Raw Onion Can Be Harmful: कांदा हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेवणात तसेच सॅलडमध्ये कांदा आवडीने खाल्ला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की, कच्चा कांदा खाणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही. काहींना यामुळे आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

कांद्यामध्ये अनेक पोषक तत्त्वे असले तरी त्याचे काही गुणधर्म आणि घटक काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे कोणी कच्चा कांद्याचे सेवन करणे टाळावे आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते जाणून घेऊ…

  • पचनाच्या समस्या असलेले लोक

ज्या लोकांना आधीपासूनच गॅस, अपचन किंवा पोटात गॅस होण्यासारख्या समस्या आहेत, त्यांनी कच्चा कांदा खाणे टाळावे. त्यामुळे त्रास वाढवू शकतो. कारण- कांद्यातील काही घटकांमुळे पोटात गॅस तयार होतो, ज्यामुळे जडपणा, पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू शकते. या लोकांनी कच्चा कांदा योग्य प्रमाणात खावा किंवा अजिबात खाऊ नये.

Award Banner
  • आम्लपित्ताचे रुग्ण

कच्च्या कांद्यामुळे पोटातील आम्लाची पातळी वाढू शकते. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर व घसा खवखवणे यांसारख्या समस्या वाढू शकतात. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी कच्चा कांदा खाणे टाळावे.

  • अॅलर्जी असलेले लोक

काही लोकांना कांद्याच्या सेवनामुळे अॅलर्जी होऊ शकते. कच्चा कांदा खाल्ल्यानंतर त्वचेला खाज सुटणे, लाल पुरळ येणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी ताबडतोब कच्चा कांदा खाणे टाळावे.

  • रक्तदाब असलेले आणि औषधोपचार घेणारे लोक

कांद्यामध्ये रक्त पातळ करण्यास मदत करणारे गुणधर्म आहेत. सामान्य परिस्थितीत हे फायदेशीर ठरू शकते; परंतु जे लोक आधीपासूनच रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत, त्यांच्यासाठी ते धोकादायक ठरू शकते.
त्यामुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय याचे मोठ्या प्रमाणात सेवन करू नये.

  • शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर

जर एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिया होणार असेल किंवा नुकतीच झाली असेल, तर कच्चा कांदा खाणे टाळावे. त्यामुळे रक्त पातळ होऊ शकते, ज्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो. डॉक्टर शस्त्रक्रियेच्या काही दिवस आधी आणि नंतर अशा गोष्टी टाळण्याचा सल्ला देतात.

कच्चा कांदा खाल्ल्याने होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या सर्व परिस्थितींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)