Esophageal Cancer Early Symptoms: आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक गंभीर आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामध्ये कर्करोग हा सर्वांत धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो. या आजाराचे मोठे आव्हान म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे अनेकदा स्पष्ट दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना आजाराची माहिती उशिरा होते आणि उपचारही उशिरा सुरू होतात.
आजकाल स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, त्वचेचा कर्करोग आणि अन्ननलिकेचा कर्करोग (Esophagus Cancer) हे प्रकार तुलनेने अधिक आढळतात. अन्ननलिका म्हणजे आपल्या तोंडातून पोटापर्यंत अन्न पोहोचवणारी नळी. यालाच मराठीत ग्रसनी किंवा अन्ननलिका असेही म्हटले जाते. या भागात कर्करोग निर्माण झाल्यास सुरुवातीला काही सामान्य वाटणारी लक्षणे दिसू शकतात, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
तज्ज्ञांच्या मते, अन्ननलिकेच्या कर्करोगाची काही लक्षणे इतकी सामान्य असतात की, ती इतर किरकोळ समस्यांसारखी वाटू शकतात. मात्र, हीच लक्षणे वेळेवर ओळखली, तर आजारावर योग्य वेळी उपचार सुरू करता येतात.
काही खाताना वा गिळताना त्रास होणे हे महत्त्वाचे लक्षण
अन्ननलिकेच्या कर्करोगाचे सर्वांत सुरुवातीचे आणि सामान्य लक्षण म्हणजे काही खाताना किंवा द्रवपदार्थ गिळताना त्रास होणे. वैद्यकीय भाषेत या समस्येला डिस्फॅजिया, असे म्हणतात.
जर तुम्हाला काही खाताना किंवा पिताना घशात अडथळा जाणवत असेल, खोकला येत असेल किंवा अन्न गिळताना त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळा अन्न गिळण्याचा प्रयत्न करताना ते नाकातून किंवा तोंडातून परत येऊ शकते. झोपलेल्या अवस्थेत ही समस्या अधिक जाणवू शकते.
या त्रासामुळे व्यक्तीला अन्न नीट चावणेही कठीण होते. त्यामुळे अनेकदा लोक अन्न चावण्याऐवजी थेट गिळण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे वेदना अधिक वाढू शकतात. काहींना असेही वाटते की, घशात काहीतरी अडकले आहे.
आजार वाढल्यास समस्या अधिक गंभीर होण्याचा धोका
जर अन्ननलिकेचा कर्करोग वाढू लागला, तर ही समस्या अधिक तीव्र आणि वेदनादायक होऊ शकते. हळूहळू अन्ननलिका अरुंद होऊ लागते, त्यामुळे अन्न खाली जाणे अधिक कठीण होते. परिणामी रुग्णाला अन्न गिळताना सतत त्रास जाणवू शकतो.
अन्ननलिकेच्या कर्करोगाची इतर लक्षणे
खाणे गिळताना त्रास होण्याबरोबरच या आजाराची काही इतर लक्षणेही दिसू शकतात. उदाहरणार्थ-
- सतत थकवा जाणवणे
- उलट्या होणे
- अॅसिडिटी किंवा अॅसिड रिफ्लक्स
- छातीत जळजळ (हार्टबर्न)
- सतत खोकला येणे
- भूक कमी होणे
- छातीत वेदना जाणवणे
- आवाजात बदल होणे
ही लक्षणे दीर्घकाळ टिकत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका कसा कमी कराल?
तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीत काही बदल करून या आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान यांसारख्या सवयी टाळणे. या सवयी अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
त्याशिवाय आपल्या आहारात फळे आणि भाज्या यांचा भरपूर समावेश करणे गरजेचे आहे. विविध रंगांची फळे व भाज्या शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात. तसेच शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, शरीरातील लहानसहान बदलांकडे दुर्लक्ष करू नका. खाताना वा गिळताना वारंवार त्रास होत असल्यास त्याकडे गांभीर्याने पाहा आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. योग्य वेळी निदान झाले, तर गंभीर आजारांवरही प्रभावी उपचार शक्य होतात.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
