जेवणानंतर आराम करावासा वाटतो. बऱ्याच लोकांच्या दृष्टीन जेवणानंतर कोमट पाण्याने अंघोळ करणे हा आराम करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पण, तुम्ही कदाचित अनेकदा ऐकले असेल की, जेवणानंतर लगेच अंघोळ करणे टाळावे. असे म्हटले जाते की, त्यामुळे पचनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, पोटात पेटके येऊ शकतात किंवा अपचन होऊ शकते.

पण, जेवणानंतर लगेच अंघोळ करणे खरंच इतके हानिकारक आहे का? याचे उत्तर इतके सोपे नाही. जेवणानंतर लगेच गरम पाण्याने अंघोळ करणे प्रत्येकासाठी हानिकारक आहे, हे सिद्ध करणारे कोणतेही निश्चित वैज्ञानिक संशोधन आजपर्यंत झालेले नाही. तरीही जेवणानंतर शरीरात होणारे बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे.

अन्न खाल्ल्यानंतर शरीरात काय घडते?

हेल्थलाइन या आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, जेव्हा तुम्ही अन्न खाता, तेव्हा तुमचे शरीर ते पचवण्याची प्रक्रिया सुरू करते. या प्रक्रियेदरम्यान, पचनसंस्थेच्या अवयवांकडे होणारा रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळेच पोटभर जेवणानंतर तुम्हाला तुमच्या शरीरात किंचित उष्णता जाणवू शकते.

आता जर तुम्ही या वेळी गरम पाण्याने अंघोळ केली, तर तुमच्या शरीराचे तापमानही किंचित वाढू शकते. गरम पाण्यामुळे शरीरात ‘हायपरथर्मिक ॲक्शन’ नावाची एक प्रक्रिया सक्रिय होते, ज्यामुळे शरीराचे अंतर्गत तापमान किंचित वाढू शकते. त्यामुळेच जेवणानंतर लगेच गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील रक्तप्रवाह आणि तापमानातील बदलांमुळे पचनक्रियेत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. तथापि, याच्या बाजूने किंवा विरोधात कोणताही निर्णायक वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

गरम पाण्याने अंघोळ केल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात?

गरम पाण्याने अंघोळ करणे आरामदायी असू शकते; पण त्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. जर तुम्ही नुकतेच पोटभर जेवण केले असेल, तर पोट भरलेले असताना होणारा हा बदल काहींना अस्वस्थ करणारा असू शकतो. विशेषतः चरबी, प्रथिने किंवा फायबर जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर, तुम्हाला पोट फुगल्यासारखे किंवा जड वाटू शकते. जर यावेळी शरीर गरम पाण्याच्या संपर्कात आले, तर काहींना पोटात गोळे येणे, छातीत अस्वस्थता किंवा छातीत जळजळ जाणवू शकते. तथापि, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतेच, असे नाही. शरीराची प्रतिक्रिया तुम्ही काय आणि किती प्रमाणात खाल्ले आहे यावरही अवलंबून असते.

जर तुम्हाला अंघोळ करायची असेल, तर कोणत्या प्रकारचे पाणी चांगले असते?

जेवणानंतर लगेच अंघोळ करण्याची गरज भासल्यास आणि अस्वस्थता टाळायची असल्यास, खूप गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याने अंघोळ करणे हा एक पर्याय असू शकतो. थंड पाणी शरीराचे मूळ तापमान वाढविण्याऐवजी ते कमी करण्याचे काम करते. त्यामुळे गरम पाण्याच्या तुलनेत ते शरीरावर उष्णतेचे होणारे अतिरिक्त परिणाम कमी करू शकते. तथापि, याचा अर्थ असा नाही की, जेवणानंतर लगेच थंड पाण्याने अंघोळ करणे प्रत्येकासाठी आवश्यक किंवा अधिक चांगले आहे. मुद्दा हा आहे की, जेवणानंतर अंघोळ करताना तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास, थोडा वेळ थांबणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

जेवणानंतर अंघोळ करण्यासाठी अशी कोणतीही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली वेळमर्यादा नाही, जी प्रत्येकाने पाळली पाहिजे. साधारणपणे, २० मिनिटे ते एक तास थांबण्याची शिफारस केली जाते, विशेषतः जर जेवण जड असेल तर, जर तुम्ही हलके जेवण केले असेल, तर अस्वस्थता जाणवण्याची शक्यता वेगळी असू शकते. तथापि, भरपूर किंवा जड जेवणानंतर थोडा जास्त वेळ थांबणे अधिक आरामदायक असू शकते. याचा अर्थ असा की, जेवणानंतर किती वेळेत अंघोळ करावी हाच केवळ महत्त्वाचा मुद्दा नाही. तुम्ही किती आणि कोणत्या प्रकारचे अन्न खाल्ले आहे आणि पाणी किती गरम आहे, याचा विचार करणेदेखील महत्त्वाचे आहे.

जेवणानंतर लगेच इतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

जेवणानंतर अंघोळ करणे ही लोकांची एकमेव चिंता नाही. इतर सवयींचाही पचनाशी संबंध असल्याचे मानले जाते. उदाहरणार्थ- जेवणानंतर लगेच दात घासणे टाळणे उत्तम, विशेषतः जर तुम्ही जास्त आम्लयुक्त पदार्थ खाल्ले असतील. अशा जेवणानंतर लगेच दात घासल्याने तुमच्या दातांच्या आवरणावर परिणाम होऊ शकतो. असे करण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे थांबणे उत्तम.

जेवणानंतर लगेच पोहणे टाळावे, असा एक सामान्य समज असला तरी याला पाठिंबा देणारे पुरेसे पुरावे नाहीत. त्याचप्रमाणे जेवणानंतर लगेच जोरदार व्यायाम केल्याने पोटात अस्वस्थता येऊ शकते. जड जेवणानंतर व्यायाम सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ थांबणे उत्तम ठरू शकते. जेवणानंतर लगेच झोपल्याने काही लोकांमध्ये ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे जेवण आणि झोप यांच्यामध्ये थोडे अंतर ठेवणे फायदेशीर ठरू शकते.

तर मग जेवणानंतर लगेच अंघोळ करणे चुकीचे आहे का?

हे सरळसरळ चुकीचे आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. जेवणानंतर लगेच गरम पाण्याने अंघोळ केल्याने पचनक्रियेत निश्चितपणे अडथळा येतो किंवा तिला हानी पोहोचते, हे उपलब्ध पुरावे ठामपणे सिद्ध करत नाहीत. मात्र, जर तुम्हाला जेवणानंतर पोटदुखी, पोटात गोळे येणे, अपचन किंवा छातीत जळजळ जाणवत असेल, तर लगेच गरम पाण्याने अंघोळ करण्याऐवजी थोडा वेळ थांबणे अधिक चांगले ठरू शकते.