Pressure Cooker Cleaning Hacks : जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात प्रेशर कुकरचा वापर केला जातो. भात आणि डाळ शिजवण्यापासून बटाटे उकडण्यापर्यंत अनेक पदार्थ शिजवण्यासाठी कुकरचा वापर केला जातो. पण सततत्या वापरानंतर तो व्यवस्थित स्वच्छ केला नाही तर मोठे अपघात होऊ शकतो. कुकर व्यवस्थित स्वच्छ केला गेला नाही तर त्यात तेल, घाण आणि अन्नाचे कण जमा होऊ शकतात. ज्यामुळे शिट्टी अडकणे, दाब वाढणे आणि कुकरचा स्फोट होण्यासारख्या धोकादायक घटना घडतात. यामुळे कुकर वर वर स्वच्छ न करता तो महिन्यातून १ ते २ वेळा नीट स्वच्छता करणे गरजेचे आहे.
कुकर स्वच्छ कसा करावा? (How to Maintain Your Pressure Cooker)
प्रेशर कुकरची शिट्टी नीट स्वच्छ करणे फार गरजेचे असते. जर अन्नाचे कण अडकून राहिले तर वाफ व्यवस्थित बाहेर पडू शकत नाही, ज्यामुळे जास्त दाब निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशावेळी कुकर स्वच्छ करण्यासाठी टूथपिक किंवा बारीक पिन घ्या आणि शिट्टीच्या कडांमध्ये घालून ती पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर एक भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात थोडे व्हाइट व्हिनेगर मिक्स करा, यानंतर शिट्टी त्यात १० ते १५ मिनिटे भिजवत ठेवा.
व्हिनेगर आणि पाण्यात शिट्टी स्वच्छ धुतल्यानंतर ब्रशने घासून ती पुन्हा नीट स्वच्छ करा यामुळे अन्नाचे कण सहजपणे निघून जातील.
व्हेंट होल कसे स्वच्छ करावे?
शिट्टी काढल्यानंतर वाफ बाहेर पडण्याचे व्हेंट होल स्वच्छ करणे देखील महत्वाचे आहे. कारण येथूनच कुकरमधील वाफ बाहेर पडत असते. म्हणूनच महिन्यातून किमान १ ते २ वेळा बारीक टाचणी, टूथपिक किंवा सुईने हे छिद्र स्वच्छ करा, स्वच्छ केल्यानंतर छिद्र पूर्णपणे उघडे आहे की नाही तपासा.
रबर गॅस्केटकडे करु नका दुर्लक्ष
प्रेशर कुकरचा रबर सैल झाल्यास किंवा फाटल्यास कुकर व्यवस्थित बंद होत नाही. त्यामुळे तो नियमितपणे तपासत रहा. जर तुम्हाला त्यात भेगा किंवा सैलपणा आढळल्यास तो ताबडतोब बदला. जर रबर नीट ठेवायला असेल तर तो थंड पाण्यात किंवा साधं पाण्यात भिजवत ठेवा. यामुळे रबर घट्ट राहील आणि कुकर व्यवस्थित बंद होईल.
कुकर वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा
प्रेशर कुकर वापरण्यापूर्वी तो पाण्याने किंवा अन्नाने क्षमतेपेक्षा जास्त भरलेला नाही हे नेहमी तपासा. क्षमतेपेक्षा जास्त भरल्यामुळे दाब वाढू शकतो. तसेच जर कुकरमधून विचित्र आवाज येत असेल, शिट्टी व्यवस्थित वाजत नसेल किंवा रबर फाटला असेल तर या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका, नियमित स्वच्छतेबरोबर महिन्यातून कुकर एक ते दोन वेळा डीप क्लिन करा.
