Hair Loss in Women Causes, Treatment & Prevention : आजकाल केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे. यात विशेषत: केस धुताना प्रचंड केस गळतात, अनेकदा टक्कल पडतंय की काय अशी भीती वाटते. यानंतर फणी फिरवतानाही हातात केसांचा गुच्छा येतो, यामुळे काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण, ही समस्या केवळ शॅम्पू किंवा तेलामुळे नसून, केस धुण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे उद्भवतेय. अनेकदा आपण घाईगडबडीत आणि चुकीच्या पद्धतीने केस धुतो. खूप गरम पाणी, खूप जास्त शॅम्पू, जोरात घासणे किंवा ओले केस विंचरणे या छोट्या चुकांमुळे केस कमकुवत होतात. पण, जर केस व्यवस्थित धुतले तर त्याचे तुटण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच ते अधिक चमकदार आणि मजबूत होतील.

केस धुण्याची योग्य पद्धत कोणती? (How to stop Hair Fall Naturally) 

१) केस धुण्यापूर्वी हलक्या तेलाने मालिश करा

केस धुण्यापूर्वी ३०-४० मिनिटे आधी कोमट तेलाने टाळूची मालिश करा, यामुळे टाळूतील रक्तसंचार सुधारतो आणि केसांची मुळे मजबूत होतात. यासाठी खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा आवळ्याचे तेल उत्तम आहे. वेळ कमी असल्यास किमान १५ मिनिटे आधी तेल लावा, यामुळे शॅम्पूमुळे येणारा कोरडेपणा कमी होईल आणि केस तुटण्याचे प्रमाणही कमी होईल.

Award Banner

२) खूप गरम पाणी टाळा

हिवाळ्यात अनेकदा खूप गरम पाण्याने अंघोळ केली जाते. अशावेळी केसही गरम पाण्यानेच धुतले जातात. या सवयीमुळे केस कमकुवत होतात. गरम पाण्यामुळे टाळूतील नैसर्गिक ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. नेहमी कोमट किंवा साध्या पाण्याने केस धुवा. शेवटी थंड पाण्याने केस धुतल्यास त्यांना नैसर्गिक चमक येते.

३) टाळूवर थेट शॅम्पू वापरू नका

बरेच लोक शॅम्पू थेट आपल्या टाळूवर ओततात, ही एक चुकीची सवय आहे. प्रथम थोडा शॅम्पू हातावर घ्या, त्यात थोडे पाणी घालून फेस तयार करा. मग तो हळुवारपणे आपल्या टाळूवर लावा. नखांनी जोरात घासण्याऐवजी बोटांच्या टोकांनी हळुवारपणे मालिश करा, यामुळे घाण निघून जाईल आणि तुमच्या केसांचे संरक्षण होईल.

४) अति प्रमाणात शॅम्पू वापरू नका

दररोज शॅम्पूने केस धुणे आवश्यक नसते. आठवड्यातून २-३ वेळा केस धुणे पुरेसे आहे. (जर टाळू जास्त तेलकट नसेल तर). जास्त शॅम्पूने केस धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेलकटपणा निघून जातो, ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि तुटतात.

५) कंडिशनरचा योग्य वापर करा

कंडिशनरमुळे केस मऊ, मुलायम राहतात, पण ते फक्त केसांच्या टोकांवर लावा. केसांना मुळापासून कंडिशनर लावल्याने तुमची टाळू तेलकट होऊ शकते आणि केस लवकर अस्वच्छ दिसू शकतात. कंडिशनर २-३ मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने पूर्णपणे धुवा.

६) ओल्या केसांवर कंगवा फिरवू नका.

केस धुतल्यानंतर ओले केस खूप नाजूक असतात, अशा वेळी कंगवा फिरवल्याने केस अधिक तुटतात. सर्वप्रथम टॉवेलने केस हळुवारपणे कोरडे करा. टॉवेलने केस जोरात घासू नका; त्याऐवजी हळुवारपणे दाबून कोरडे करा. केस थोडे कोरडे झाल्यावर रुंद दातांच्या कंगव्याने केसातील गुंता सोडवा.

७) हेअर ड्रायरचा वापर जपून करा

जास्त हिटमुळे तुमच्या केसांमधील ओलावा कमी होतो. तुमचे केस नैसर्गिकरित्या हवेत सुकू द्या. जर तुम्हाला ड्रायर वापरायचाच असेल तर कमी हिटिंगचे सेटिंग सेट करा.

८) शरीरातून मिळणारे पोषणही महत्त्वाचे

केसांची केवळ बाहेरून काळजी घेणे पुरेसे नाही. मजबूत केसांसाठी प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे आवश्यक असतात. केसांची मुळे मजबूत करण्यासाठी संतुलित आहारासह कडधान्ये आणि हिरव्या भाज्या खा, मोसमी फळांचा आहारात समावेश करा आणि भरपूर पाणी प्या.

हेअर मास्क वापरा

आठवड्यातून एकदा दही, कोरफड किंवा अंड्याचा हेअर मास्क लावा, यामुळे तुमच्या केसांना अतिरिक्त पोषण मिळते, ज्यामुळे ते अधिक मुलायम आणि चमकदार होतात.

केस धुताना होणाऱ्या छोट्या चुकांमुळे केस मोठ्या प्रमाणात तुटू शकतात. जास्त गरम पाणी वापरू नका, हलक्या हाताने मसाज करा, शॅम्पूचा वापर कमी करा आणि केस व्यवस्थित सुकवा; यांसारख्या साध्या सवयींमुळे तुमचे केस मजबूत होण्यास मदत होऊ शकते.