तर या लक्षणांची वेळीच ओळख पटल्यास उपचारांमध्ये मदत होऊ शकते. मधुमेहाशी संबंधित त्वचेच्या विशिष्ट लक्षणांबाबत डॉक्टर काय म्हणतात जाणून घेऊयात.

मधुमेहाची ही २ लक्षणे त्वचेवर दिसून येतात

मानेवर गडद डाग – डॉक्टरांच्या मते, जर मानेवर गडद रंगाचे डाग किंवा चट्टे पडले असतील आणि घासूनही ते निघत नसतील, तर ती केवळ घाण नसते. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ‘अकॅन्थोसिस निग्रिकन्स’ (Acanthosis Nigricans), असे म्हणतात. हे अस्वच्छतेचे लक्षण नसून, शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढल्याचे निदर्शक आहे. त्यात तुमची रक्तातील साखरेची पातळी सामान्य असू शकते. तरीही उपाशीपोटी मोजली जाणारी इन्सुलिनची पातळी मात्र जास्त असू शकते.

त्वचेवर लहान मांसल गाठी दिसणे – जर तुमच्या त्वचेवर, विशेषतः मानेच्या किंवा घशाच्या आसपास लहान मांसल गाठी दिसू लागल्या, तर हे रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे लक्षण असू शकते.

डॉक्टरांच्या मते, त्वचेवरील या खुणा शरीरातील पेशींच्या जलद वाढीचे निदर्शक असतात ही वाढ रक्तातील साखर आणि इन्सुलिनच्या वाढलेल्या पातळीमुळे होत असते. अशा परिस्थितीत इन्सुलिन आणि रक्तातील साखर या दोन्हीची पातळी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या समस्या मधुमेहाची लक्षणेही असण्याची शक्यता

वारंवार लघवी होणे हे मधुमेहाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. हे दर्शवते की, शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी तुमची मूत्रपिंडे (किडनी) अतिरिक्त काम करीत आहेत.

वारंवार तहान लागणे हेदेखील मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. वारंवार लघवी झाल्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ कमी होतात आणि ती तहान म्हणजे शरीराने गमावलेले द्रवपदार्थ पुन्हा भरून काढण्याचा एक प्रयत्न असतो.

दृष्टीशी संबंधित समस्याही सामान्यपणे उदभवू शकतात. तुम्हाला अंधुक दिसणे किंवा डोळ्यांवर दाब जाणवणे, असा अनुभव येऊ शकतो.

मधुमेहामध्ये वजन कमी होण्याचे कारण स्पष्ट नसते. असे घडण्याचे कारण म्हणजे शरीर स्नायू आणि चरबी जाळू लागते.

जखमा लवकर बऱ्या होत नाहीत.

विशेषतः पायांवरील जखमा बऱ्या होण्यास वेळ लागतो.

हात व पायांमध्ये मुंग्या आल्यासारखे वाटू शकते आणि पायांशी संबंधित समस्या अधिकच गंभीर होण्याची शक्यता असते.
सतत थकवा जाणवतो आणि शरीरात ऊर्जेची लक्षणीय कमतरता जाणवते.