How To Keep Water Tank Cool In Summer : उन्हाळ्यातील तीव्र सूर्यप्रकाशामुळे छतावरील पाण्याच्या टाक्यांचे विशेषतः नुकसान होते. यात प्लास्टिकच्या टाक्या काही तासांतच इतक्या गरम होतात की, त्यातील पाणी दुपारच्यावेळी अंघोळीसाठी अवघड होते. दुपारी कडक उन्हात टाकीतील पाणी इतके गरम होते की जे घरातील कामासाठी वापरणे कठीण होऊन जाते. पण, पर्याय नसल्याने अनेकदा गरम पाणीच वापरावे लागते. अशावेळी टाकीतील पाणी थंड ठेवण्यासाठी लोक अनेक उपाय करून पाहतात. पण, आपण आज महागड्या उपायांऐवजी काही घरगुती जुगाड सांगणार आहोत, जे फॉलो करून तुम्ही टाकीतील पाणी बर्फासारखे थंड ठेऊ शकता.

छतावरील टाकीतील पाणी थंड ठेवण्यासाठी जुगाड

बाजारात अँटी हिट कव्हर किंवा टाकीसाठी शेड यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु ते सर्वांनाच परवडत नाहीत. अशा परिस्थितीत एक साधा आणि स्वस्त घरगुती उपाय, जो जास्त खर्च न करता पाणी थंड ठेवून तुमची समस्या सोडवू शकतो.

हा जुगाड करण्यासाठी तुम्हाला थर्माकोल शीट आणि गोणपाट (जुनी पोती) तार आणि सेलोटेप यांसारख्या साध्या गोष्टींची गरज आहे, ज्या सहज उपलब्ध होतात.

टाकी कशी झाकावी

सर्वप्रथम टाकीच्या आकाराएवढी थर्माकोल शीट कापून घ्या आणि ती टाकीभोवती घट्ट बसवा. शीट खूप जाड नसेल याची खात्री करा, जेणेकरून ती सहज टाकीवर ग्रीप घेऊ शकेल. त्यानंतर टाकीवर गोणपाट टाका आणि सूर्यप्रकाश कमी करण्यासाठी ते तारेने बांधा.

पाण्यामुळे थंडावा मिळेल

यानंतर रोज सकाळी गोणपाट पाण्याने चांगले ओले करा. ओल्या गोणपाटामुळे थंडावा निर्माण होतो, ज्यामुळे टाकीतील पाणी दिवसभर थंड राहते. तुम्हाला पाणी चांगल्याप्रकारे थंड ठेवायचे असेल तर तुम्ही गोणपाट दिवसातून दोन ते तीन वेळा ओले करू शकता.

कमी खर्चात उत्तम परिणाम

तुमची इच्छा असल्यास तुम्ही थर्माकोलऐवजी पांढऱ्या फोम शीट्स वापरू शकता. ही पद्धत विशेषतः पांढऱ्या टाक्यांवर प्रभावी ठरते. थोड्या प्रयत्नांनी तुम्ही उन्हाळ्यातही थंड पाण्याचा आनंद घेऊ शकता.