scorecardresearch

Diabetes Home Remedies: सर्व वयोगटात टाईप २ मधुमेहाचा धोका वाढतोय; रोजच्या कामात ‘या’ ७ गोष्टी बदला

Diabetes Home Remedies: डॉक्टरांच्या माहितीनुसार, टाईप १ मधुमेह हा अनुवांशिक आहे, मात्र टाईप २ मधुमेह हा अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे होतो.

Diabetes Home Remedies: सर्व वयोगटात टाईप २ मधुमेहाचा धोका वाढतोय; रोजच्या कामात ‘या’ ७ गोष्टी बदला
Diabetes Type 2 Symptoms treatment home remedies

Diabetes Home Remedies: डॉक्टरांच्या माहितीनुसार, टाईप १ मधुमेह हा अनुवांशिक आहे, मात्र टाईप २ मधुमेह हा अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे होतो. तसेच जीवनशैलीमध्ये आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केल्यास मधुमेहापासून बचाव होऊ शकतो. मधुमेह आज भारतातील एक सामान्य समस्यां बनला आहे, मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे मुख्य म्हणजे मधुमेहाला जोडून अन्यही आजार येतात. अलीकडे लहान मुलांमध्येही मधुमेहाचा रोग वाढत आहे. काही सोप्या नियमांचं पालन करून आपण मधुमेह होण्याआधीच त्याला रोखू शकता किंवा मधुमेह झाल्यावरही त्याच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते. हे नियम म्हणजे खरंतर आपल्या नियमित आयुष्यातील काही सवयी आहेत ज्यात साधे बदल करून आपल्याला सुदृढ आरोग्याचा प्रवास सुरु करता येईल.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी बदला सवयी

नाष्टा स्किप करणे

अनेकांना सकाळचा नाष्टा न करण्याची सवय असते, कितीही भूक लागली असली तरी कामाच्या नादात आपण सकाळी काहीच खात नाही याचा परिणाम मधुमेहाच्या स्वरूपात समोर येतो. यासाठी सकाळी अगदीच काही शक्य नसेल तर एक फळ किंवा काजू बदाम, काळे मनुके खाऊन सुरु करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन अगदीच हानिकारक ठरू शकते.

बैठी जीवनशैली

अलीकडे अनेकांची जीवनशैली ही बैठी स्वरूपातील झाली आहे, कामामुळे शरीराची हालचाल कमी होते मात्र हे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरणार नाही. अनेक संशोधनात हे समोर आले आहे की, ३० मिनिटांहून अधिक बसून राहिल्यास टाईप २ मधुमेहाचा धोका वाढतो. जर आपल्याला कामासाठी बसून राहणे गरजेचे असेल तर निदान मध्ये मध्ये ब्रेक घेणे गरजेचे आहे. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या सल्ल्यानुसार तुम्हाला मधुमेह नसल्यासही काम करताना ३० मिनिटांनी ब्रेक घेऊन एक फेरी मारावी.

उशिरा झोपणे

स्वास्थ्यासाठी उत्तम झोप आवश्यक आहे. रात्री नेहमीच उशिरा झोपणे किंवा दिवसाभरातही शरीराला आवश्यक झोप न मिळाल्यास चयापचय क्रिया मंदावते. डायबेटोलोजिया मध्ये २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल ९ लाख मधुमेह रुग्णांच्या अभ्यासात १७ टक्के लोकांमध्ये अनिद्रेमुळे रोग बळावल्याचे दिसून येते. झोपेच्या कमीमुळे हार्मोन्स असंतुलीत होतात.

प्रक्रिया केलेले अन्न व मांसाहार

मांसाहाराने शरीराला जितके लाभ होतात तितकेच अपायही होऊ शकतात. अनेकदा जर मांसाहार करताना नीट अन्न शिजवले गेले नाही तर त्यामुळे अंक आजार ओढवण्याची भीती असते. एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार सतत प्रक्रिया केलेले पदार्थ खाणाऱ्यांमध्ये मधुमेहाचा धोका १५ टक्के अधिक असतो. विशेषतः लाल मांस खाणाऱ्यांना मधुमेह होण्याची अधिक शक्यता असते.

धूम्रपान व मद्यपान

धूम्रपान व मद्यपान करणाऱ्यांमध्ये मधुमेहाचा धोका ३० ते ४० टक्के अधिक असतो. धूम्रपान करणाऱ्यांच्या रक्तवाहिन्या आखूड होत असल्याने त्यांना हृदयाचे विकार व उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो.

अति गोड खाणे

मधुमेह झाल्यावर गोड खाणे कमी करण्यापेक्षा आधीच नियंत्रण ठेवणे कधीही फायद्याचे ठरेल. काही फळांमध्ये सुद्धा साखरेचे अधिक प्रमाण असते ज्यामुळे मधुमेहाचा धोका बळावतो. यासाठी आपण पर्याय वापरायला हवा. उदाहरणार्थ प्रक्रिया केलेली साखर खाण्यापेक्षा आपण गूळ सेवन करू शकता. कार्ब्स कमी असणारे पदार्थ आहारात समाविष्ट करा. डार्क चॉकलेटचे सेवन सुद्धा फायद्याचे ठरू शकते.

कमी पाणी पिणे

तज्ज्ञांच्या माहितीनुसार कमी पाणी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये मधुमेहाची लक्षणे अधिक दिसून येतात. स्वादुपिंडाला कमी पाणी मिळाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते यामुळेच मधुमेहासारखे आजार बळावतात.

रात्री उशिरा जेवण

अवेळी व अति खाणे यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयाचे विकार असे अनेक त्रास सुरु होतात. रात्री उशिरा जेवण केल्यास अपचन होते शिवाय कार्ब्सयुक्त जेवणाने रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. रात्री अनेकांना भूक लागते मात्र तुम्ही संतुलित आहाराचे वेळापत्रक पाळल्यास हे प्रमाण कमी होईल भूक असाहाय्य झाल्यास कोमट पाणी प्यावे.

(टीप- वरील लेख माहितीपर आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या