Cooler Cleaning Tips Hacks And Tricks : उन्हाळ्यात एसी, पंखे व कूलरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. ज्या घरांमध्ये एसी नसतो, तिथे कूलरचा वापर केला जातो. उष्णतेपासून आराम मिळवण्याचा हा सर्वांत सोपा आणि परवडणारा मार्ग आहे; पण कूलरच्या सततच्या वापरामुळे तो धुळीने माखतो, त्यातून ताजी हवा तर येत नाहीच. त्याशिवाय घाणेरडा वासही येतो.
त्यामुळे उन्हाळ्यात घरातील कूलर आधी स्वच्छ करणे गरजेचे आहे; पण कूलर साफ करणं फार किचकट काम आहे. त्यातही कूलरभोवती जमलेलं धुळीचं जाळं स्वच्छ करणं अवघड वाटते. पण, काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही काही मिनिटांत कूलर स्वच्छ करू शकता.
कूलर स्वच्छ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स
१) कूलर वापरण्यापूर्वी त्याची टाकी पाण्यानं भरा. त्यानंतर ब्रश आणि डिटर्जंट वापरून त्यातील घाण काढून टाका. कूलर स्वच्छ पाण्यानं दोन-तीन वेळा धुवा.
२) कूलर जास्त दिवस न वापरल्यास, त्यातील कूलिंग पॅड्सवर धूळ आणि घाण साचू शकते. अशा वेळी ते पॅड काढून कोमट पाण्यानं आणि डिटर्जंटनं स्वच्छ करा. घाण आणि बुरशी काढण्यासाठी ते ब्रशनी हळुवारपणे घासा. त्यानंतर कूलर उन्हात वाळवा.
३) धूळ साचल्यामुळे कूलरमधील हवेचा झोत कमी होऊ शकतो. जास्त काळ वापरात नसल्यानं पंख्याच्या पात्यांभोवती आणि मोटरभोवती धूळ साचू शकते. त्यामुळे हे भाग पूर्णपणे स्वच्छ करा.
४) एक लिटर पाण्यात अर्धा कप व्हिनेगर व ब्लीच मिसळा आणि ते मिश्रण कूलरच्या टाकीत १५-२० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर ब्रश किंवा स्क्रबद्वारे टाकी पूर्णपणे स्वच्छ करा. त्यामुळे जीवाणू आणि दुर्गंधीची समस्या दूर होऊ शकते.
५) जर कूलरच्या टाकीतून तीव्र दुर्गंधी येत असेल, तर टाकीमध्ये थोडा लिंबाचा रस व पाणी मिसळा आणि ते मिश्रण संपूर्ण टाकीवर चांगल्या रीतीनं फवारा. त्यामुळे वास नाहीसा होईल आणि कूलरमधून ताजी, स्वच्छ हवा येईल.
