face reveal diabetes symptoms : तुम्ही कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या रक्तातील साखर वाढली आहे की नाही हे सांगू शकता का? नाही. पण, सोशल मीडियाला मात्र तसंच वाटतं आहे. नाकाच्या बाजूला असलेला लाल डाग, काळवंडलेली त्वचा, बुरशीजन्य पुरळ किंवा अगदी त्वचेवरील काही चामखिळेसुद्धा मधुमेह झाला असल्याचा ‘पुरावा’ देऊ शकतात, असा समज निर्माण झाला आहे. पण, या तर्कातसुद्धा एक अडचण आहे आणि ती म्हणजे तुमचा चेहरा तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण सांगू शकत नाही.
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने झँड्रा हेल्थकेअरमधील मधुमेह आणि स्थूलताविषयक विशेषज्ञ डॉक्टर राजीव कोविल यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, केवळ कोणाच्या नाकावरून त्याला मधुमेह आहे की नाही हे ओळखणे पहिल्यांदा थांबवा. सोशल मीडियाने वैद्यकशास्त्राचा हा एक धोकादायक नवीन प्रकार निर्माण करण्यात आला आहे. एक फोटो पाहा, त्वचेचा एक डाग ओळखा आणि जाहीर करा की, त्या व्यक्तीला मधुमेह आहे की नाही. हा वैद्यकशास्त्राच्या नावाखाली केला जाणारा फक्त अंदाज आहे.
त्वचेतील बदल रक्तशर्करेच्या प्रमाणाबद्दल विचार करायला भाग पाडतात का?
नाकाच्या बाजूला लालसरपणा किंवा पुरळ येणे म्हणजे त्या व्यक्तीच्या रक्तातील साखर वाढली आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. नाकाच्या दोन्ही बाजूंना लालसरपणा येणे आणि त्या ठिकाणची त्वचा कोरडी होऊन, तिचे छोटे छोटे खवले निघणे, ही एक सामान्य समस्या आहे. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. सेबोरिक डर्माटायटिस हा त्वचेचा एक त्रास आहे. त्यामध्ये टाळू, भुवया, नाकाच्या दोन्ही बाजूंचा भाग आणि भुवयांच्या मधल्या भागात त्वचा लाल होणे, खाज येणे किंवा पापुद्रे निघणे, अशी लक्षणे दिसू शकतात. मॅलेसेझिया नावाची यीस्टसारखी बुरशी त्वचेवर नैसर्गिकरीत्या असते आणि या त्रासाशी तिचा संबंध असू शकतो. त्याशिवाय रोझेशिया बुरशीसारख्या एखाद्या पदार्थाच्या संपर्कामुळे होणारी त्वचेची अॅलर्जी किंवा जळजळ आणि त्वचेच्या इतर दाहक समस्यांमुळेही चेहऱ्यावर असेच बदल दिसू शकतात; पण फक्त सोशल मीडियावर कोणीतरी स्वतःचे नाक तपासले म्हणून तसा समज करून घेता येणार नाही. तुम्हाला लक्षणे दिसल्यास, एखादी गंभीर गोष्ट आढळल्यास लगेच तपासणी करून घ्या.
त्वचा इन्सुलिन प्रतिरोधाबद्दल संकेत देऊ शकते का?
त्वचेतील काही बदल मधुमेहाचा धोका किंवा शरीरातील चयापचयाशी संबंधित समस्या दर्शवू शकतात. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स. त्यामध्ये मानेवर आणि शरीराच्या घड्यांमध्ये त्वचा काळसर, जाडसर आणि मखमलीसारखी दिसू लागते. हे इन्सुलिनचा प्रतिकार वाढल्याचे लक्षण असू शकते आणि मधुमेह होण्यापूर्वीही दिसू शकते. त्याशिवाय, वारंवार होणारे जीवाणू किंवा बुरशीजन्य संसर्ग, डायबेटिक डर्मोपॅथी, नेक्रोबायोसिस लिपोइडिका, इरप्टिव्ह झॅन्थोमा आणि क्वचित आढळणारे डायबेटिक बुले (काही व्यक्तींच्या त्वचेवर अचानक दिसणारे, पाण्याने भरलेले फोड) यांसारखे त्वचेतील बदलही मधुमेहाशी संबंधित असू शकतात. मात्र, केवळ त्वचेतील बदलांवरून मधुमेहाचे निदान करता येत नाही. त्यासाठी रक्तातील साखरेची तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय चाचण्या करणे महत्त्वाचे आहे.
