Diwali Cleaning Tips: दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर आली आहे. अशात घराची साफसफाई करणं अवघड होऊन जातं. घरातील कोपरा न कोपरा साफ करण्याआधी काही टिप्स जाणून घेतल्या तर अवघड कामही सोप्प होतं. किचनमध्ये अनेकदा ट्रॉली साफ करताना अनेकांना त्रास होतो. पण आज आपण एक अशी ट्रिक जाणून घेणार आहोत ज्याने किचनची ट्रॉली झटक्यात साफ होईल.
ॲल्युमिनियम फॉइलचा किचनमध्ये अनेक प्रकारे वापर केला जातो. सामान्यतः पोळी, ब्रेड किंवा इतर खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी याचा उपयोग होतो. मात्र, याचा वापर साफसफाईसाठीही करता येतो. किचनमधील ड्रॉअरमध्ये ॲल्युमिनियम फॉइल लावणे हा देखील एक सोपा आणि उपयोगी उपाय आहे.
बहुतेक किचनमधील ड्रॉअर लाकडी असतात आणि त्यामध्ये हळूहळू घाण साचत जाते. ही घाण हट्टी झाली की ती साफ करणे कठीण होते. अशावेळी ड्रॉअरमध्ये ॲल्युमिनियम फॉइल अंथरल्यास अनेक फायदे मिळू शकतात.
ड्रॉअरमध्ये ॲल्युमिनियम फॉइल अंथरल्याने काय फायदे होतात? (Kitchen Trolley Cleaning Tips)
साफसफाई करणे सोपे होते: ड्रॉअरमध्ये ॲल्युमिनियम फॉइल लावल्यामुळे साफसफाई करणे सोपे होते. ड्रॉअर घासण्याची गरज पडत नाही. फॉइल बाहेर काढल्यावर त्यासोबत साचलेली घाणही सहज निघून जाते.
डाग पडत नाहीत: ड्रॉअरमध्ये काही सांडले तरी ते थेट फॉइलवरच राहते. त्यामुळे ड्रॉअरवर डाग पडत नाहीत आणि तो खराबही होत नाही.
कमी खर्चाचा उपाय: ड्रॉअरचे संरक्षण करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइल हा कमी खर्चाचा आणि सोपा पर्याय आहे.
सहज बदलता येते: ॲल्युमिनियम फॉइल खराब झाले किंवा काढायचे असल्यास ते सहज बदलता येते.
ॲल्युमिनियम फॉइल कधी बदलावे?
ॲल्युमिनियम फॉइल किती दिवसांनी बदलावे याचा ठरावीक नियम नाही. फॉइलवर घाण, तेलकटपणा, अन्न किंवा मसाल्याचे डाग दिसू लागले तर ते बदलावे. तसेच फॉइल फाटले असेल किंवा त्याच्या वर किंवा खाली ओलावा दिसत असेल, तर जुने फॉइल काढून नवीन फॉइल अंथरावे.
ॲल्युमिनियम फॉइलचा आणखी कुठे वापर करता येतो?
किचनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा अनेक प्रकारे वापर करता येतो. ओव्हनमध्ये लाइनिंग म्हणून त्याचा वापर करता येतो. तसेच फॉइल दुमडून जाड करून त्याला हवी ती आकार देऊन कुकी कटरही तयार करता येतो.
एखाद्या भांड्यातील द्रव दुसऱ्या भांड्यात किंवा पुन्हा बाटलीत ओतण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा फनेल (कीप) बनवता येतो.
ॲल्युमिनियम फॉइलचा गोळा करून त्यावर चाकू किंवा कात्री घासल्यास त्यांची धार अधिक तीक्ष्ण होण्यास मदत होते.
भांडी घासून स्वच्छ करण्यासाठीही ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करता येतो. फॉइलचा गोळा करून भांडी घासल्यास घाण लवकर निघण्यास मदत होते.
