Lizard Removal Tips: उन्हाळा आणि पावसाळ्यात अनेक घरात पालींचा सुळसुळाट वाढतो. कितीही साफसफाई केली तरी पालींचा उपद्रव कमी होत नाही. घराच्या भिंतींवर, तर कधी किचनवर या पाली फिरताना दिसतात. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतोय. तसेच घरात फिरणाऱ्या पालींमुळे किळसवाणेदेखील वाटते. अनेकदा महागडी कीटकनाशके किंवा रसायन फवारूनही त्या जात नाहीत. पण, अशी परिस्थिती असली तरी तुम्ही काही घरगुती गोष्टींचा वापर करून पालींना पळवून लावू शकता.

१) शॅम्पू आणि कांदा

पालींना पळवून लावण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे स्प्रे. तो बनविण्यासाठी एक रुपयाचा कोणताही शॅम्पूचा पाऊच घ्या, त्यात कांद्याचा रस पिळून घ्या आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घाला. हे तिन्ही घटक व्यवस्थित एकत्र मिसळा आणि तयार झालेले द्रावण एका स्प्रे बाटलीमध्ये भरा. ते द्रावण चांगले हलवा आता जिथे जिथे तुम्हाला पाली दिसतील तिथे तिथे ते स्प्रे करा. कांद्याचा उग्र वास आणि शॅम्पूचा चिकटपणा पालींना भिंतींवर रेंगाळण्यापासून रोखतो.

२) काळी मिरी आणि थंड पाणी

पालींना उग्र वास आणि तापमानात अचानक झालेला बदल सहन होत नाही. ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन, थंड पाण्यात काळी मिरी पूड किंवा लाल मिरची पूड मिसळा. तयार केलेल्या या द्रावणाचा स्प्रे पालींवर फवारताच त्या घाबरून घरातून पळून जातील.

Award Banner

३) अंड्याची कवचे

पालींना अंड्याच्या कवचांची खूप भीती वाटते. त्यांना वाटते की, तो एखादा मोठा शिकारी पक्षी आहे. म्हणून रिकामी अंड्याची कवचे धुऊन किचनच्या कोपऱ्यात किंवा खिडकीच्या चौकटीवर ठेवा. दर १५ दिवसांनी ती बदला.

४) कॉफी आणि तंबाखू

जर तुमच्या घरातून पाली काही केल्या जात नसतील, तर त्यांना घालवण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत आहे. कॉफी पावडर आणि तंबाखू समान प्रमाणात घ्या. नंतर त्यात थोडे पाणी घालून, ते द्रावणीय मिश्रण एकजीव करा आणि त्याचे गोळे बनवा. ते काडीपेटीच्या काड्यांवर किंवा टूथपिकवर ठेवून, कपाटांच्या मागे किंवा कोपऱ्यांमध्ये ठेवा. त्याच्या वासामुळे पाली दूर राहण्यास मदत होईल.

५) नॅफ्थॅलीन किंवा कापूर गोळ्या

जर तुम्हाला जास्त मेहनत नको असेल, तर तुम्ही पालींना पळवण्यासाछी नॅप्थॅलीनच्या गोळ्या किंवा कापूर हा सर्वांत सोपा उपाय आहे. सिंकखाली, स्टोअर रूम आणि कपाटांच्या कोपऱ्यांमध्ये १-२ गोळ्या ठेवा. त्यांच्या वासामुळे पालीच नाही, तर लहान-मोठे कीटकही दूर राहतील.