BP Medicine & Kidney: उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) हा आजच्या काळातील एक सामान्य पण दीर्घकालीन आजार मानला जातो. आहार, जीवनशैली आणि ताणतणाव यांचा त्यावर मोठा परिणाम होत असला, तरी अनेक रुग्णांना औषधोपचारांचीही आवश्यकता भासते. मात्र, रक्तदाबाची औषधे घेतल्यामुळे किडनीवर परिणाम होतो, असा एक गैरसमज समाजात मोठ्या प्रमाणावर पसरलेला दिसतो. या भीती पोटी काही रूग्ण औषधे टाळतात किंवा स्वत:हून बंद करतात. प्रत्यक्षात हीच सवय आरोग्यासाठी अधिक घातक ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

औषधांमुळे किडनी खराब होते का?

मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ. पारिन सांगोई यांचे म्हणणे आहे की, “ज्यांचा रक्तदाब दीर्घकाळ वाढलेला राहतो, त्यांच्यासाठी बीपीची औषधे आवश्यक असतात. ही औषधे किडनीला नुकसान पोहोचवत नाहीत; उलट, औषधे न घेतल्यामुळे वाढलेला रक्तदाब किडनीचे गंभीर नुकसान करू शकतो.”

तज्ज्ञांच्या मते, अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर सातत्याने दाब येतो. यामुळे हळूहळू किडनीची रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होत जाते. ही प्रक्रिया अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न देता वर्षानुवर्षे सुरू राहू शकते आणि निदान होईपर्यंत किडनीचे मोठे नुकसान झालेले असते.

रक्तदाब नियंत्रणात आला, तरी औषधे का थांबवू नयेत?

उच्च रक्तदाब ही बहुतेक वेळा आयुष्यभर टिकणारी स्थिती असते. औषधांमुळे बीपी नियंत्रणात आला, म्हणून तो कायमचा बरा झाला, असा अर्थ होत नाही. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे अचानक बंद केल्यास रक्तदाब पुन्हा वाढू शकतो, तोही कोणतीही पूर्वसूचना न देता. याचा थेट परिणाम हृदय, मेंदू आणि किडनीवर होऊ शकतो.

डॉ. सांगोई सांगतात की, अनेक रुग्ण ‘आता बरं वाटतंय’ या भावनेतून किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित सल्ल्यांवर विश्वास ठेवून औषधे बंद करतात. परिणामी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.

जीवनशैलीतील बदल पुरेसे ठरतात का?

संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि तणाव व्यवस्थापन यांचा रक्तदाब नियंत्रणात महत्त्वाचा वाटा असतो, हे तज्ज्ञही मान्य करतात. मात्र, हे उपाय औषधांचा पूर्ण पर्याय ठरू शकत नाहीत. काही रुग्णांमध्ये जीवनशैलीतील बदलांमुळे औषधांचा डोस कमी करता येतो; पण औषधे पूर्णपणे बंद करायची की नाही, याचा निर्णय केवळ नियमित तपासण्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवा.

निष्कर्ष

उच्च रक्तदाबाची औषधे ही भीतीने टाळण्याची गोष्ट नसून, ती शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करणारी साधने आहेत. किडनीचे नुकसान औषधांमुळे नव्हे, तर अनियंत्रित रक्तदाबामुळे होते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उपचारांबाबतचे निर्णय गैरसमज किंवा भीतीवर नव्हे, तर वैद्यकीय सल्ल्यावर आधारित असावेत, असे तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात.

(टीप : ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोणतेही औषध सुरू करणे किंवा बंद करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)