Tooth Brush Reuse Hacks : लहानपणापासूनच आपल्याला घरी आणि शाळेत शिकवले जाते की, दररोज दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे आवश्यक आहे. त्यामुळे दातांवरील जंतू निघून जातात आणि तोंडाची स्वच्छता राखता येते. त्याशिवाय दात घासण्यासाठीचा टूथब्रश दर तीन ते सहा महिन्यांनी बदलण्याची शिफारसदेखील केली जाते. अशा वेळी जेव्हा आपण नवीन टूथब्रश विकत घेतो, तेव्हा जुना ब्रश निरुपयोगी समजून आपण फेकून देतो. पण तुम्हाला माहितेय का, खराब म्हणून फेकून दिलेल्या टूथब्रशचा पुन्हा वापर करून घरातील फरशीपासून ते लॅपटॉपपर्यंत अनेक वस्तू तुम्ही स्वच्छ करू शकता.

जुना टूथब्रशचा ‘अशाप्रकारे’ करा पुन्हा वापर

१) शेगडीचे कोपरे स्वच्छ करणे

तुम्ही पाहिले असेल की, गॅस शेगडीचे बर्नर आणि कोपरे अनेकदा खूप घाण, चिकट होतात. ते एका जुन्या टूथब्रशच्या साह्याने तुम्ही सहजपणे स्वच्छ करू शकता. त्यासाठी टूथब्रशला प्रथम थोडा साबण किंवा क्लीनर लावा आणि शेगडी व्यवस्थित घासून घ्या. शेगडीच्या कोपऱ्यांमध्ये घासताना हात सहज पोहोचत नाहीत; पण ब्रश सहजपणे पोहोचतो आणि ते कोपरे स्वच्छ करणे शक्य होते.

२) फरशीमधील हट्टी घाण हटवणे

घरातील किचन आणि बाथरूममधील फरशांमधील फटींमध्ये मोठ्या प्रमाणात काळपट घाण जमा होते. त्यामुळे या फटी नियमितपणे स्वच्छ न केल्यास ती जागा काळपट दिसू लागते. अशा वेळी तुम्ही टूथब्रशला थोडी ब्लिचिंग पावडर किंवा क्लीनिंग लिक्विड लावून, त्या जागेवर घासल्यास डाग सहजपणे निघतात. त्यामुळे फरशा पुन्हा स्वच्छ आणि नवीन दिसू लागतील.

३) स्विच बोर्ड स्वच्छ करणे

घरात स्विच बोर्डचा वापर सातत्याने होत असतो. तो बोर्ड झाकण्यासाठी आपल्याकडे काहीच पर्याय नसतो. त्यामुळे त्याच्यावर धूळ, घाण लवकर जमा होऊन तो खराब होतो . असे स्विच बोर्ड तुम्ही कोरड्या टूथब्रशने हळुवारपणे घासून स्वच्छ करू शकता. पण असे करताना स्विच बोर्डचा वीजपुरवठा बंद करा. त्यामुळे बोर्ड सुरक्षितपणे स्वच्छ करणे शक्य होईल.

४) हेअर ब्रश किंवा कंगव्यांची स्वच्छता

कंगवा आणि हेअरब्रशमध्ये केस आणि घाण सहज अडकू शकते. ते स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश उपयोगी ठरू शकतो. सर्वप्रथम हेअरब्रश आणि कंगवा थोडे पाणी आणि शॅम्पूने धुवा. आता तुम्ही टूथब्रशच्या मदतीने त्यातील घाण सहजपणे काढू शकता.

५) कीबोर्ड आणि लहान गॅझेट्सची साफसफाई

आपण सर्व जण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा वापर करतो. यावेळी त्यातील कीबोर्डच्या आतमध्ये अनेकदा धूळ साचते, ही धूळ स्वच्छ करणे अनेकदा अवघड होते. अशा वेळी तुम्ही टूथब्रशच्या मदतीने कीबोर्डमधील घाण स्वच्छ करू शकता.