त्वचेवर येणाऱ्या छोट्या मांसल चामखिळी (स्किन टॅग्ज) यांचाही इन्सुलिनचा प्रतिकार वाढणे आणि टाईप २ मधुमेह यांच्याशी संबंध असू शकतो. एक त्वचारोगतज्ज्ञ किंवा डॉक्टर एक विशिष्ट बाह्यस्वरूप (फेनोटाईप) ओळखतात आणि मग त्यामागील जीवशास्त्राचा तपास करतात. पुरळ म्हणजे HbA1c नव्हे, असे डॉक्टर कोविल यांनी स्पष्ट केले.
बुरशीजन्य संसर्गाबद्दल काय?
ज्या लोकांचा मधुमेह नियंत्रणात नसतो, त्यांना कँडिडा किंवा यीस्ट संसर्गासह इतर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. हे संसर्ग त्वचेच्या ओलसर घड्यांमध्ये, तोंडात आणि जननेंद्रियांच्या भागात होऊ शकतात.
रक्तातील साखर बुरशी वाढवते का?
विशिष्ट ऊती किंवा शरीरातील स्रावांमध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यास, कँडिडा या बुरशीची वाढ होण्यास आणि त्वचेवर किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये ती टिकून राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींना बुरशीजन्य संसर्ग होण्यामागे केवळ ग्लुकोजचे वाढलेले प्रमाण हेच कारण नसते, तर इतर घटकही जसे की, जन्मजात आणि अनुकूलित प्रतिकारशक्ती, न्यूट्रोफिलच्या कार्यात बिघाड, एपिथेलियल संरक्षण आणि मायक्रोबायोटामधील बदल, रक्तवाहिन्यांचे आजार आणि ओलावा व घर्षण यांसारखे स्थानिक पर्यावरणीय घटक कारणीभूत असतात. त्यामुळे वारंवार होणारा किंवा असामान्यपणे टिकून राहणारा बुरशीजन्य संसर्ग हे मधुमेहाची तपासणी करण्याचे एक कारण असू शकते. पण, केवळ संसर्ग झाल्याने एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखर जास्त आहे हे सिद्ध होत नाही.
एखाद्या त्वचेच्या समस्येचा संबंध थेट रक्तातील साखर आणि मधुमेहाशी जोडणे चुकीचे ठरू शकते. कारण प्रत्येक पुरळ बुरशीमुळेच येतो किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे मधुमेहाचे लक्षण असते, असे नाही. मानवी शरीराची कार्यपद्धती गुंतागुंतीची असते. त्यामुळे सोशल मीडियावरील माहितीप्रमाणे प्रत्येक लक्षणाचा एकच अर्थ लावणे योग्य नाही.
पापण्यांवरील बदलही देऊ शकतात आरोग्याचे संकेत
डोळ्यांच्या पापण्यांवरील काही बदल शरीरातील चरबीच्या पातळीशी आणि चयापचयाशी संबंधित समस्यांशी निगडित असू शकतात. मात्र, या लक्षणांचा अर्थ समजून घेताना इतर गोष्टींचाही विचार करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, झँथेलास्मा (Xanthelasma) ही अशी त्वचेची समस्या आहे, ज्यामध्ये पापण्यांच्या आतील बाजूला, विशेषतः नाकाजवळ, पिवळसर ठिपके किंवा चपटे चट्टे दिसतात. हे त्वचेखाली चरबीयुक्त पदार्थ साचल्यामुळे तयार होतात. काही वेळा हे रक्तातील कोलेस्ट्रॉलसारख्या चरबीचे प्रमाण असंतुलित असल्याचे संकेत देऊ शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि चयापचयाशी संबंधित इतर समस्यांच्या धोक्याची तपासणी करणे महत्त्वाचे ठरू शकते.
झँथेलास्मा मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्येही दिसू शकतो. मात्र, याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला मधुमेह आहे, असा होत नाही. रक्तातील चरबीचे प्रमाण सामान्य असलेल्या व्यक्तींनाही ही समस्या होऊ शकते. त्यामुळे पापण्यांवर असे पिवळसर ठिपके दिसल्यास केवळ त्यावरून मधुमेहाचे निदान न करता, डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या करून घेणे योग्य ठरते.
