8 Types of Rotis for 8 Health Concerns : जेव्हा वजन कमी करण्याचा किंवा रक्तातील साखर नियंत्रणात ठेव्याची असते तेव्हा पहिला विचार भात खाणे सोडून देण्याचा आणि पोळी, भाकरीचेचे प्रमाण कमी करण्याचा येतो. पण तुम्हाला माहित आहे का की, समस्या खाण्यात नाही, तर चुकीची पोळी किंवा भाकरी निवडण्यात आहे? वर्षानुवर्षे आपण फक्त गव्हाची पोळी खात आलो आहोत. पण, बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीराच्या गरजाही बदलल्या आहेत. पोषणतज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, केवळ गव्हावर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या आरोग्याच्या आणि गरजांनुसार योग्य धान्यांची निवड केल्यास मधुमेह, लठ्ठपणासह अनेक आजारांवर सहजपणे नियंत्रण ठेवू शकतो.

आयुर्वेदिक डॉक्टर आणि जीवनशैली तज्ज्ञ डॉक्टर दिव्यानी भगत यांच्या मते, पोळी, भाकरी हा भारतीय जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे.पण, एकाच प्रकारची पोळी प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर असतेच असं नाही. वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेल्या भाकऱ्या शरीराच्या गरजा, वैद्यकीय इतिहास आणि पौष्टिक आवश्यकतांनुसार वेगवेगळे फायदे देतात. वजन वाढवण्यापासून ते मधुमेह नियंत्रण आणि पचनक्रिया सुधारण्यापर्यंत, योग्य पिठाची पोळी निवडल्याने आरोग्य सुधारू शकते. चला जाणून घेऊया की, कोणत्या समस्येसाठी कोणती पोळी फायदेशीर मानली जाते.

वजन वाढवणे – गहू

जर तुमचे वजन कमी असेल आणि तुम्हाला वजन वाढवायचे असेल, तर तुमच्या आहारात गव्हाच्या चपातीचा समावेश करा. वजन वाढवण्यासाठी गव्हाची चपाती हा बेस्ट पर्याय आहे. गव्हामध्ये पुरेसे कर्बोदके आणि कॅलरीज असतात, जे ऊर्जा प्रदान करण्यास, वजन वाढण्यास मदत करतात. नियमितपणे आणि संतुलित प्रमाणात गव्हाची पोळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण देखील मिळते.

वजन कमी करणे – बार्ली

गव्हाच्या पिठाच्या पोळ्यांमुळे वजन वाढण्याची शक्यता असते, तर जौ (बार्ली)ची पोळी वजन कमी करण्यास मदत करू शकते. बार्लीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही. याशिवाय, पचनक्रियाही सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होते.

मधुमेह – बेसन किंवा चणे

मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी बेसन किंवा चण्याच्या पिठापासून बनवलेली पोळी हा चांगला पर्याय मानला जातो. चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) गव्हाच्या पिठापेक्षा कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही. तसेच, चण्याच्या पिठात प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. फायबरयुक्त पोळीमुळे कार्बोहायड्रेटचे शोषण हळूहळू होते, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि पोटही जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.

बद्धकोष्ठता – बाजरी

जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्या असतील, तर तुमच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. बाजरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते, शौचास साफ होण्यास मदत होते. हिवाळ्यात ही भाकरी खाणे अत्यंत प्रभावी ठरते. यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.

हाडांसाठी – नाचणी

नाचणी कॅल्शियमचा चांगला स्रोत मानली जातो. त्यामुळे नाचणीची भाकरी हाडे मजबूत करण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्धांसाठी फायदेशीर ठरते.

हृदय – ज्वारी

ज्वारीमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात. त्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

प्रथिने – सोयाबीनच्या पिठाची पोळी

स्नायू आणि उतींच्या निर्मितीसाठी प्रथिने आवश्यक असतात. जर तुम्हाला तुमच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवायचे असेल. तर तुम्ही सोयाबीनच्या पिठाची पोळी खाऊ शकता. सोयाबीन प्रथिनांचा एक समृद्ध स्रोत मानला जातो आणि शरीराला आवश्यक अमिनो ॲसिडदेखील पुरवतो.

पचन – मल्टीग्रेन पोळी

मल्टीग्रेन पोळी विविध धान्यांचे पीठ एकत्र करून बनवली जाते. त्यामुळे त्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजांचे प्रमाण अधिक असते. ही पोळी पचनक्रिया सुधारण्यास, शरीराला अधिक पोषण मिळवून देण्यास आणि पोट दीर्घकाळ भरल्यासारखे ठेवण्यास मदत करू शकते. त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक आहारासाठी मल्टीग्रेन पोळी हा एक उत्तम पर्याय मानला जातो.