डिजिटल साठेबाजी

स्मार्टफोनमध्येच डोकावून पाहिलं तर आपल्याला अनेक अनावश्यक अ‍ॅप आढळून येतील.

असं कधी झालंय का की तुमच्या ड्रॉवरमध्ये बऱ्याच काळापासून वस्तू पडून आहेत आणि मुळात या वस्तू फेकून न देता आपण इथे का ठेवल्यात, असा प्रश्न तुम्हाला पडला? अशा अनावश्यक वस्तू साठवून ठेवणं हे काही फक्त ऑफलाइन जगापुरतं मर्यादित नाही. तुमच्या गॅजेटमध्ये नजर टाकलीत तर याबद्दल बरंच काही कळेल. आपण सगळेच अनावश्यक डेटा साठवून ठेवत असतो.

‘साठेबाजी’ हा शब्द सर्वाना माहीतच आहे. कांदे किंवा तत्सम जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून त्यातून भविष्यात आर्थिक गैरफायदा मिळवण्याचे प्रकार नेहमीच होत असतात. सध्याच्या करोनाकाळात संबंधित औषधे, इंजेक्शन यांची साठेबाजी किंवा बेकायदा साठा करून ठेवल्याच्या घटनाही उघडकीस येत आहेत. मात्र साठेबाजी ही केवळ ऑफलाइन जगापुरती मर्यादित नाही आणि ती केवळ आवश्यक गोष्टींचीच होते, असंही नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपल्या घरात अशा अनेक वस्तू आपण उगाच साठवून ठेवतो. भविष्यात त्यांचा काही तरी वापर होईल, म्हणून साठवून ठेवलेल्या या वस्तू योग्य वापर न झाल्यास अडगळ बनू लागतात. डिजिटल विश्वातही अशी अडगळ असतेच.

स्मार्टफोनमध्येच डोकावून पाहिलं तर आपल्याला अनेक अनावश्यक अ‍ॅप आढळून येतील. व्हॉट्सअ‍ॅपवर विविध ग्रुपवरून आलेली छायाचित्रे, व्हिडीओ यांचाही आपल्या नकळत साठा होत जातो. आपल्या मेलबॉक्समध्ये अनेक अनावश्यक किंवा बिनमहत्त्वाचे ईमेल आपण साठवून ठेवलेले असतात. वापर होऊन गेलेल्या किंवा काहीही वापराच्या नसलेल्या अनेक फाइल्स आपल्या संगणकामध्ये पडून असतात. याला ‘डिजिटल होर्डिग’ अर्थात ‘डिजिटल साठेबाजी’ म्हणतात.

आपण जितका जास्त डेटा ठेवू तितकी सायबर सुरक्षेच्या संदर्भात धोके आणि सायबर गुन्ह्य़ांना बळी पडण्याची शक्यता वाढते. नावाप्रमाणेच, डिजिटल होर्डिग (किंवा डेटा होर्डिग) म्हणजे आपल्या डिजिटल कण्टेण्टचा ढीग रचत राहणे. फक्त सायबर सुरक्षाच नाही तर आपल्या आणि पर्यावरणाच्या हितासंदर्भातही याचे नकारात्मक परिणाम होतात.

डिजिटल साठवणुकीच्या क्षमता वाढत आहेत. त्यामुळे अतिरिक्त प्रमाणातील डिजिटल कण्टेण्ट साठवून ठेवण्यासाठी आपल्याकडे बरीच जागा आहे, असे आपल्याला वाटू शकते. पण असे करताना त्यासोबत आपण अयोग्य गोष्टींनाही वाव देऊन धोके निर्माण करत असतो. त्यामुळे ‘डिजिटल साठेबाज’ बनण्याचे टाळून आपल्या गॅजेटचे योग्य व्यवस्थापन करा. यामुळे गॅजेट दीर्घकाळ अधिक सक्षमपणे काम करू शकेल आणि तुम्हीही ताणमुक्त व्हाल.

