Disease Symptoms: लोकांना अनेकदा असं वाटतं की शरीरात एखादा आजार अचानक झाला आहे, पण प्रत्यक्षात तो आजार हळूहळू शरीरात आपली जागा बनवत असतो. या काळात शरीरात काही लक्षणं आणि बदल दिसून येतात, ज्यांना आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो. मात्र, या लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असतं.
इथे प्रत्येक छोट्या-मोठ्या आजाराआधी शरीरात दिसणाऱ्या अशाच काही बदलांबद्दल सांगितलं आहे, जे वेळेत ओळखणं खूप महत्त्वाचं आहे.
डोकेदुखी आणि चक्कर येणे
एकीकडे दीर्घकाळ सतत डोकेदुखी होणं हे मायग्रेनचं लक्षण असू शकतं, तर दुसरीकडे सतत चक्कर येणं हे शरीरात रक्ताची कमतरता किंवा रक्तदाब कमी असल्याचं संकेत असू शकतं. शरीरात अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
वारंवार इन्फेक्शन होणे आणि जखमा होणे
वर्षातून ४ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा इन्फेक्शन होणं आणि अगदी साधी जखम भरून येण्यासाठी जास्त वेळ लागणं, याचा अर्थ रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रकारे काम करत नाही, असा होऊ शकतो. डायबिटीज नियंत्रणाबाहेर असल्यासही इन्फेक्शन किंवा जखम लवकर बरी होत नाही.
श्वास घेण्यास त्रास होणे
काही लोकांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो, पण ते याला सामान्यपणे धाप लागणे समजून दुर्लक्ष करतात. मात्र, हे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता, फुफ्फुसांशी संबंधित समस्या किंवा हृदयाच्या आजाराचे संकेत असू शकतात.
सतत झोप येणे
जर तुम्हाला बसल्या बसल्या कुठेही झोप लागत असेल किंवा सतत झोप येत असेल, तर यामागे शरीरातील हार्मोन्सचा असंतुलन असू शकतो. याचा सरळ अर्थ थायरॉइडमध्ये काही समस्या असू शकते. याशिवाय, शरीरात पोषक घटकांची, विशेषतः आयर्नची कमतरता असल्यासही खूप सुस्ती येते.
अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे
6 महिन्यांच्या आत वजन झपाट्याने कमी होणं किंवा वाढणं हे थायरॉइड, डायबिटीज आणि गंभीर परिस्थितीत टीबी किंवा कॅन्सरसारख्या आजारांचे संकेत असू शकतात. मात्र, वजन कमी होण्यासोबत दिसणारी इतर अनेक लक्षणंही या आजारांची अचूक ओळख करण्यासाठी महत्त्वाची असतात.
शरीरात असामान्य वेदना होणे
शरीरात वारंवार होणाऱ्या वेदना सामान्य नसतात. जर या वेदनांचा संबंध हाडांच्या दुखण्याशी असेल, तर ते संधिवातासारख्या समस्येचे संकेत असू शकतात. अनेक वेळा शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यामुळेही थकवा आणि शरीरदुखी जाणवू शकते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
