Foods to Avoid for Heart Health: हृदयविकाराचा झटका हा क्षणात येतो, अशी सर्वसामान्यांची समजूत आहे. मात्र, वास्तव वेगळंच आहे. हा झटका अचानक न येता, अनेक वर्षं शरीरात हळूहळू साचणाऱ्या घातक बदलांचा परिणाम असतो. चुकीच्या आहार पद्धतीमुळे सूज (इन्फ्लमेशन), इन्सुलिन प्रतिकार व रक्तवाहिन्यांचे नुकसान वाढत जाते आणि शेवटी मोठा धोका निर्माण होतो.

नवी दिल्लीतील द्वारका येथे कार्यरत असलेले २४ वर्षांचा अनुभव असलेले मधुमेह तज्ज्ञ डॉ. बृजमोहन अरोरा यांनी याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या मते, “जर तुम्हाला आयुष्यात कधीही अचानक हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल, तर आहारातील या ५ चुका तत्काळ थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. या चुका आतून हृदयाचं नुकसान करतात आणि लक्षणं थेट झटक्याच्या वेळीच दिसतात.”

रोज खाल्ले जाणारे ‘हे’ ५ पदार्थ वाढवतात हार्ट अटॅकचा धोका

१) रिफाईंड सीड ऑईल – स्वयंपाकात लपलेला धोका

मोहरी, सूर्यफूल यांसारखी रिफाईंड तेलं जास्त प्रमाणात वापरल्यास शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतो. त्याऐवजी मर्यादित प्रमाणात तूप, लोणी, नारळ तेल किंवा शेंगदाणा तेल वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Award Banner

२) पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड – चवदार; पण घातक

चिप्स, बिस्किटं, रेडीमेड स्नॅक्स यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, मीठ व रिफाईंड कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. हे पदार्थ रक्तातील साखर झपाट्यानं वाढवतात, सूज वाढवतात आणि रक्तवाहिन्यांचं नुकसान करतात. त्यामुळे पोटावर चरबी साठते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

३) साखरयुक्त पेयं – गोड विष!

कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स व पॅकेज्ड ज्यूस हे द्रावणीय पदार्थ ‘लिक्विड साखर’ म्हणून ओळखले जातात. हे रक्तात लगेच मिसळून साखर आणि इन्सुलिनची पातळी वाढवतात. परिणामी चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) कमी होतं आणि ट्रायग्लिसराइड्स वाढतात, जे हृदयासाठी धोकादायक ठरतं.

४) रिफाईंड धान्य – रोजच्या आहारातील मोठी चूक

पास्ता, नूडल्स, ब्रेड यांसारखे पदार्थ रिफाईंड धान्यांपासून तयार होतात. त्यांचा सातत्याने वापर केल्यास इन्सुलिन प्रतिकार वाढतो आणि शरीरात सूज निर्माण होते, ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.

५) प्रोसेस्ड मांस – शांतपणे वाढणारा धोका

सॉसेज, सलामी यांसारख्या प्रोसेस्ड मांसामध्ये नायट्रेट्स, जास्त मीठ व रसायनं असतात. हे घटक हळूहळू हृदयाच्या कार्यावर परिणाम करतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात.

तज्ज्ञांचा अंतिम इशारा

डॉ. अरोरा स्पष्ट सांगतात, “या ५ चुका म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख कारण आहेत. कितीही सप्लिमेंट्स घेतले तरी चुकीचा आहार चालू ठेवला, तर त्याचा फायदा होत नाही.”

त्यामुळे आजच आपल्या आहारात बदल करा. कारण- हृदयविकाराचा झटका टाळणं हे औषधांपेक्षा आपल्या रोजच्या सवयींवर अधिक अवलंबून आहे.