Jeans Care Hacks : तुम्ही तुमच्या आवडत्या ब्रँडची नवीन जीन्स मोठ्या उत्साहाने विकत घेता, पण दोन-तीन वेळा धुतल्यानंतर त्या जीन्सचा रंग फिका पडू लागतो. जीन्सचा रंग फिका पडल्यामुळे ती जुनी आणि निर्जीव दिसू लागते, ज्यामुळे आपला संपूर्ण लूक खराब होतो. अनेकदा आपण जीन्स सामान्य कपड्यांप्रमाणे धुतो, पण तिला विशेष काळजीची गरज असते. जर तुम्हाला तुमच्या नवीन जीन्सचा रंग वर्षानुवर्षे टिकून राहावा आणि ती नेहमी शोरूममधून आणल्यासारखी नवीन दिसावी असे वाटत असेल, तर तुम्हाला ती धुण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. जीन्सचा रंग कधीही फिका पडू नये म्हणून पहिल्यांदा धुताना पाण्यात काय टाकायला हवे, कशी धुतली पाहिजे याविषयी जाणून घेऊ…

खाऱ्या पाण्याची जादू

जेव्हा तुम्ही नवीन जीन्स पहिल्यांदा धुता, तेव्हा ती थेट डिटर्जंटमध्ये टाकू नका. एका बादलीभर थंड पाण्यात दोन मोठे चमचे मीठ मिसळा आणि त्यात जीन्स एक तास भिजत ठेवा. मिठामुळे रंग कपड्यात पक्का बसतो, ज्यामुळे पुढच्या वेळी धुतल्यावर रंग जाण्याचा धोका कमी होतो. ही सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी पद्धत आहे.

जीन्स उलट्या करून धुवा

ही एक छोटी पण खूप उपयुक्त गोष्ट आहे. जीन्स धुताना मग ती मशीनमध्ये धुतली असो किंवा हाताने, नेहमी उलटी करून धुवा; यामुळे वॉशिंग मशीनच्या घर्षणाचा जीन्सच्या बाहेरील पृष्ठभागाशी थेट संपर्क टळतो, ज्यामुळे रंग अधिक काळ चमकदार राहतो. उन्हात रंग फिका पडू नये म्हणून जीन्स वाळवतानाही ती उलटीच टाका.

Award Banner

थंड पाणी वापरा

गरम पाण्यामुळे जीन्सचे धागे सैल होतात, ज्यामुळे रंग लवकर फिका पडतो. तुमची जीन्स नेहमी थंड पाण्याने धुवा. जर जीन्स जास्त घाणेरडी नसेल, तर प्रत्येक वेळी धुण्याऐवजी ओल्या कापडाने पुसणे चांगले.

व्हिनेगरचा वापर

जीन्स गडद रंगाची (जसे की गडद निळी किंवा काळी) असल्यास, तुम्ही मिठाबरोबर पांढरे व्हिनेगरही वापरू शकता. अर्धा कप व्हिनेगर पाण्यात मिसळल्याने जीन्सचा रंग उजळतो आणि दुर्गंधी दूर होते. सुकल्यानंतर व्हिनेगरचा वास आपोआप निघून जातो.

ड्रायर टाळा

वॉशिंग मशीनच्या ड्रायरमधील तीव्र उष्णतेमुळे जीन्सच्या कापडाचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे जीन्स नैसर्गिक हवेत आणि सावलीत वाळवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या जीन्सचा आकार आणि रंग वर्षानुवर्षे टिकून राहण्यास मदत होईल.