Lose Weight Naturally 7 Ayurvedic Remedies : अनेकांना वाटते की, केवळ अति खाणे, मंद चयापचय, वाईट जीवनशैली, हार्मोन्सचे असंतुलन आणि तणावामुळे लठ्ठपणा होतो; पण तसे नाही. आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, शरीरातील ऊर्जांमधील असंतुलनामुळे असे होते. लठ्ठपणा हा सेवन केल्या जाणाऱ्या अन्नापेक्षा त्यातून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांचे शरीराकडून कसे शोषण केले जाते, त्यांचा वापर कसा होतो आणि अन्नावर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेशी अधिक जोडलेला आहे.
आयुर्वेदात वजन कमी करणे ही एक हळूहळू होणारी आणि कायमस्वरूपी प्रक्रिया मानली जाते, ज्यात त्वरित परिणाम शोधण्याऐवजी तुमची चयापचय क्रिया सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. त्याला एक शॉर्ट टर्म उपाय मानण्याऐवजी, तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवा. हा दृष्टिकोन तुम्हाला केवळ वजन कमी करण्यास मदत करणार नाही, तर तुमची पचनक्रिया, ऊर्जेची पातळी आणि एकूण आरोग्यदेखील सुधारेल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदातील खालील सात उपाय करून पाहू शकता…
१. अतिरिक्त खाणं टाळा
तुम्ही तुमच्या अन्नाच्या केवळ प्रमाणावरच नव्हे, तर त्याच्या गुणवत्तेवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. आयुर्वेदानुसार वजन कमी करण्याचा मुख्य उपाय म्हणजे संतुलित आणि पूरक आहार सेवन करणं. जड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यामुळे चयापचय क्रिया मंदावते आणि त्यामुळे शरीरातील विषाक्त घटक वाढतात. ताजे, मोसमी आणि नियंत्रित प्रमाणात अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेचे संतुलन राखले जाते आणि अनावश्यक चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो.
२. पचनशक्ती वाढवा
आयुर्वेदानुसार, अपचनामुळे चयापचय क्षमता अनियमित आणि मंद होते. अन्नाचे ऊर्जेमध्ये योग्य रूपांतर होण्यासाठी मजबूत पाचक अग्नी आवश्यक आहे. अग्नी टिकवून ठेवण्यासाठी उष्ण, हलके आणि सहज पचणारे पदार्थ खा. अति खाणे टाळा आणि आपल्या आहारात आले, जिरे व काळी मिरी यांसारख्या मसाल्यांचा समावेश करा. दिवसभर कोमट पाणी प्यायल्याने पचन आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
३. व्यायाम
शारीरिक हालचालींच्या अभावामुळे चयापचय क्रिया आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया मंदावते. झोपेच्या कमतरतेमुळे भूक वाढवणारे हार्मोन्सदेखील वाढतात, ज्यामुळे अति खाणे होते. दररोज ३० ते ४५ मिनिटे जलद चालणे, योग, सूर्यनमस्कार यांसारख्या हालचाली करा. आयुर्वेदानुसार, हलका घाम येईपर्यंत व्यायाम करावा आणि अतिश्रम टाळावेत. नियमित हालचालींमुळे रक्ताभिसरण, पचनक्रिया आणि एकूणच चयापचय कार्यक्षमता सुधारते.
४. उपवास करा
आयुर्वेदानुसार वजन कमी करण्यासाठी उपवास हा सर्वोत्तम मार्ग आहे, म्हणजेच नियंत्रित उपवास करणे किंवा कॅलरीजचे सेवन कमी करणे हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण- त्यामुळे शरीराला ऊर्जेसाठी साठवलेल्या चरबीचा वापर करण्यास आणि विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. अति उपवास करणे टाळा. त्याऐवजी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मोजूनमापून आहार पद्धती, हलके जेवण आणि अधूनमधून उपवास यांचा अवलंब करा.
५. रूटीन आणि ऋतुनुसार अन्न खा
शरीराची चयापचय क्रिया आणि नैसर्गिक लय टिकवून ठेवण्यासाठी शिस्तबद्ध रूटीनची आवश्यकता असते. आयुर्वेदानुसार लवकर उठणे, विशिष्ट वेळी जेवणे व लवकर झोपणे आवश्यक आहे. त्यासह ऋतूनुसार आहार पद्धतींचा अवलंब केला पाहिजे, जसे की उन्हाळ्यात हलके जेवण आणि हिवाळ्यात पौष्टिक जेवण घेणे. आपल्या रूटीनची नियमितता राखल्याने हार्मोन्सचे संतुलन आणि चयापचयाची स्थिरता टिकवून ठेवण्यास मदत होते.
६. स्थानिक फळ, भाज्या खा
तुमच्या आजूबाजूला उगवलेल्या भाज्या, फळे तुमच्या शरीरासाठी सर्वोत्तम असतात. स्थानिक अन्नपदार्थ सहज पचतात आणि तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण करतात. क्रॅश डाएट आणि परदेशी डाएटचे ट्रेंड अल्पकालीन परिणाम देतात.
७. सजगतेने खाणे आणि तणाव नियंत्रण
वजन नियंत्रणात मानसिक आरोग्य महत्त्वाची भूमिका बजावते. तणावामुळे कॉर्टीसोलची पातळी वाढते, ज्यामुळे हाय कॅलरीजयुक्त पदार्थांची लालसा वाढते आणि भावनिकरीत्या खाण्याची सवय लागते. अन्न हळूहळू, व्यवस्थित चावून आणि भुकेनुसार खावे. आपल्या दैनंदिन जीवनात ध्यान, प्राणायाम आणि विश्रांती तंत्रांचा समावेश केल्याने तणाव आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होऊ शकते.
या सात उपायांसह काही सोप्या सवयीदेखील वजन कमी करण्यास मदत करू शकतात. सकाळी लिंबू घालून कोमट पाणी पिणे, रात्री उशिरा जेवण टाळणे व पुरेशा प्रमाणात पाणी पिणे यांमुळे शरीरात पाण्याची पातळी टिकून राहते. तसेच त्यामुळे चयापचय क्रिया निरोगी राहते. पुरेशी झोप मिळणेदेखील आवश्यक आहे. कारण- अपुऱ्या झोपेमुळे हार्मोनल आणि भुकेच्या नियमनात अडथळा येतो.
