Body Wash Benefits And Side Effects : हल्ली अनेक जण अंघोळ करण्यासाठी साबणाऐवजी बॉडी वॉशचा वापर करतात. हे लावणे सोपे असते आणि अंघोळीनंतर शरीर स्वच्छ व ताजेतवाने वाटते. पण, अनेकदा जास्त फेस व्हावा किंवा शरीर उत्तम प्रकारे स्वच्छ व्हावे यासाठी लोक गरजेपेक्षा जास्त बॉडी वॉश वापरतात.

जर तुम्हीही रोज बॉडी वॉश वापरत असाल, तर त्याचे प्रमाण आणि वापरण्याची योग्य पद्धत माहिती असणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे त्वचेवर कोरडेपणा आणि घट्टपणा जाणवू शकते.

एका वेळी किती बॉडी वॉश घ्यावा?

संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात बॉडी वॉश घेण्याची अजिबात गरज नसते. सुरुवातीला साधारण एका नाण्याएवढ्या (कॉइन साईज) प्रमाणात बॉडी वॉश घेऊन, तो ओल्या लूफावर किंवा अंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्पंजवर टाकावा आणि हलका फेस तयार करावा. गरज वाटल्यास तुम्ही आणखी थोड्या प्रमाणात घेऊ शकता.

उत्पादन जास्त प्रमाणात घेतल्यामुळे शरीर जास्त स्वच्छ होईलच, असे नाही; उलट त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.

लूफाचा वापर करा; पण हलक्या हाताने

बॉडी वॉश लावताना लोफा (शरीर घासण्याची खिशी), बाथ स्पंज वापर करू शकता. हे उत्पादन त्वचेवर हलक्या हाताने लावावा. शरीर स्वच्छ करण्यासाठी त्वचेा खूप जोरजोरात घासण्याची गरज नसते. तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर ती घासणे टाळा.

त्वचेवर जास्त वेळ लावून ठेवू नका

बॉडी वॉश लावल्यानंतर तो शरीरावर खूप वेळ तसाच ठेवण्याची गरज नाही. हलक्या हाताने मसाज केल्यानंतर पाण्याने शरीर स्वच्छ धुवून टाका. शरीरावर बॉडी वॉशचा अंश राहिल्यास काही लोकांना जळजळ किंवा कोरडेपणा जाणवू शकतो.

लोफाची स्वच्छताही महत्त्वाची

जर तुम्ही अंघोळीसाठी लोफा वापरत असाल, तर त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक वेळी वापरल्यानंतर तो पाण्याने चांगला धुऊन कोरड्या जागी वाळत ठेवा. सतत ओला राहणाऱ्या लोफामध्ये घाण आणि जंतू जमा होऊ शकतात. म्हणूनच वेळोवेळी लोफा बदलणेदेखील गरजेचे आहे.

अंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावा

बॉडी वॉशने अंघोळ केल्यानंतर शरीर मऊ टॉवेलने हलक्या हाताने पुसून घ्या आणि आवश्यकतेनुसार मॉइश्चरायझर लावा. तसेच नेहमी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसारच बॉडी वॉशची निवड करा.

जर बॉडी वॉश वापरल्यानंतर तुम्हाला सतत खाज, जळजळ किंवा रॅशेसचा त्रास होत असेल, तर त्याचा वापर ताबडतोब थांबवा आणि त्वचारोग तज्ज्ञांचा (Dermatologist) सल्ला घ्या.