करोना काळात डायबेटिक पेशंट्सनी लक्षात ठेवायलाच हव्यात ‘या’ १० गोष्टी

करोना काळात विशेषतः डायबेटिक पेशंट्सनी स्वतःची काळजी घेण्यासाठी कोणत्या १० गोष्टींकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे? पाहूया

Diabetic patients need to know these 10 things during corona period gst 97
करोनाचा संसर्ग हा खरंतर प्रत्येकासाठी चिंताजनक आहे. मात्र, याचा तुलनेनं जास्त धोका हा कोमॉर्बिड पेशंट्सना आहे. आज जाणून घेऊया डायबेटिक पेशंट्सबाबत (Photo : Indian Express)

करोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरलं आहे. गेल्या वर्षभरातून अधिकच्या काळात या महामारीमुळे आपण आपली काळजी घेण्याची पद्धत, विशेषत: आरोग्य आणि जीवनशैलीविषयीच्या बहुतांश सवयी बदलल्या आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी आणि संसर्ग झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या सगळ्याबाबत या संपूर्ण काळात सातत्याने जाणून घेत आहोत. दरम्यान, आता जरी करोनाचा संसर्ग काहीसा नियंत्रणात असला तरीही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पाहायला मिळालेला करोनाचा कहर, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आणि अन्य देशांमधील स्थिती लक्षात घेता आपल्याला गाफील राहून चालणार नाही.

करोनाचा संसर्ग हा खरंतर प्रत्येकासाठी चिंताजनक आहे. मात्र, याचा तुलनेनं जास्त धोका हा कोमॉर्बिड पेशंट्स अर्थात आधीपासून काही व्याधी असलेल्या लोकांना आहे. आपल्याला वारंवार याबाबतच्या सूचना देखील मिळाल्या आहेत. आज आपण विशेषतः डायबेटिक पेशंट्सबाबत जाणून घेणार आहोत. दरम्यान, ‘लिव्हअल्टलाइफ’चे सीईओ आणि संस्थापक विवेक सुब्रमण्यम म्हणतात कि, “डायबेटिक पेशंट्सना इतरांच्या तुलनेत करोनाचा धोका जास्त आहे. म्हणून, करोनापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी जास्तीची खबरदारी घेणं आवश्यक आहे.” याच पार्श्वभूमीवर, या करोना काळात विशेषतः डायबेटिक पेशंट्सनी स्वतःची काळजी घेण्यासाठी कोणत्या १० गोष्टींकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे? पाहूया.

  1. श्वासोच्छवासाचे व्यायाम – आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी उच्च तसेच स्थिर ठेवण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
  2. गारग्लिंग आणि ऑइल पुलिंग – गारग्लिंग अर्थात गुळण्या केल्याने तोंडातील जंतू मारण्यास मदत होते. तर रिकाम्या पोटी ऑइल पुलिंग केल्याने आपलं तोंड स्वच्छ राहते. परंतु, गारग्लिंग आणि ऑइल पुलिंग हे दोन्ही उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा करणं पुरेसं आहे. त्याहून जास्त वेळा करू नये.
  3. नियमित औषध – डायबेटिक पेशंट्सनी आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर वाढू नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे औषधं घेणं आवश्यक आहे. कारण, करोनाचं निदान झाल्यास रक्तातील वाढलेली साखरेची पातळी चिंताजनक ठरू शकते.
  4. शरीरातील साखरेवर कडक नियंत्रण – कोणत्याही रोगांपासून संरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा पोषण आहार सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात लो कार्ब आणि हाय फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आहारात प्रथिनांचं प्रमाण कमी ते मध्यम ठेवा. दिवसातील फक्त ८-१० तासांमध्येच आवश्यक तो आहार घ्या आणि उर्वरित तास उपवास करा. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि डायबेटीस नियंत्रणात राहण्यात मदत होते.
  5. ताज्या भाज्या आणि फळे – शरीरासाठी आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजतत्त्व मिळवण्यासाठी आहाराचा मुख्य भाग म्हणून विविध प्रकारची ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. उदा. सफरचंद, टरबूज, द्राक्ष, अननस, पपई, केळी, हिरव्या पालेभाज्या, भोपळी मिरची, स्क्वॅश, टोमॅटो, कांदा, लसूण, सगळ्या क्रूसिफेरस भाज्यांचा (ब्रोकोली, मुळा, कोबी, फ्लॉवर इ.)
  6. पूरक आहार – आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात झिंकसह व्हिटॅमिन सी, डी आणि ए असलेल्या पदार्थांचा समावेश करा. परंतु, हा आहार फार जास्त काळ सुरु ठेवू नका.
  7. SpO2 चे निरीक्षण करा (दिवसातून दोनदा) – सातत्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजणं फार महत्त्वाचं आहे. ९५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन सँक्च्युरेशन हे रोगाच्या संसर्गाचा लवकर मिळालेला इशारा असू शकतो, हे लक्षात घ्या.
  8. लक्षणांची लवकर ओळख आणि उपचार – सौम्य ताप, घसा खवखवणं, थकवा, श्वास घेण्यात अडचण इत्यादी लक्षणं जाणवल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.
  9. जीवनशैलीमधील बदल – स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दर तासाला पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तुमच्या झोपेचं वेळापत्रक नीट करा. दररोज ६ ते ८ तास झोप घेणं आवश्यक आहे. निराशा दूर करून आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारण्यासाठी दररोज मेडिटेशन आणि व्यायाम जरूर करा.
  10. सुरक्षित अंतर ठेवा – करोना व्हायरसच्या संपर्कात येण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी करोनाविषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करा. सुरक्षित अंतर ठेवणं, गर्दी टाळणं, स्वच्छता ठेवणं, मास्क वापरणं हे  त्यातील प्रमुख मुद्दे आहेत.

दरम्यान, याबाबत तुमच्या फॅमिली डॉक्टर आणि या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diabetic patients need to know these 10 things during corona period gst