डिजिटल साठेबाजीचे परिणाम

गॅजेटचा वेग कमी होणे : तुमच्या हार्ड ड्राइव्हला जितका जास्त डेटा व्यवस्थापित करावा लागेल तितकेच त्याचे काम वाढेल आणि परिणामी गॅजेटचा वेग कमी होतो. आपण जितका जास्त डेटा ठेवू तितकाच सायबर सुरक्षेच्या संदर्भात तो हरवण्याचा किंवा त्याचा दुरुपयोग होण्याचा धोका वाढतो.

उत्पादकतेत घट : इंटरनेट अल्गोरिदममुळे आपल्याला गोष्टींचा शोध घेणे सोपे जाते. मात्र आपला सगळा डिजिटल डेटा असा शोधणे वाटतं तितकं सोपं नाही. वर्षभरापूर्वी काढलेला एखादा फोटो शोधण्यासाठी तुम्हाला कदाचित फोनमधल्या गॅलरीत दहा मिनिटं स्क्रोल करावं लागू शकतं!

ताण वाढतो : जितका डेटा अधिक तितकं त्याचं अधिक नियंत्रण तुम्हाला करावं लागतं आणि तुमच्याकडे व्यवस्थापन कौशल्य नसेल तर तुम्ही हा डेटा वेगाने गमावून बसण्याची शक्यताही अधिक असते. शिवाय हे सगळं आता सावरता येत नाही असं लक्षात आल्यावर त्याचा ताण वाढत जातो.

डिजिटल साठेबाजीचे प्रकार व उपाय

१. ईमेलनी भरलेला इनबॉक्स

तुम्ही कधीही वाचत नाही अशा न्यूजलेटर्सना ठरवून अनसबस्क्राइब करा किंवा साफसफाई करण्याचा वेगवान उपाय म्हणजे ‘डिलिट ऑल’वर क्लिक करा. तो ईमेल खरंच फार महत्त्वाचा असेल तर सेंडर परत पाठवलेच की!

२. विविध आयकॉन आणि दुबार फायली

तुमच्या डेस्कटॉपला अगदी तुमच्या कामाच्या टेबलप्रमाणे वापरा. तिथे वस्तूंची गर्दी असली की कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं हे लक्षात घ्या. ‘महत्त्वाचे’, ‘चटकन लागणारे’ म्हणजेच असे चटकन पाहता येतील, असे फोल्डर तयार करा. इतकंच नाही ‘टॉस मी टुडे’ असा एक फोल्डर एकदाच डाऊनलोड करण्याच्या किंवा स्क्रीनशॉटसारख्या कण्टेण्टसाठी बनवा. फारच महत्त्वाचं जे असेल ते क्लाऊड स्टोरेजवर ठेवा.

३. अनावश्यक बुकमार्क

स्वत:साठी बुकमार्कची मर्यादा ठरवा आणि दर महिन्याला त्याचे ऑडिट करून संदर्भ तपासा आणि नव्या बुकमार्कसाठी जागा करा.

४. मेसेज व छायाचित्रे

तुमचे मेसेज आणि फोटो कित्येक वर्षांपासूनच आहेत आणि इतके अ‍ॅप्स कसले आहेत हेही माहीत नाही. ‘कीप मॅसेज’ फीचर फक्त ३० दिवसांसाठी किंवा एक वर्षांसाठी ठेवा : कायमस्वरूपी नाही. तुमच्या अ‍ॅप्सवरही लक्ष द्या. गरजेनुसार वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅप्सप्रमाणे वर्गीकरण करा. उदा. प्रवासाशी संबंधित. महिन्यातून एकदा कॅमेऱ्यातील फोटोंवरही नजर टाका आणि अनावश्यक साठवून ठेवलेल्या गोष्टी डिलिट करा.

५. क्लाऊडवरील डेटा

दरमहा साधारण १० मिनिटे तुमच्या ‘क्लाऊड स्टोअरेज’साठी द्या आणि कुठे काय बॅकअप ठेवलाय, कसे वर्गीकरण केलेय याची नव्याने माहिती करून घ्या. जे नको आहे ते डिलिट करा आणि त्यानुसार नव्याने सेटिंग्ज करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Digital hoarding and its impact on people zws