How to Clean Yellow Pillows : उन्हाळ्यात रात्री घाम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, पण हा घाम आपल्या नकळत उशीमध्ये साचू लागतो. कालांतराने, या आर्द्रतेमुळे जिवाणू आणि घाण वाढते, ज्यामुळे दुर्गंधी आणि काळे- पिवळे डाग पडतात. अशा उशीचा वापर केल्याने झोपेची गुणवत्ता बिघडू शकते आणि सकाळी उठल्यावर अस्वस्थ वाटू शकते.
शिवाय, अस्वच्छ उशीवर झोपल्याने ॲलर्जी, पुरळ आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, चांगली झोप मिळवण्यासाठी आणि चांगले आरोग्य टिकवण्यासाठी उशीच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लोक उशा धुवायला का घाबरतात?
बहुतांश लोक उशी धुणे टाळतात कारण त्यांना वाटते की, वॉशिंग मशीनमध्ये टाकल्याने उशीचा आकार बिघडेल आणि आतील कापूस किंवा फायबर खराब होईल. परंतु, योग्य पद्धतींचा अवलंब करून तुम्ही उशी अगदी नव्यासारखी स्वच्छ आणि मऊ (फ्लफी) बनवू शकता.
उशी धुण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा
केअर लेबल (Care Label) वाचा: सर्वात आधी उशीवर असलेले केअर लेबल नक्की तपासा. बहुतेक कॉटन, सिंथेटिक आणि डाउन पिलो (Down Pillows) मशीनमध्ये धुता येतात. मात्र, मेमरी फोम (Memory Foam) असलेल्या उश्या कधीही मशीनमध्ये धुवू नयेत, अन्यथा त्या खराब होऊ शकतात.
एकत्र दोन उश्या धुणे का गरजेचे आहे?
वॉशिंग मशीनमध्ये फक्त एकच उशी टाकल्यास मशीनचे संतुलन (Balance) बिघडू शकते. त्यामुळे नेहमी दोन उश्या एकत्र धुवाव्यात. यामुळे मशीन योग्य प्रकारे चालते आणि दोन्ही उश्या व्यवस्थित स्वच्छ होतात.
दुर्गंधी आणि डाग घालवण्याचा घरगुती उपाय:
उशी धुण्यासाठी केवळ डिटर्जंट पुरेसे नसते. डिटर्जंटबरोबर अर्धा कप बेकिंग सोडा आणि अर्धा कप व्हाइट व्हिनेगर (White Vinegar) वापरा. बेकिंग सोडा दुर्गंधी नष्ट करतो, तर व्हिनेगर पिवळे डाग घालवण्यास मदत करतो.
वॉशिंग मशीनची योग्य सेटिंग:
उशी नेहमी मशीनच्या ‘जेंटल’ (Gentle) किंवा ‘डेलिकेट’ (Delicate) मोडवर हलक्या कोमट पाण्यात धुवावी. यामुळे बॅक्टेरिया आणि धुळीचे कण नष्ट होतात आणि उशीचा आकारही सुरक्षित राहतो.
एक्स्ट्रा रिन्स (Extra Rinse) नक्की करा:
उशी धुतल्यानंतर मशीनमध्ये एकदा ‘एक्स्ट्रा रिन्स’ सायकल नक्की चालवा. यामुळे उशीच्या आत अडकलेला साबण आणि फेस पूर्णपणे निघून जातो.
उशी पुन्हा मऊ (Fluffy) करण्याचा सीक्रेट फॉर्म्युला:
जर तुम्ही ड्रायर वापरत असाल, तर त्यात उशीसोबत २-३ टेनिस बॉल्स टाका. हे बॉल्स उशीच्या आतील कापूस किंवा फायबरला एका ठिकाणी जमा होऊ देत नाहीत, ज्यामुळे उशी पुन्हा छान फुगते.
उन्हाची नैसर्गिक स्वच्छता:
ड्रायर नसेल तर उशी कडक उन्हात व्यवस्थित वाळवा. उशी वाळत घालण्यापूर्वी हाताने हलकी थापून घ्या आणि सपाट जागेवर ठेवा. उन्हामुळे उशीतील ओलावा आणि दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी होते.
आरोग्यासाठी छोटा टिप्स
चांगल्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी वर्षातून २ ते ३ वेळा उशी नक्की धुवावी आणि दर आठवड्याला उशीचे कव्हर (Pillow Cover) बदलणे विसरू नका.
