अनेक जण बाजारात हिरव्या, ताज्या काकड्या दिसल्या की, त्या आनंदाने विकत घेतात; पण घरी आणून कापल्यावर त्या आतून कडू निघाल्या की, मन खट्टू होते. तुमच्याबरोबरही अनेकदा असे घडले असेल ना? अशा वेळी मुद्दाम विकत आणलेल्या काकड्या फेकून द्यायलाही मन धजावत नाही; पण त्या खाऊ शकत नाही अथवा त्याचे सॅलड किंवा रायताही बनवता येत नाही. त्यामुळे काकडी विकत घेताना ती कडू आहे वा नाही हे कसे ओळखायचे आणि कडू निघाल्यास त्यातील कडवटपणा कसा दूर करायचा जाणून घेऊ…

कडू काकडी कशी ओळखायची?

१) साल पहा: जर काकडीची साल हिरवी किंवा पिवळी असेल, तर ती कडू असण्याची शक्यता कमी असते.

२) वजनदार काकड्या: वजनाने जड असलेल्या काकड्या खरेदी करणे टाळा. त्यांमध्ये अनेक बिया असू शकतात आणि त्यामुळे काकडी कडू लागू शकते.

३) आकार पाहा : वाकड्या किंवा बाकदार काकड्या घेऊ नका. त्या कडूदेखील असू शकतात. नेहमी पातळ आणि हलक्या मध्यम आकाराच्या काकड्याच खरेदी करा.

काकडीचा कडूपणा कसा दूर करावा?

काकडी धुऊन स्वच्छ करा. तिचा मागचा भाग कापून टाका. नंतर त्यावर मीठ लावा आणि ते नीट चोळा. मग काकडीवर फेस आला, तर ती पाण्याने धुवा. त्यानंतर ती कापून खा. काकडीची सालही कडू असण्याची शक्यता असते. त्यामुळे काकडी खाण्यापूर्वी त्याची साल काढून टाका.काकडीचे गोल तुकडे कापल्यानंतर ते थंड पाण्यात भिजत ठेवा. असे केल्याने कडूपणा कमी होण्यासही मदत होते. काकडीच्या चकत्यांवर लिंबाचा रस पिळा. त्यामुळेही चव बदलते आणि ती कमी कडू लागते.