तुम्ही आपल्या आजूबाजूची अशी अनेक मंडळी पाहिली असतील जी लग्न ठरायचं आहे म्हणून आपलं वजन कमी करायला सुरुवात करतात. सौंदर्याच्या ठरलेल्या व्याख्यांमध्ये, आखून दिलेल्या चौकटींमध्ये बसण्याचा प्रयत्न करतात. मुळात हा अट्टाहास फक्त आपण कुणाला तरी आवडावं किंवा कोणी तरी आपल्यावर प्रेम करावं, आपल्याला स्वीकारावं ह्यासाठी असतो. पण ह्यावेळी आपण महत्त्वाची गोष्ट विसरतो कि, बाहेरच्या दिखाव्यामुळे आपल्याला मिळालेलं एखाद्याचं प्रेम हे खरंच आयुष्यभरासाठी राहील का? किंवा त्याला खरंच प्रेम म्हणता येईल का? हा खरंतर अनेकदा चर्चिला गेलेला पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. याच मुद्द्याकडे आता न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी लक्ष वेधलं आहे. प्रेम, स्वीकार आणि दिखावा ह्यावर ऋजुता दिवेकर यांनी अगदी मार्मिकपणे आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर ऋजुता दिवेकर या नेहमीच आरोग्य, आहार आणि फिटनेसबद्दल विविध अपडेट्स शेअर करत असतात. आपण आपल्या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक कसा ठेवावा? याबाबत बोलत असतात. आताही त्यांनी एका अशाच महत्त्वाच्या गोष्टीची आपल्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ऋजुता दिवेकर म्हणतात की, “एखादी व्यक्ती तुम्ही कसे दिसता हे पाहून तुमच्यावर खरं प्रेम करत नाही किंवा तुम्हाला स्वीकारत नाही. तर, तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे पाहून तुमच्यावर प्रेम करते.”

प्रेम, स्वीकार आणि दिखावा

आपला एक व्हिडिओ पोस्ट करत प्रेम, स्वीकार आणि दिखावा याबद्दल बोलताना ऋजुता दिवेकर लिहितात कि, “जर तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी, दुसऱ्या कुणाचं मन जिंकण्यासाठी किंवा इतरांनी आपल्याला स्वीकारावं, आपल्यावर प्रेम करावं यासाठी तुमचं वजन कमी करायचं असेल, बारीक व्हायचं असेल तर एकदा तुमच्या आवडत्या लोकांबद्दल जरूर विचार करा. तुम्ही तुमच्या आवडत्या लोकांवर त्यांच्या शरीराचा आकार, त्यांचं वजन पाहून प्रेम करता का? नाही ना. उलट तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता कारण या सगळ्या दिखाव्यापलीकडे तुम्हाला ते परिपूर्ण वाटतात. बरोबर ना. म्हणूनच तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं नाही. तर तुम्ही लोकांशी कसे वागता हे महत्त्वाचं आहे.”

शेवटी आपल्याकडे जे आहे ते प्रेमच!

ऋजुता दिवेकर खऱ्या प्रेमाचं महत्त्व अधोरेखित करताना म्हणतात कि, “आपण आपल्या लोकांशी कसे वागतो आणि त्याबदल्यात आपल्याला कसं वागवलं जातं हे आपल्या आयुष्यात सर्वाधिक महत्त्वाचं आहे. शेवटी आपल्याकडे जे आहे ते प्रेमच आहे. तेच आपण इतरांना भरभरून देऊ शकतो आणि तेच आपल्याला निर्मळ रूपात मिळू शकतं.” थोडक्यात, प्रत्येकजण खऱ्या प्रेमाच्या शोधात असतो आणि खरं प्रेम कधीही बाहेरच्या सौंदर्याला भुलत नाही. ते फक्त मनाचं सौंदर्यच पाहतं. म्हणूनच, स्वतःत जे बदल कराल ते इतरांना खुश करण्यासाठी नव्हे तर फक्त स्वतःच्या आनंदासाठी करा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not lose weight for love nutritionist rujuta diwekar gst
First published on: 17-08-2021 at 13:40 IST