Summer Gardening Tips And Hacks : बाल्कनीत आवडीनं लावलेल्या रोपाची अनेक जण खूप काळजी घेतात, रोज व्यवस्थित पाणी टाकतात. अशानं काही दिवसांत रोप एकदम चांगल्या प्रकारे बहरतं, त्याला नवी पालवी फुटते; पण अचानक एक दिवस सुंदर बहरलेलं रोप सुकू लागतं. त्याची पानं गळू लागतात. काही पानं करपल्यासारखी सुकतात. अशा प्रकारे ते रोपं पूर्णपणे सुकतं. ते पुन्हा जगेल की नाही हेही समजत नाही; पण अशा प्रकारे मेलेलं रोपं तुम्ही काही घरगुती उपाय करून चांगल्या प्रकारे पुन्हा बहरवू शकता. ते कशा प्रकारे जाणून घेऊ…
रोपांना नवजीवन देण्यासाठी तुम्हाला एक लिटर पाणी, मूठभर तांदूळ, एक चमचा बेकिंग सोडा आणि व्हाइट व्हिनेगरची गरज लागेल.
तांदळाचे पाणी मुळांना पोषण देते; तर बेकिंग सोडा व व्हिनेगरमुळे मातीतील हानिकारक बुरशी आणि कीटकांना नष्ट होतात. हे मिश्रण योग्य प्रकारे तयार करून वापरणे फायदेशीर ठरू शकते. ही पद्धत सोपी आणि स्वस्त आहे. त्यामुळे तुम्ही ती एकदा नक्कीच करून पाहावी.
रोपांसाठी असं बनवा बेस्ट खत
त्यासाठी सर्वप्रथम एक लिटर स्वच्छ पाणी घ्या. त्यात मूठभर न शिजवलेले तांदूळ टाका आणि थोडा वेळ तसेच राहू द्या. त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका. शेवटी व्हाईट व्हिनेगरचे चार-पाच थेंब टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित मिसळा. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि एका स्प्रे बाटलीमध्ये भरा.
उद्यान तज्ज्ञांच्या मते, हे मिश्रण वापरण्याची एक पद्धत आहे. हे मिश्रण थेट रोपाच्या मुळांभोवतीच्या मातीत आणि रोपाच्या वाळलेल्या फांद्या व पानांवरही थोड्या प्रमाणात फवारा. हे वापरण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळ किंवा पहाटेची. प्रखर सूर्यप्रकाशात फवारणी करणे टाळा. कारण- त्यामुळे पाने जळू शकतात.
हा उपाय एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. हे मिश्रण वापरल्यानंतर लगेच परिणाम दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या मिश्रणाचा वापर करावा लागेल. १० ते १५ दिवसांच्या आत तुम्हाला वाळलेल्या फांद्यांमधून नवी पालवी फुटलेली दिसेल आणि रोप पुन्हा जिवंत होऊ लागेल. ज्या रोपांची वाढ खुंटली आहे, त्या रोपांसाठी हा उत्तम उपाय आहे.
तांदळाचा असा करा वापर
तज्ज्ञांच्या मते, यात तांदूळ अधिक महत्त्वाचे आहेत. तांदळामध्ये एनपीके (NPK)सारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. एक लिटर पाण्यात मूठभर तांदूळ टाकल्याने, वनस्पतींच्या मुळांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे आणि सूक्ष्म पोषक तत्त्वे पाण्याला मिळतात. तसेच, तांदळाचे हे पाणी जमिनीतील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देते.
बेकिंग सोड्याचा वापर
बेकिंग सोडा रोपांसाठी ढाल म्हणून काम करतो. तो मातीतील पीएच पातळी संतुलित ठेवण्यास आणि मुळांवरील बुरशी नाहीशी करण्यास मदत करतो. जेव्हा रोपांची मुळे बुरशीमुक्त होतात, तेव्हाच ती मातीतून पोषक तत्त्वे शोषून घेऊ शकता आणि मग पुन्हा रोपे हिरवीगार वाढू लागतात.
व्हाइट व्हिनेगरचे महत्त्व
या तयार मिश्रणात व्हाइट व्हिनेगरचे काही थेंब टाकणे अत्यावश्यक आहे. कधी कधी माती खूप अल्कधर्मी बनते, ज्यामुळे वनस्पतींची वाढ खुंटते. व्हिनेगर मातीतील आम्लता किंचित वाढवून संतुलित करते, ज्यामुळे कोमेजलेल्या रोपाला पुन्हा श्वास घेता येतो. त्याशिवाय त्याचा सुगंध मातीत लपलेल्या हानिकारक कीटकांनाही दूर ठेवतो.
