Ageing Signs : आजचे व्यस्त जीवन, कामाचा ताण आणि उशिरापर्यंत मोबाईल स्क्रीन स्क्रोल करण्याची सवय यामुळे आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. या जीवनशैलीचा सर्वात पहिला आणि वाईट परिणाम आपल्या झोपेवर होतो. अनेकदा लोक कामाच्या नादात केवळ ४-५ तासांची झोप घेऊन स्वतःला तंदुरुस्त समजण्याची चूक करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुमच्या अपुऱ्या झोपेचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो?
आरोग्य आणि त्वचा तज्ज्ञांच्या (Skin Experts) मते, रात्रीच्या झोपेला उगीचच ‘ब्युटी स्लीप’ (Beauty Sleep) म्हटले जात नाही. जेव्हा तुम्ही झोपलेले असता, तेव्हा तुमची त्वचा स्वतःला रिपेअर आणि रीजेनरेट (पुनरुज्जीवित) करत असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सतत कमी झोपत असाल, तर तुमच्या चेहऱ्यावर वयाआधीच वृद्धत्व दिसू लागते. झोप पूर्ण न झाल्यामुळे चेहऱ्यावर काय बदल होतात आणि त्यापासून कसे वाचावे, हे आपण पाहूया.
१. डार्क सर्कल्स आणि सुजलेले डोळे
झोपेच्या कमतरतेचे सर्वात पहिले आणि स्पष्ट लक्षण डोळ्यांच्या अवतीभवती दिसते. जेव्हा शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही, तेव्हा डोळ्यांखालील रक्तवाहिन्या (Blood Vessels) फुगतात, ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark Circles) तयार होतात. यासह डोळ्यांखाली द्रवपदार्थ (Fluid) जमा झाल्यामुळे डोळे सुजलेले आणि थकलेले दिसू लागतात.
२. चेहऱ्यावर सुरकुत्या
झोपताना आपले शरीर ‘कोलाजन’ (Collagen) तयार करते. कोलाजन हे एक असे प्रोटीन आहे जे त्वचेची लवचिकता (Elasticity) टिकवून ठेवते आणि तिला घट्ट ठेवते. झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन म्हणजेच ‘कॉर्टिसोल’ची (Cortisol) पातळी वाढते. वाढलेले कॉर्टिसोल कोलाजन तोडण्याचे काम करते, ज्यामुळे चेहऱ्यावर वेळेपूर्वीच सुरकुत्या आणि बारीक रेषा (Fine Lines) दिसू लागतात.
३. त्वचा निस्तेज आणि बेजान
जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता, तेव्हा चेहऱ्याच्या त्वचेमधील रक्तभिसरण (Blood Circulation) वाढते. यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात. झोप अपुरी राहिल्याने रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे चेहरा थकलेला, पिवळसर आणि बेजान दिसू लागतो. चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो (चमक) पूर्णपणे गायब होतो.
ग्लोइंग चेहऱ्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
१) कोणतीही स्किन केअर प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा रोज रात्री किमान ७ ते ८ तासांची चांगली झोप (Quality Sleep) घेणे जास्त गरजेचे आहे. यासाठी झोपण्याची एक निश्चित वेळ ठरवा.
२) झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीपासून दूर राहा. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश (Blue Light) तुमच्या झोपेत अडथळा आणतो आणि त्वचेलाही नुकसान पोहोचवतो.
३) रात्री झोपण्यापूर्वी चेहरा चांगल्या क्लीन्झरने स्वच्छ धुवा. यानंतर अँटीऑक्सिडंट्स किंवा हायड्रॉलिक ॲसिडयुक्त मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम लावा. यामुळे झोपताना स्किन रिपेअरिंगची प्रक्रिया जलद होते.
४) दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्या. पाणी शरीर आणि त्वचेमधील विषारी पदार्थ (Toxins) बाहेर टाकते, ज्यामुळे त्वचा आतून हायड्रेटेड आणि चमकदार राहते.
