How Much to Walk for Diabete: मधुमेह (रक्तातील साखर वाढणे) हा आजच्या काळातील सर्वात वेगाने वाढणारा आजार मानला जातो. केवळ औषधांवर अवलंबून न राहता जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एक साधा उपाय, दररोज चालणे खरंच किती परिणामकारक आहे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. विशेषतः “दररोज किती चालावे?” आणि “चालल्याने रक्तातील साखर किती कमी होते?” हे प्रश्न वारंवार विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा बदल घडू शकतो.
मधुमेह नेमका का होतो?
मधुमेह प्रामुख्याने शरीरातील इन्सुलिन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे किंवा त्याच्या कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे होतो. इन्सुलिनचे कार्य म्हणजे रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवणे. पण, जेव्हा शरीर इन्सुलिन योग्य प्रकारे वापरू शकत नाही किंवा त्याचे प्रमाण कमी होते, तेव्हा रक्तातील साखर वाढू लागते. अयोग्य आहार, जास्त साखर व तेलकट पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, ताणतणाव आणि आनुवंशिक कारणे ही मधुमेहाची प्रमुख कारणे मानली जातात. मग मधुमेह रुग्णांनी नेमकं किती तास चालायला हवं…
एक तास चालल्यावर रक्तातील साखर किती कमी होऊ शकते?
तज्ज्ञांच्या मते, नियमित चालण्यामुळे शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता वाढते, म्हणजेच शरीर साखरेचा योग्य वापर करू लागते. जर एखादी व्यक्ती साधारण एक तास (५ ते ६ किमी प्रतितास या वेगाने) चालली, तर तिच्या रक्तातील साखरेत सरासरी ३० ते ६० mg/dL इतकी घट होण्याची शक्यता असते. मात्र, हा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असू शकतो. वय, वजन, आहार, सध्याची साखरेची पातळी आणि जीवनशैली यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. तरीही नियमित चालण्याने सकारात्मक बदल जाणवू शकतात हे नक्की.
मधुमेही रुग्णांनी रोज किती चालावे?
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज चालणे अत्यंत उपयुक्त मानले जाते. साधारणपणे दररोज किमान ३० मिनिटे ते एक तास चालणे लाभदायक ठरू शकते. जर सलग इतका वेळ चालणे कठीण वाटत असेल, तर दिवसातून १०-१५ मिनिटांचे छोटे टप्पे करून चालणेही फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे जेवणानंतर १०-१५ मिनिटे फेरफटका मारल्यास अचानक वाढणारी साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
चालताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
चालताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आरामदायक आणि योग्य मापाचे पादत्राणे वापरणे महत्त्वाचे आहे, कारण पायांची काळजी मधुमेहात विशेष आवश्यक असते. चालण्याचा वेग ना खूप जास्त ना खूप कमी-मध्यम ठेवणे योग्य ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमितता; अधूनमधून चालण्यापेक्षा दररोज चालण्याची सवय अधिक फायदेशीर ठरते.
फक्त चालणे पुरेसे आहे का?
फक्त चालणे हा एक चांगला आरंभ असला तरी तो एकमेव उपाय नाही. संतुलित आहार, वेळेवर औषधे, नियमित तपासणी आणि ताणतणाव कमी ठेवणे या सर्व गोष्टी एकत्रितपणे केल्यासच मधुमेहावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
एकूणच, दररोजचा साधा फेरफटका तुमच्या आरोग्यासाठी मोठा फरक घडवू शकतो. योग्य पद्धतीने आणि नियमित चालण्याची सवय लावल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होऊ शकते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
