Period Cramps Relief Home Remedy : मासिक पाळीच्या काळात महिलांना पोटदुखी किंवा ओटीपोटात तीव्र वेदना होतात, ही एक सामान्य समस्या आहे. यावेळी वेदना कमी करण्यासाठी काही महिला औषधे घेतात किंवा हॉट बॅगने शेकवतात. पण, यावर औषधांऐवजी नैसर्गिक आणि प्रभावी उपाय फायदेशीर ठरू शकतो. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी चहाचा एक उपाय तुम्ही घरी करून पाहू शकता.
आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी पाळीदरम्यानच्या वेदना कमी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने चहा बनवण्याची कृती सांगितली आहे, त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी घरात असलेल्या साहित्याचा वापर करून हा चहा कसा बनवायचा हे सांगितले आहे.
चहा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागेल?
१) १ मोठा चमचा बारीक केलेला अक्रोड
२) अर्धा चमचा आल्याची पावडर
३) १ मोठा चमचा गूळ (चवीनुसार)
४) २ कप पाणी
चहा कसा बनवायचा आणि प्यायचा?
१) प्रथम एका पातेल्यात २ कप पाणी उकळून घ्या. त्यात बारीक केलेले अक्रोड आणि आल्याची पूड घाला आणि मंद आचेवर ५-७ मिनिटे ते साहित्य उकळू द्या.
२) आता गॅस बंद करा आणि पातेल्यात गूळ चांगला ढवळून मिक्स करा. आता हे मिश्रण गाळून घ्या आणि कपात ओतून गरम गरम प्या.
मासिक पाळी सुरू होण्याच्या ५-६ दिवस आधीपासून तुम्ही हा चहा घ्यायला सुरुवात करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी तो पिणे उत्तम.
फायदे
अक्रोड : यामध्ये ओमेगा-३ आणि मॅग्नेशियम असते, जे स्नायूंना आराम देतात आणि वेदना कमी करतात.
आले : हे एक नैसर्गिक अँटी इंफ्लेमेटरी असून वेदना कमी करण्यास मदत करते.
गूळ : पोटफुगी कमी करतो आणि शरीराला त्वरित ऊर्जा देतो.
